साहसी गणेश

पूनम राणे


मे महिन्याची सुट्टी लागली होती. गणेश आपल्या गावी आजी-आजोबांकडे गेला होता. शहरातल्या वातावरणापेक्षा गावातील वातावरण त्याला खूप आवडलं होतं. आजूबाजूचा मोकळा परिसर, शुद्ध हवा आणि महत्त्वाचं म्हणजे अनेक महिने रिकामे असलेले गाव माणसांनी गजबजून गेले होते.


गावातील प्रत्येक घराचे दार उघडले होते.
प्रत्येक घरातील कोणी ना कोणी शहरातून गावाकडे आलेला होता. रात्री ११ - १२ वाजेपर्यंत सर्वांच्या अंगणात बसून गप्पा चालत होत्या.
एकमेकांच्या घरी प्रत्येकजण जात होते. मे महिन्याची सुट्टी आनंदात चालली होती.


एके दिवशी सकाळी राधा मावशीच्या अंगणात जोरजोरात कोंबड्यांचा आवाज गणेशने ऐकला. सकाळचे ८ वाजले होते. राधा मावशी उठलेल्या दिसत नव्हत्या. गणेशच्या बाजूच्या घरी त्या राहत होत्या. कोंबड्यांच्या आवाजाने गणेश ताबडतोब राधा मावशीच्या घरी गेला. कोंबड्यांवर घातलेली डालगी त्यांने बाजूला केली. आतून दरवाजा बंद होता. त्याने मावशी... मावशी... म्हणून राधाबाईंना आवाज दिला; परंतु आतून काही आवाज येत नव्हता. गणेश घाबरला, वेगवेगळे विचार त्याच्या मनात येऊ लागले. रात्री आपण राधा मावशीसोबत बोलत होतो. अजून राधा मावशी का उठल्या नसाव्यात? लगबगीने त्याने गावातील राजू, शाम, गौरव या मित्रांना जमा केले आणि राधा मावशीच्या घरी घेऊन आला. गणेशने शिडी शोधून आणली. घराला शिडी लावली आणि शिडीवर चढून कौले काढून खाली वाकून पाहतो तर काय! राधामावशी चुलीच्या बाजूला निस्तेज पहुंडलेली होती. काहीच हालचाल दिसत नव्हती. गणेशने वरून खाली उडी मारली. मावशी... मावशी... म्हणून जोरजोरात हाका मारू लागला; परंतु मावशी काहीच बोलत नव्हती. गणेश खूप घाबरला आणि श्यामला म्हणाला, गावातील गुरवकाकांना घेऊन ये.


श्याम पळतच जाऊन गुरव काकांना घेऊन आला. राधा मावशीला पाहताच, गुरव काका म्हणाले, राधाबाई बेशुद्ध पडलेल्या. ॲम्बुलन्स बोलवा. राधाबाईंना डॉक्टरकडे घेऊन जायला पाहिजे. गणेशने अॅम्बुलन्सची व्यवस्था केली. गावातील सारी मंडळी झपाट्याने राधा मावशीच्या घरी जमा झाली. राधा मावशीला दोन मुले होती; परंतु ते दोघेही बाहेरगावीच राहत होते. राधामावशीला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आले. डॉक्टरने तपासले. म्हणाले, अजून थोडा वेळ गेला असता तर राधाबाईंना आपण कायमचे मुकलो असतो. औषधं गोळ्या आणि सलाईन लावताच राधा मावशी शुद्धीवर आल्या, त्यांनी डोळे उघडले. आपण आज एक चांगले काम केले याचा आनंद गावकरी मंडळींना झाला. गणेश व त्याच्या मित्रांना त्यांनी केलेल्या चांगल्या कामाबद्दल गावकऱ्यांनी शाबासकी दिली. गावातील प्रत्येक जण रोज आळीपाळीने राधाबाईंची काळजी घेऊ लागला. राधा मावशीने गणेश आणि गणेशच्या मित्रांना भरभरून आशीर्वाद दिले. गणेशच्या साहसीपणामुळे राधा मावशींना जीवनदान मिळाले.

Comments
Add Comment

पोटपूजेचाही उत्सव!

खास बात : विष्णू मनोहर प्रसिद्ध बल्लवाचार्य दिवाळी हा प्रकाशाचा सण आहे तसेच शरीर ऊर्जावान ठेवणाऱ्या

भारतासाठी नवी चिंता

विश्वभ्रमण : प्रा. जयसिंग यादव ‌‘ऑपरेशन सिंदूर‌’नंतर भारत आणि पाकिस्तानच्या दिशा बदलल्या. पाकिस्तानने

अभिनय सम्राट डॉ. काशिनाथ घाणेकर

कोकण आयकॉन : सतीश पाटणकर अभिनय सुरू करण्याआधी घाणेकर व्यवसायाने दंतवैद्य होते. काशीनाथ घाणेकर यांचा जन्म १४

अतिलाडाने तुम्ही मुलांना बिघडवत, तर नाही ना?

आनंदी पालकत्व : डाॅ. स्वाती गानू पालक या नात्याने आपल्या मुलाने मागितलेली प्रत्येक वस्तू घेऊन द्यावी असं

‘अब ये सुहाना साथ ना छुटे...’

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे सिनेमासाठी ‘गुमराह’ हे शीर्षक बी. आर. चोपडा, महेश भट आणि वर्धन केतकर या तीन

देवाची मदत...

संवाद : गुरुनाथ तेंडुलकर माझ्या लहानपणी मी वडिलांच्या तोंडून ऐकलेली एक गोष्ट सांगतो. पावसाळ्याचे दिवस होते.