Thursday, October 30, 2025
Happy Diwali

ऐरोली सिलिंडर स्फोटानंतर मुंबईतील फेरीवाल्यांवर कारवाईची मागणी

ऐरोली सिलिंडर स्फोटानंतर मुंबईतील फेरीवाल्यांवर कारवाईची मागणी
मुंबई (खास प्रतिनिधी): ऐरोली रेल्वे स्थानकाबाहेरील सिलिंडर स्फोटाच्या दुघर्टनेनंतर दादर, वडाळा रेल्वे स्थानक तसेच फाईव्ह गार्डन परिसरातील बेकायदेशीर फेरीवाल्यांविरुद्ध तात्काळ कारवाई करण्याची मागणी शिवसेनेच्यावतीने करण्यात आली आहे. शिवसेनेचे माजी नगरसेवक अमेय घोले यांनी महापालिकेच्या एफ उत्तर विभागाच्या सहायक आयुक्तांना निवेदन देवून खाद्यपदार्थ विक्रीसाठी सिलिंडर सारख्या ज्वलनशील वस्तू तथा पदार्थ जप्त करून कारवाई करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे.
अमेय घोले यांनी महापालिकेने दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, ऐरोली रेल्वे स्थानकाबाहेरील परिसरात एका बेकायदेशीर फेरीवाल्याच्या दुकानात असलेल्या सिलिंडरच्या स्फोटामुळे गंभीर अपघात घडला. अशा बेकायदेशीर फेरीवाल्यांकडे कोणतीही अधिकृत परवानगी आणि सुरक्षिततेची हमी किंवा नियंत्रण नसल्याने अशा घटनांनी नागरिकांचे प्राण धोक्यात येत आहेत. अशाप्रकारे चिंता व्यक्त करतानाच त्यांनी दुर्दैवाने, एफ उत्तर विभागातील दादर रेल्वे स्थानक, वडाळा रेल्वे स्थानक व फाईव्ह गार्डन परिसरातही अशा प्रकारचे बेकायदेशीर फेरीवाले मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करून व्यवसाय करत आहेत. त्यांच्याकडेही अशा प्रकारचे गॅस सिलिंडर, स्टोव्ह, इतर ज्वलनशील वस्तू असण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे अतिक्रमण केवळ वाहतुकीस अडथळा ठरत नाहीत, तर भविष्यात ऐरोलीसारखी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण करते. त्यामुळे या सर्व ठिकाणांवरील बेकायदेशीर फेरीवाल्यांची तपासणी करून त्वरित कारवाई करावी. तसेच जे फेरीवाले गॅस सिलिंडर, स्टोव्ह, किंवा तत्सम साहित्य वापरत आहेत, त्यांच्यावर तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
Comments
Add Comment