Sunday, August 24, 2025

दुधाळ गाई-म्हशींसाठी ११०० शेतकऱ्यांचे अर्ज

दुधाळ गाई-म्हशींसाठी  ११०० शेतकऱ्यांचे अर्ज

पशुसंवर्धन विभागाच्या योजनांसाठी प्रतिसाद

पालघर : पशुसंवर्धन विभागाकडून पशुपालक आणि शेतकऱ्यांसाठी ५०, ७५ टक्के अनुदानावर दुधाळ जनावरे, शेळी मेंढ्यां गट,कोंबड्या गट वाटप केल्या जाणार आहे. या योजनांसाठी जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला असून, दुधाळ गाई-म्हशींसाठी १ हजार १३१ शेतकऱ्यांनी तर शेळी मेंढी गट वाटपासाठी ७३४ शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. सर्वसामान्य शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबविण्यात येतात. शेतकऱ्यांना जोडधंदा म्हणून दुधाळ जनावरे, शेळी मेंढ्यां, कोंबड्या आदींचे वितरण करण्यात येते. यासाठी शेतकऱ्यांना प्रवर्गनिहाय ५० ते ७५ टक्के अनुदान देण्यात येते.

पालघर जिल्ह्यातील पशुपालकांसाठी जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाने राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया राबविली आहे. या योजनांमध्ये दोन दूधाळ गाई-म्हशीं, ११ शेळी-मेंढींचा समावेश असलेला गट, १ हजार पक्ष्यांच्या क्षमतेच्या मांसल कुक्कुट शेड उभारणीसाठी अर्धसहाय्य, तसेच १०० कुक्कुट पक्ष्यांचे वाटप आणि २८ तलांगाचा गट वाटप लाभार्थ्यांना केले जाणार आहे. या योजनांमुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे आणि अनेक कुटुंबांना उत्पन्नाचे नवे साधन मिळणार आहे.

दरम्यान, वैयक्तिक लाभाच्या या योजनांसाठी राज्यात सर्वत्र चांगला प्रतिसाद असताना सुरुवातीला पालघर जिल्ह्यात मात्र या संदर्भात निरुत्साह दिसून आला. त्यामुळे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रकाश हसनाळकर यांनी पशुसंवर्धन विभागातील डॉक्टर, पर्यवेक्षक यांना योजनेच्या जनजागृतीसाठी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याच्या सूचना केल्या.

डॉक्टर व पर्यवेक्षकांकडून जनजागृतीची मोहीम राबविल्यानंतर शेतकऱ्यांचा प्रतिसाद वाढला. परिणामी अर्ज करण्याच्या मुदतीपर्यंत दुधाळ गायी, म्हशींच्या वाटपासाठी राज्यसतरीय योजनेकरीता ६२३, तर जिल्हास्तरीय योजनेसाठी ५०८ शेतकरी, पशुपालकांनी अर्ज केले आहेत. राज्यस्तरीय योजनेच्या शेळी मेंढ्यांसाठी ४०९ तर जिल्हास्तरावर ३२५ अर्ज प्राप्त झाले आहेत. तसेच १ हजार मांसल कुक्कुट पक्षी संगोपनाद्वारे व्यवसाय सुरू करण्यासाठी राज्यस्तरीय योजनेकरिता ४०५ अर्ज, जिल्हास्तरीय योजनेअंतर्गत एक दिवशीय सुधारित पक्षांच्या पिल्लाचे गट वाटप करण्यासाठी २१३ शेतकऱ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत.

Comments
Add Comment