Monday, August 4, 2025

NEET 2025 निकाल जाहीर; महाराष्ट्रातून १.२५ लाख विद्यार्थी पात्र, कृष्णांग देशात तिसऱ्या क्रमांकावर

NEET 2025 निकाल जाहीर; महाराष्ट्रातून १.२५ लाख विद्यार्थी पात्र, कृष्णांग देशात तिसऱ्या क्रमांकावर

मुंबई : नीट-यूजी २०२५ (NEET-UG 2025) परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यंदा महाराष्ट्रातून १ लाख २५ हजार ७२७ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. मात्र, ही संख्या मागील वर्षाच्या तुलनेत १७ हजारांनी घटली आहे.


या वर्षी राज्यातून २ लाख ४८ हजार २०१ विद्यार्थ्यांनी परीक्षा देण्यासाठी नोंदणी केली होती. त्यापैकी २ लाख ४२ हजार ८५८ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षेला हजेरी लावली. त्यामध्ये ५० टक्क्यांहून अधिक विद्यार्थी पात्र ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.


सर्वोच्च १० गुणवंतांमध्ये महाराष्ट्राच्या कृष्णांग जोशीने देशपातळीवर तिसरा क्रमांक पटकावला आहे, तर आरव अग्रवालने दहावा क्रमांक मिळवला आहे. याशिवाय, मुलींच्या टॉप-२० यादीतही महाराष्ट्राच्या विद्यार्थिनींनी आपली चमक दाखवली. सिद्धी बढे (३री), ऊर्जा शहा (५वी) आणि इश्मित कौर (१२वी) यांनी आपले नाव उज्वल केले.



ही परीक्षा यंदा ४ मे रोजी भारतासह परदेशातील ५,४६८ केंद्रांवर पार पडली. अबूधाबी, दुबई, शारजा, दोहा, सिंगापूर यांसारख्या शहरांतील विद्यार्थ्यांसाठीही केंद्रे उपलब्ध होती.


परीक्षा इंग्रजीसह १३ प्रादेशिक भाषांमध्ये घेतली गेली. राष्ट्रीय आकडेवारीनुसार, देशभरातून १२ लाख ३६ हजारांहून अधिक विद्यार्थी पात्र ठरले असून, याच आधारे त्यांना वैद्यकीय, दंतवैद्यकीय व इतर संबंधित अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळणार आहे.


विद्यार्थ्यांना निकाल आणि गुणवत्ता यादी (https://neet.nta.nic.in/) या संकेतस्थळावर पाहता येईल.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >