Sunday, July 6, 2025

महाराष्ट्रात २२ जुलै हा दिवस “शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिन” म्हणून साजरा होणार

महाराष्ट्रात २२ जुलै हा दिवस “शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिन” म्हणून साजरा होणार
मुंबई : राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी देशी गायींच्या संवर्धनासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. दरवर्षी २२ जुलै हा दिवस “शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिन” म्हणून साजरा करण्याचे घोषित केले आहे. या निर्णयाचा अध्यादेश सरकारने निर्गमित केला आहे.

यापूर्वीच देशी गायीस “राज्यमाता–गोमाता” म्हणून घोषित करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात मराठवाडा विभागात देवणी, लालकंधारी. पश्चिम महाराष्ट्रामध्ये खिल्लार, उत्तर महाराष्ट्रात डांगी तर विदर्भात गवळाऊ यांसारख्या देशी गायींच्या जाती आढळतात. मात्र, कमी उत्पादनक्षमता व प्रजननक्षमतेमुळे या गायींच्या संख्येत सातत्याने घट होत चालली आहे. यामुळे त्यांचे जतन व संवर्धन करण्याची गरज निर्माण झाली आहे.

या पार्श्वभूमीवर, देशी गायींचे जतन व संवर्धन करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यांच्या गुणवत्तेमध्ये वाढ करून अधिक उत्पादनक्षम देशी गायी तयार करण्याचे उद्दिष्ट शासनाने घेतले आहे. यासोबतच देशी गायींच्या दुधाचे, शेणाचे, गोमुत्राचे उत्पादन व विपणन यासाठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे.

२२ जुलैला विविध उपक्रमांचे आयोजन

“शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिन” साजरा करताना चर्चासत्रे, शिबिरे, प्रदर्शने व विविध स्पर्धा यांचा समावेश असलेल्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल. राज्य शासनाच्या आयुक्त, पशुसंवर्धन विभाग व महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या संयुक्त विद्यमाने या दिवसाचे आयोजन करण्यात येणार असून, यासाठी लागणारा खर्च गोसेवा आयोगाच्या निधीतून करण्यात येणार आहे. राज्यातील देशी गोवंशाच्या जतनासाठी व लोकजागृतीसाठी शासनाने घेतलेला हा निर्णय स्वागतार्ह ठरत असून, स्थानिक देशी गायांच्या संवर्धनासाठी एक सकारात्मक पाऊल असल्याचे पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.
Comments
Add Comment