प्रहार    

शिक्षणाचे आनंदवन...

  112

शिक्षणाचे आनंदवन...

मायभाषा : डॉ. वीणा सानेकर


मराठीचे अध्यापन हा विषय वर्तमान आणि भविष्य दोन्ही दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्या दृष्टीने शिक्षक घडविणे हे एक मोठे आव्हान आहे.


शालेय स्तरावरील, सातवीपर्यंतचे अध्यापन करण्यासाठी डी.एड. हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरतो; परंतु इंग्रजी माध्यमाकडे वळण्याचा पालकांचा वाढता कल पाहता मराठी माध्यमातून डी.एड. करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होत आहे. हिंदी किंवा गुजराती या प्रादेशिक भाषांची स्थिती काही फारशी वेगळी नाही. सातवीपर्यंतच्या शिक्षणाचा कालखंड हा आपल्या एकूण शिक्षणविषयक जडणघडणीत अतिशय महत्त्वाचा ठरतो. या काळात मुलांची भाषा समृद्ध होते. त्यांची अन्य कौशल्ये विकसित होतात. त्यामुळे या काळात त्यांना समजून घेऊन घडवणारा शिक्षक प्राप्त होणे अतिशय गरजचे असते.


उपक्रमशील शिक्षक, चाकोरीपलीकडे जाऊन नावीन्याचा शोध घेणारा शिक्षक मुलांचा मित्र किंवा मैत्रीण होते. मुलांच्या मनात आत्मविश्वास रुजवणे ही गोष्ट एक उत्तम शिक्षक आनंदाने करतो. मुलांच्या विकासासाठी प्रेम, स्वातंत्र्य, आश्वासक वातावरण या गोष्टी अत्यावश्यक असतात. अशा प्रकारचे शिक्षक घडावेत यासाठी प्रयत्नशील डी. एड. महाविद्यालयांमध्ये सोमैया संकुलातील अध्यापिका महाविद्यालयाचे नाव महत्त्वाचे आहे. मुख्य म्हणजे हिंदी, मराठी आणि इंग्रजी अशा तीन माध्यमातून शिक्षण देणारे हे महाराष्ट्रातील दुर्मीळ महाविद्यालय आहे. ‘सहज शिक्षणाची प्रयोगशाळा’ असे आपले डी.एड. महाविद्यालय असावे, म्हणून प्राचार्या स्नेहल फोडसे सतत परिश्रम घेतात. शिक्षणातून आनंद कसा मिळेल ही दृष्टी ठेवून काम केले की, शाळा किंवा महाविद्यालयाचे आनंदवन होते.


हा आनंद भाषाविषयक उपक्रमांतून हमखास वेचता येतो. कविता संमेलन, पथनाट्य कार्यशाळा, गद्याचे नाट्यरूपांतर, क्षेत्रभेटी, सामूहिक किंवा वैयक्तिक प्रकल्प, कल्पनाशक्तीला वाव देणारे उपक्रम, गटचर्चा अशा विविध माध्यमातून हे शक्य होते. ‘वाचावे आनंदाने आणि लिहावे नेटाने’ ही व्यक्तिमत्त्व विकासाची गुरुकिल्ली आहे. यापैकी कशाचे ओझे न होता ते उत्स्फूर्तपणे घडले पाहिजे आणि हा भाषासंस्कार बालवयातच व्हायला हवा. तंत्रज्ञान जसजसे विकसित होत गेले तसतशी ही चर्चा होऊ लागली की, प्रत्यक्ष शिक्षकांची गरज आता कमी कमी होणार आहे, पण हे खरे नाही.


भाषेसारख्या विषयाबाबत तर हे कठीणच, कारण पाठांतराची पाठडी ओलांडून सृजनशील उपक्रमांचा शोध घेणारे शिक्षक काळाच्या प्रत्येक टप्प्यावर हवेच.

Comments
Add Comment

ध्यास मराठीतून शिकण्याचा

मायभाषा: डॉ. वीणा सानेकर मी १३ वीत असताना आमच्या कोकजे सरांनी नेरळ येथील वेगवेगळ्या शाळांची ओळख करून दिली.

हरवलेलं माणूसपण

मोरपीस: पूजा काळे स्वामी तुम्ही पाहताय ना! काळ सोकावलायं, माणसातील माणूसपण हरवत चाललयं! देवळाबाहेरच्या परिसरात

शेतकरी बांधवांना वरदान ठरणारी 'सब्जी कोठी'

दी लेडी बॉस: अर्चना सोंडे रक्षाबंधन हा बहीण-भावांच्या नात्याचा उत्सव. भावाने बहिणीची रक्षा करावी म्हणून ती त्यास

सण आयलाय गो...

उदय खोत नारळी पौर्णिमा हा कोळी बांधवांचा जिव्हाळ्याचा सण. दरवर्षी दर्याराजाची पूजा करून नारळ अर्पण करून

हसरी शंभरी...

चारुहास पंडित : प्रसिद्ध व्यंगचित्रकार आपल्या व्यंगचित्रांच्या माध्यमातून शब्देवीण संवाद साधणारे ज्येष्ठ

सुखावणारा ऋतुगंध

तुझी माझी पहिली भेट म्हणजे मृद्गंधाचे अनमोल दरवळते अत्तर नाते तुझे नी माझे हृदयस्थ सुंदर बहरत राहते माझ्या मनी