Saturday, October 25, 2025
Happy Diwali

धोकादायक इमारतीतून परिवहनचा कारभार

धोकादायक इमारतीतून परिवहनचा कारभार

कर्मचाऱ्यांना जीव मुठीत धरून करावे लागते काम

ठाणे : परिवहन सेवेतील वागळे आगार येथील प्रशासकीय इमारत तसेच वाहतूक भवन इमारतींचे सन १९९८ साली बांधकाम करण्यात आले पण तेव्हापासून कुठल्याही मोठ्या स्वरूपाच्या दुरुस्तीचे काम न झाल्याने या दोन्ही इमारतींच्या बाहेरील बाजूतील भिंत व आरसीसी बांधकाम नादुरुस्त झाल्यामुळे सन २०१७ रोजी स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले असता या दोन्ही इमारती C2-B श्रेणीत दर्शविल्याने इमारतींची तातडीने दुरुस्ती केल्यास इमारतीचे आयुर्मान किमान १५ ते २० वर्षे वाढेल असे वर्तविले होते.

परंतु या स्ट्रक्चरल ऑडिटला आठ वर्षापेक्षा जास्त कालावधी लोटून देखील कुठलेही दुरुस्तीचे काम न केल्याने इमारतींची दुर्दशा झाली आहे.

त्यामुळे कर्मचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन काम करावे लागत असल्याची बाब ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी आयुक्तांना पत्राद्वारे निदर्शनास आणूनदिली आहे. आज याबाबत काँग्रेसच्या शिष्टमंडळाने परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहेरे यांची भेट घेत इमारतींची पाहणी केली असता वाहतूक भवन या इमारतीत कंडक्टर ड्रायवरचा रेस्ट रूम, तिकिटांचा साठा, रेकॉर्ड रूम, कॅश रूम, युनियन ऑफिस असून इमारतीचे कॉलम बीम व बाहेरील बाजूतील प्लास्टर बरेच ठिकाणी खराब झाले आहे.

लीकेजचा प्रॉब्लेम असून इमारतीचे आतील भागातील प्लास्टर पडत असल्याचे निदर्शनास आले. यावेळी बोलताना राहुल पिंगळे यांनी सांगितले की ठाणे महानगरपालिकेच्या वतीने दरवर्षी पावसाळ्यापूर्वी शहरातील धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करून यादी जाहीर केली जाते कारण धोकादायक इमारती पावसाळ्यात कोसळून मोठी जीवितहानी होण्याची शक्यता असते. यापूर्वी देखील अशा घटना घडल्या असून त्यात नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

असे असताना देखील उपमुख्यमंत्र्यांच्या मतदार संघातील व परिवहन मंत्र्यांच्या शहरातील परिवहनच्याच धोकादायक झालेल्या व शेकडो कर्मचारी काम करत असलेल्या स्वतःच्या इमारतींकडे मात्र महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. यावेळी त्यांच्या सोबत माजी परिवहन सदस्य भालचंद्र महाडिक, सेवादल अध्यक्ष रवींद्र कोळी,महिला अध्यक्ष स्मिता वैती, संगीता कोटल, सुमन वाघ,श्रीरंग पंडित,अंजनी सिंग,अकिंदर टमाटा श्रीकांत गाडीलकर, अजिंक्य भोईर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा