कोची : सिंगापूरचा झेंडा लावलेले एमव्ही वान है ५०३ हे जहाज भारताच्या तटरक्षक दलाने टो करुन सुरक्षित ठिकाणी हलवले. याआधी सतत पाण्याचा मारा करुन तसेच जहाजावर विशिष्ट रासायनिक पावडरचा मारा करुन मालवाहक जहाजाची आग नियंत्रणात आणण्यात आली. यानंतर तटरक्षक दलाने जळालेले मालवाहक जहाज टो करुन सुरक्षित ठिकाणी हलवले. अर्धवट जळालेल्या जहाजातून काही कंटेनर समुद्रात पडले आहेत. या कंटेनरना शोधून समुद्राबाहेर काढण्याचे काम सुरू आहे. तसेच कंटेनरमधील घटकांमुळे पाण्यात घातक रसायने मिसळू नये याची खबरदारी घेण्याचे काम सुरू आहे.
जळालेल्या मालवाहक जहाजावर २२ जण होते. यापैकी १८ जणांना भारताने वाचवले. जहाजावरील चार जण बेपत्ता आहेत. बेपत्ता असलेल्यांचा शोध सुरू आहे.
कोचीपासून सुमारे वीस सागरी मैलांवर असलेल्या जहाजाला ६०० मीटर लांबीच्या दोरखंडाने टो करण्यात आले अर्थात ओढण्यात आले आणि जहाज सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले.
नियमानुसार जहाज मालक आणि विमा कंपनी यांच्यात चर्चा होईल. यानंतर जहाज ज्या देशाच्या सागरी हद्दीत आहे त्या देशाला म्हणजेच भारताला माहिती दिली जाईल. यानंतर मालकाकडून ताबा घेतला जाईपर्यंत जळालेले जहाज भारतीय सागरी हद्दीत देखरेखीत, सुरक्षित ठिकाणी राहील.
अर्धवट जळालेल्या मालवाहक जहाजामुळे भारतीय किनारपट्टीचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली आहे. सध्या जहाज भारतीय किनाऱ्यापासून ३५ सागरी मैलांवर सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले आहे.