Sunday, October 26, 2025
Happy Diwali

रेल्वेच्या २ महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना मंत्रिमंडळाची मंजुरी

रेल्वेच्या २ महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना मंत्रिमंडळाची मंजुरी

नवी दिल्ली: केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहारांवरील समितीने आज, बुधवारी रेल्वेच्या २ महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना मंजुरी दिली. या प्रकल्पांची एकूण अंदाजे किंमत ६ हजार ४०५ कोटी आहे. या प्रकल्पांमध्ये झारखंड, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील ७ जिल्ह्यांमधील ३१८ किमी लांबीचे रेल्वे जाळे तयार केले जाईल, अशी माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री आणि माहिती-प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.

केंद्र सरकारने मंजुरी दिलेल्या पहिल्या प्रकल्पात कोडरमा-बरकाकाना या 133 किलोमीटरच्या रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण केले जाणार आहे. झारखंडमधील महत्त्वाच्या कोळसा उत्पादक क्षेत्रातून जाणारा हा रेल्वे मार्ग आहे. बिहारच्या पाटणा आणि झारखंडची राजधानी रांचीमधील सर्वात कमी अंतराचा रेल्वे दुवा आहे. तसेच दुसऱ्या प्रकल्पांतर्गत बल्लारी-चिक्काजाजूर या 185 किलोमीटरच्या रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण होणार आहे.

हा प्रकल्प कर्नाटकातील बल्लारी आणि चित्रदुर्ग जिल्ह्यांमधून तसेच आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातून जाईल. या प्रकल्पांमुळे 1408 गावांमध्ये राहणाऱ्या सुमारे 28.19 लाख लोकांना सुलभ आणि जलद वाहतूक सुविधा मिळणार आहे. तसेच 49 मिलियन टन प्रतिवर्ष अतिरिक्त मालवाहतूक करण्याची क्षमता तयार होणार आहे. प्रकल्पाद्वारे कोळसा, लोखंड, सिमेंट, खते, शेतीमाल, पेट्रोलियम उत्पादने यांसारख्या मालाच्या वाहतुकीला गती मिळेल असे वैष्णव यांनी सांगितले. रेल्वेचे आगामी दोन्ही प्रकल्प ‘पीएम गति शक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन’ अंतर्गत एकात्मिक नियोजनाच्या माध्यमातून अंमलात आणले जात आहेत. त्यामुळे केवळ वाहतूक सुधारणा नव्हे तर स्थानिक विकास, रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत.

Comments
Add Comment