Tuesday, October 28, 2025
Happy Diwali

रुग्णवाहिकेच्या अभावी बाळाचा मृत्यू

रुग्णवाहिकेच्या अभावी बाळाचा मृत्यू

तालुक्यात आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा

मोखाडा: मोखाडा तालुक्यात एका अर्भकाचा मृत्यू झाला आहे. एकीकडे जिल्ह्यात वाढवण बंदर, बुलेट ट्रेन सारखे मोठे प्रकल्प येत असताना एका मातेला वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध होत नाही. मृत अर्भक पिशवीत घालून पालकाला बसने प्रवास करावा लागत असल्याची हृदय द्रावक घटना उघडकीस आली आहे. मात्र याही पेक्षा भयाण म्हणजे खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय मोखाडा आणि तिथून नाशिक जिल्हा रुग्णालय, असा प्रवास करूनही हे बाळ वाचले नाही. मात्र, नाशिक जिल्हा रुग्णालयातून मृत अर्भकाला वडिलांनी चक्क पिशवीत घालून ८० किमीचा प्रवास केल्याने खळबळ माजली आहे. या प्रकारामुळे आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील जोगलवाडी येथील गर्भवती महिला अविता सखाराम कवर हिला रात्री ३ वाजेच्या सुमारास पोटात कळा येऊ लागल्या. १०८ या क्रमांवावर फोन लावून संपर्क करण्यात आला. मात्र, रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने पुन्हा सकाळी ८ वाजता रुग्णवाहिकेसाठी संपर्क करण्यात आला. मात्र, दुपारी १२ वाजेपर्यंत रुग्णवाहिकेची वाट पाहून सुद्धा रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने अखेर एका खासगी वाहनाने खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. येथे उपचार शक्य नसल्याने तिला मोखाडा येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यास सांगितले.

मात्र, रुग्णालयात रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने आसे उपकेंद्रातून रुग्णवाहिका मागविण्यात आली. संध्याकाळी ६ वाजता गर्भवती महिलेला मोखाडा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. घर ते ग्रामीण रुग्णालय पोहचण्यासाठी त्या मातेला १५ तास लागले. मोखाडा ग्रामीण रुग्णालयात पोहोचल्यानंतर सुद्धा डॉक्टरांच्या तपासणी दरम्यान बाळाचा पोटातच मृत्यू झाल्याचे सांगितले. पुढील उपचारासाठी नाशिक येथे पाठविण्यात आले.

नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात शस्त्रक्रिया करत मातेला वाचविण्यात यश आले. मात्र, यानंतर मृत अर्भक होते. त्याला घरापर्यंत पोहोचवणे किंवा त्याची पुढील योग्य ती कार्यवाही करण्याची सर्वस्वी जबाबदारी रुग्णालय प्रशासनाची असताना त्या मृत अर्भकास थेट पालकांच्या ताब्यात दिले. रुग्णवाहिका किंवा खासगी वाहनासाठी पैसे नसल्याने सखाराम कवर या पालकाने चक्क मृत अर्भकास पिशवीत भरून तब्बल ८० ते ९० किलोमीटरचा प्रवास बसने केला. आणि मूळ गावी येऊन अर्भकावर अंत्यसंस्कार केले.

Comments
Add Comment