Saturday, October 25, 2025
Happy Diwali

राज्यात तीन ते चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज; मुंबई, रायगडला रेड अलर्ट, पुण्यात ऑरेंज अलर्ट

राज्यात तीन ते चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज; मुंबई, रायगडला रेड अलर्ट, पुण्यात ऑरेंज अलर्ट
मुंबई : संपूर्ण राज्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यानुसार काही भागात पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईसह ठाणे तसेच राज्यातील इतर भागातही पुढील तीन ते चार दिवस जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या वाटचालीसाठी सध्या पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे येत्या एक दोन दिवसांत मोसमी वारे वाटचाल करतील. या कालावधीत राज्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मुंबईसह रायगड जिल्ह्याला आज हवामान विभागाने पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात रविवारी १५ जून रोजी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. पुणे आणि घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट दिला आहे. उर्वरित राज्यात पाऊस पडणार आहे. राज्यात अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार सरी कोसळणार आहे.
पुढील काही दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. १९ जूनपर्यंत कोकणात अति मुसळधार पावसाचा धोका कायम राहणार आहे. मुंबईत आज ५० ते ६० किमी/तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान तज्ज्ञ सुषमा नायर यांनी व्यक्त केला आहे. भारतीय हवामान खात्याने पुणे शहर आणि जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मराठवाड्यात दोन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्याने फळगाबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या कन्नड तालुक्यातील भीलदरी शाफियाबद गावात मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे शेतीमध्ये सगळीकडे तळे साचली. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. बीड जिल्ह्यातही वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. त्यामुळे शहरातील रस्ते आणि नाल्याचे पाणी दुधडी भरून वाहत होते.

मुंबईसह अनेक जिल्ह्यांत मुसळधार सरी

शनिवारी संध्याकाळपासून राज्यातील अनेक भागांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे नागरिकांची गैरसोय झाली असून वाहतूक आणि दळणवळणावरही परिणाम झाला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. नवी मुंबईत दिवसभर ढगाळ वातावरणानंतर संध्याकाळी अचानक जोरदार पावसाला सुरुवात झाली. मुंबई शहरात विजांच्या कडकडाटासह दमदार सरी कोसळल्या. अनेक भागांत पाणी साचल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. कल्याण-डोंबिवलीत छत्रपती शिवाजी चौक, टिळक चौक परिसरात गुडघाभर पाणी साचल्याने वाहनचालक व पादचाऱ्यांची तारांबळ उडाली. ठाण्यातील काही भागांत जोरदार, तर काही ठिकाणी रिमझिम पावसाची नोंद झाली. पाणी साचल्याच्या घटना नोंदल्या नसल्या तरी प्रशासन सजग आहे. दरड कोसळण्याचा आणि पाण्याचा प्रवाह वाढण्याचा धोका लक्षात घेता नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहेत. रायगड जिल्ह्यातही शनिवारी दुपारनंतर पावसाने जोरदार हजेरी लावल्याने नागरिकांचे हाल झाले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड-दापोली मुख्य मार्ग पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद ठेवण्यात आली असून पर्यायी मार्ग वापरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दापोलीतील कुडावळे येथे रहदारीसाठी बांधलेली मोरी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली. पालशेत भागात मुसळधार पावसामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. सावरपाटी भागात ७-८ घरांत पाणी भरले आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा