नवी दिल्ली: प्रयागराजच्या महाकुंभमेळ्यात माळा विकणारी मोनालिसा तिच्या घाऱ्या डोळ्यांमुळे चांगलीच प्रसिद्ध झाली होती, आपल्या देखणेपणाने आणि साधेपणाने सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झालेल्या मोनालीसाने आता ग्लॅमरच्या दुनियेत प्रवेश केला आहे. बॉलिवूड गायक उत्कर्ष सिंगसोबत एका रोमँटिक म्युझिक व्हिडिओमध्ये मोनालीसा झळकताना दिसत आहे. या गाण्याचा टीझर सोशल मिडियावर व्हायरल झाला असून, यामधील मोनालीसाची झलक तिच्या चाहत्यांना सुखावतो आहे.
उत्कर्ष सिंग आणि मोनालिसाचे पहिले म्युझिक अल्बम 13 जून रोजी प्रदर्शित झाळे आहे. तर त्याचा टीझर आधीच ऑनलाइन व्हायरल झाला आहे. या टीझरमध्ये मोनालिसाचे निरागस डोळे आणि सूक्ष्म हावभाव दर्शकांचे लक्ष वेधून घेत आहेत. गाण्यातील "उसकी आँखों से ही रोशन है सुबह का नूर, उसकी पलकों में ही ढलता है रात का गुरूर..." या ओळी या गाण्याचे भावनिक केंद्र बनल्या आहेत.
गायक उत्कर्ष सिंगने सांगितले की, मोनालिसाकडे एक नैसर्गिक आकर्षण आहे जे कॅमेऱ्याला तिच्याकडे आकर्षित करते. जेव्हा दिग्दर्शक मनोज मिश्रा कायदेशीर अडचणींमुळे उपलब्ध नव्हते, तेव्हा उत्कर्षने पुढाकार घेतला आणि या प्रकल्पासाठी मोनालिसाची निवड केली. तिने सगळ्या अपेक्षा पूर्ण केल्या.