दिवसा सूर्याकडे का बघू नये?

प्रा. देवबा पाटील


आदित्य व त्याच्या मित्रांजवळ तो सुभाष नावाचा मुलगा आता शाळेच्या मधल्या सुट्टीत रोजच येऊन बसू लागला व जेवता जेवता त्यांच्या सूर्यावर चांगली चर्चा घडू लागली.
“सूर्यात एवढी प्रचंड उष्णता कोठून आली असेल गड्या?” बंटूने शंका काढली.


“सूर्य हा अतिशय उष्ण वायूंचा तप्त असा तारा आहे. त्याच्या बाह्यभागाचे तापमान ६ हजार अंश सेल्सिअस असून अंतर्भागाचे तापमान ५ लक्ष अंश से. पेक्षाही जास्त आहे. सूर्यामध्ये कोणकोणते तप्त वायू आहेत हे तुम्हा सर्वांना माहीतच असेल?” सुभाषने विचारले.


“हो. सूर्यात मुख्यत: ७० टक्के हायड्रोजन व २८ टक्के हेलियम या वायूंचे अतिउष्ण असे मिश्रण आहे. बरोबर आहे मित्रा?” आदित्यने त्याला विचारले.


“हो, दादा.” त्या सुभाषने सांगण्यास सुरुवात केली, “सूर्य हा अतिशय उष्ण वायूंचा तप्त असा तारा आहे. सूर्यात मुख्यत: हायड्रोजन व हेलियम वायूंचे अति उष्ण असे मिश्रण आहे. सूर्यावरील प्रचंड तापमानाने हायड्रोजनच्या अणूंमध्ये सतत अणुकेंद्र समन्वयाची म्हणजे अणुसंमिलनाची प्रक्रिया होत असते. त्यामुळे हायड्रोजन वायूचे हेलियम वायूत सतत रूपांतर होत असते. सूर्याच्या अंतरंगात या तप्त वायूंमध्ये सतत रासायनिक प्रक्रिया होत असतात. या प्रक्रिया होत असताना भराभर वेगाने एकत्र येणाऱ्या हायड्रोजनच्या अणूंच्या घर्षणाने व दाबाने ता­ऱ्यांच्या केंद्रभागी प्रचंड प्रमाणात उष्णता निर्माण होत असते. तीच उष्णता सूर्याबाहेर पडते. तीच उष्णता सूर्यमालेतील सा­ऱ्या ग्रहांकडे व आपल्या पृथ्वीकडे येते. पृथ्वीपर्यंत पोहोचेपर्यंत पृथ्वीभोवतीच्या वातावरणाने त्या उष्णतेची तीव्रता कमी कमी होत ऊबदार सूर्यप्रकाशाच्या रूपात ती आपणास मिळते. तरीही ती उष्णता खूप तीव्र असतेच.”


“दिवसा सूर्याकडे का बघू नये?” मोन्टूने प्रश्न केला.


“सूर्यापासून मिळणारी उष्णता खूपच तीव्र असते. या तीव्र उष्णतेमुळे दिवसा सूर्याचा प्रकाश हा अतिशय प्रखर म्हणजे तेजस्वी असतो. त्यामुळे दिवसा सूर्याकडे बघितल्यास आपल्या डोळ्यांना अंधत्व येण्याचा धोका असतो म्हणून दिवसा सूर्याकडे मुळीच बघू नये.” सुभाषने उत्तर दिले.


“सूर्यप्रकाश आपल्यापर्यंत पोहोचायला किती वेळ लागतो?” बंटूने प्रश्न केला.
सुभाष म्हणाला, “सूर्याचा प्रकाश पृथ्वीपर्यंत केवळ सव्वाआठ मिनिटांतच पोहोचतो.”


“त्यावर सौर ज्वाळा कशा असतात गड्या?” मोंटूने प्रश्न केला.
“सूर्यामध्ये फक्त प्रचंड उष्णतेने उसळणारे वायूच आहेत. ते वायू लाटांप्रमाणे किंवा अग्नीच्या ज्वालांप्रमाणे सतत उसळत असतात. या उसळणा­ऱ्या वायूंच्या लाटांनाच सौर ज्वाळा असे म्हणतात. सूर्यावर त्या सतत निर्माण होतच असतात.” सुभाषने उत्तर दिले.


“सौर उत्सर्जन म्हणजे काय असते मग?” चिंटूने प्रश्न केला.


तो म्हणाला, “सूर्यापासून निघालेली प्रारणे ही सौर ऊर्जेच्या रूपाने अवकाश पोकळीत कित्येक किलोमीटर अंतर कापून पृथ्वीवर येऊन पोहोेचतात. त्यांच्या या वहनाला कोणत्याही माध्यमाची गरज नसते. अशा वहनाला सौर उत्सर्जन असे म्हणतात.”


“हे प्रारणे म्हणजे काय असते?” पिंटूने विचारले. “प्रारणे म्हणजे उष्णता किरण, प्रकाश किरण, क्ष-किरण, अतिनील किरण, गॅमा किरण, रेडिओ तरंग अशा सर्व प्रकारच्या किरणांचा तरंग रूपात वहन करणारा शक्तिशाली समुच्चय.” तो सुभाष उत्तरला.


“सूर्य आपल्या पृथ्वीपासून किती दूर आहे? त्याचे आकारमान, वस्तुमान किती आहे?” अंतूने प्रश्न केला.


“आपल्या पृथ्वीपासून हा आपला सूर्य ९ कोटी ३० लक्ष मैल म्हणजे १४ कोटी ९६ लाख किमी दूर आहे.” सुभाषने उत्तर दिले.


एवढ्यात नेहमीसारखी मधली सुट्टी संपल्याची शाळेची घंटी झाल्यामुळे पुन्हा सारे आपापल्या वर्गात
निघून गेले.

Comments
Add Comment

आनंद सोहळा

- परंपरा, द. वि. अत्रे ग्यानबा तुकाराम’ अन् ‘पुंडलिक वरदा हरी विठ्ठल’ हा नामघोष लाखो वारकऱ्यांच्या तोंडून ऐकायचा

आषाढ... परंपरेतला अन् प्रत्यक्षातला

- चिंतन; डॉ. साधना कुलकर्णी आषाढ मनात आशा घेऊनच उजाडतो. व्याकूळ होऊन संपूर्ण सृष्टी पावसाची वाट बघू लागते. इतर

एका गीतातून जन्मलेला चित्रपट

- स्मृतीपटल; अनिल तोरणे कोणा व्यक्तीला केव्हा आणि कोठे कशापासून प्रेरणा मिळेल हे सांगता येणार नाही. सुप्रसिद्ध

‘अबके हम बिछड़े तो शायद…’

- नॉस्टॅल्जिया; श्रीनिवास बेलसरे उर्दूतील शेरोशायरी अनेकदा रोमांसमधील अगदी तरल भावनांच्या सूक्ष्म छटाही सहज

नर्मदातीरावरील तीर्थांचा महिमा

- महाभारतातील मोतीकण; भालचंद्र ठोंबरे भारतातील गंगा, यमुना, सरस्वती, नर्मदा या नद्यांपैकी नर्मदा नदीच्या केवळ

संकोच नव्हे, संवाद हवा!

- आनंदी पालकत्व; डॉ. स्वाती गानू आजही अनेक पालक मुलांशी लैंगिक शिक्षणाबद्दल बोलणे टाळतात. काहींना संकोच वाटतो,