Monday, October 27, 2025
Happy Diwali

'ऑल इज वेल' चित्रपटात सयाजी शिंदे यांचा मराठी बाणा

'ऑल इज वेल' चित्रपटात सयाजी शिंदे यांचा मराठी बाणा
मुंबई : मराठी भाषा वळवावी तशी वळते, असं म्हणतात. मराठी भाषेचा गोडवा हा जितका शब्दांत असतो तितकाच तो माणसाच्या स्वभावातही असतो. आपल्या भाषेचा आणि स्वभावाचा हाच गोडवा घेऊन प्राकृत मराठी भाषेत सयाजी शिंदे भाईगिरी करणार आहेत. वाणीश्री फिल्म प्रॉडक्शन्सच्या ‘ऑल इज वेल’ या मराठी चित्रपटात ‘आप्पा’ या भाईच्या भूमिकेत सयाजी शिंदे दिसणार आहेत. हा भाई शुद्ध मराठीत बोलत अनेकांची विकेट काढताना दिसणार आहे. त्यांच्या या मराठी बोलण्याने काय धमाल उडते याची गंमत चित्रपटात रंगत आणणार आहे. येत्या २७ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या ‘ऑल इज वेल’ चित्रपटाचे दिग्दर्शन योगेश जाधव तर लेखन प्रियदर्शन जाधव यांनी केले आहे. या चित्रपटाचे निर्माते अमोद मुचंडीकर, वाणी हालप्पनवर आहेत. सहनिर्माते मल्लेश सोमनाथ मरुचे, विनायक पट्टणशेट्टी आहेत. आपल्या या भूमिकेबद्दल बोलताना सयाजी शिंदे सांगतात, ‘आप्पा ही भाईगिरी करणाऱ्या डॉनची व्यक्तिरेखा असली तरी त्यात काहीतरी वेगळेपणा आणि रंगत आणावी या उद्देशाने आमच्या लेखक-दिग्दर्शकांनी शुद्ध मराठी भाषेची गंमत त्या व्यक्तिरेखेसाठी वापरली आहे. शुद्ध मराठी भाषेच्या गोडव्यामुळे ही व्यक्तिरेखा आणि त्यातली गंमत खुलली आहे. अमर,अकबर, आणि अँथनी या तीन मित्रांच्या अतूट मैत्रीची धमाल गोष्ट या चित्रपटात आहे. प्रियदर्शन जाधव, अभिनय बेर्डे, रोहित हळदीकर, अभिजीत चव्हाण, नक्षत्रा मेढेकर, सायली फाटक, माधव वझे, अजय जाधव, अमायरा गोस्वामी, दिशा काटकर आदी कलाकारांच्या भूमिका या चित्रपटात आहेत. ‘ऑल इज वेल’ चित्रपटाचे कार्यकारी निर्माते संजय ठुबे आहेत. संगीत चिनार-महेश, अर्जुन जन्या यांचे आहे. छायांकन मयुरेश जोशी तर संकलन अथश्री ठुबे यांचे आहे. नृत्यदिग्दर्शक राजेश बिडवे तर साहस दृश्ये अजय ठाकूर पठाणीया यांची आहेत. गीतकार मंदार चोळकर आहेत.गायक रोहित राऊत, गायिका अपेक्षा दांडेकर यांनी चित्रपटातील गाणी गायली आहेत. कलादिग्दर्शन नितीन बोरकर यांचे आहे.
Comments
Add Comment