Sunday, October 26, 2025
Happy Diwali

प्रवेश घ्या आणि कॉपी करून पास व्हा!

प्रवेश घ्या आणि कॉपी करून पास व्हा!

मुक्त विद्यापीठाच्या केंद्रावर कॉपी प्रकरण; चौकशीत ३२ विद्यार्थी निलंबित

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यात जवळा येथील स्व. भारतसिंह ठाकूर महाविद्यालयातील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अभ्यास केंद्रावर परीक्षा काळात कॉपी प्रकरण उघडकीस आले आहे. नाशिक येथील विद्यापीठ मुख्यालयाच्या पथकाने अचानक धाड टाकून परीक्षा केंद्रात ३२ विद्यार्थ्यांना गैरप्रकार करताना पकडले. यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

ही धाड ४ आणि ५ जून रोजी टाकण्यात आली. ८ ते १० अधिकार्‍यांच्या पथकाने केंद्रातील विविध कक्षांची कसून झडती घेतली. सुरुवातीला ६० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांवर संशय व्यक्त करण्यात आला होता, मात्र महाविद्यालयाचे संचालक अ. भा. ठाकूर यांनी प्रत्यक्षात ३२ विद्यार्थ्यांना निलंबित केल्याचे स्पष्ट केले आहे.

या केंद्रात सुमारे अडीच हजार विद्यार्थी शिक्षण घेत असून, १७ जूनपर्यंत परीक्षा सुरू आहेत. कॉपीचे प्रकार सलग दोन दिवस आढळल्यामुळे पथकाने दिवसभर थांबून परीक्षेवर थेट देखरेख केली.

विद्यार्थ्यांकडून कॉपीचे प्रकार सर्रास होतात, त्याला पूर्णपणे रोखणे कठीण असल्याची कबुली संचालकांनी दिली आहे. यामुळे मुक्त विद्यापीठाच्या केंद्रांमधील परीक्षा व्यवस्थेवर आणि पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

“प्रवेश घ्या आणि कॉपी करून पास व्हा” अशी चुकीची मानसिकता विद्यार्थ्यांमध्ये बळावते आहे, हे अत्यंत चिंताजनक आहे. त्यामुळे इतर केंद्रांवरही अशा प्रकारची तपासणी व्हावी, अशी मागणी शिक्षण वर्तुळातून होत आहे.

Comments
Add Comment