Friday, October 24, 2025
Happy Diwali

रत्नागिरी, रायगड जिल्ह्याला पुढील २४ तासांकरिता रेड अलर्ट

रत्नागिरी, रायगड जिल्ह्याला पुढील २४ तासांकरिता रेड अलर्ट

रत्नागिरी जिल्ह्यात ८८.१ मिमी पावसाची नोंद

मुंबई (प्रतिनिधी): भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार पुढील २४ तासाकरिता रत्नागिरी, रायगड या जिल्ह्याला रेड अलर्ट तर पालघर, ठाणे, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट, आणि सिंधुदुर्ग यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून प्रशासनातर्फे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) व राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) पथकांना आपत्कालीन परिस्थितीकरीता सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.

राज्यात मागील २४ तासामध्ये (१५ जून रोजी सकाळपर्यंत) सर्वाधिक पाऊस रत्नागिरी जिल्ह्यात ८८.१ मिमी., रायगड जिल्ह्यात ६५.३ मिमी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक ५३.८ मिमी, ठाणे २९.६ आणि यवतमाळ जिल्ह्यात १७.५ मिमी पावसाची नोंद झाली असल्याची माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आली. जगबुडी नदीची खेड येथे इशारा पातळी ५ मीटर असून सध्या नदीची पाणी पातळी ५.९ मीटर इतकी पाणी पातळी आहे. जगबुडी नदीची धोका पातळी ७ मीटर आहे.

मुंबई जिल्ह्यात वादळी वाऱ्यामुळे १ व्यक्ती जखमी झाली आहे. वीज पडून सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक व्यक्ती जखमी, धुळे जिल्ह्यात वीज पडून एक मृत्यू, नाशिक जिल्ह्यात वीज पडून एक व्यक्ती व दोन प्राण्यांचा मृत्यू तर दोन व्यक्ती जखमी, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वीज पडून चार व्यक्ती व पाच प्राण्यांचा मृत्यू आणि पाच व्यक्ती जखमी, नंदुरबार जिल्ह्यात एक व्यक्ती मृत्यू व एक जखमी आणि अमरावती जिल्ह्यात वीज पडून एक व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

Comments
Add Comment