
क्लेकोर्टवरील सर्वात दीर्घ लांबीचा सामना पाच सेटमध्ये जिंकून स्पेनच्या कार्लोस अल्काराझने विजेतपदावर आपले नाव कोरले आणि क्ले कोर्टचा नवा बादशहा अवतरला आहे याची साक्ष दिली. रॉजर फेडरर, राफेल नदाल आणि नोवास जोकोविच यांच्यानंतर कार्लोस अल्काराझने आपल्या आगमनाची ग्वाही दिली आणि त्याने अंतिम त्याचा स्पर्धक जॅनिक सिनर यांनी टेनिसला नव्या उंचीपर्यंत नेले. क्ले कोर्टवरील सर्वात लांबलचक अंतिम सामना होता आणि जॅनिक सिनरला पाच चमकदार सेट्समध्ये त्याला पराभूत करावे लागले आणि हे करण्यासाठी त्याची दमछाक झाली हे नाकबूल करता येणार नाही, त्याच्या प्रदर्शनाने चाहते आणि तज्ज्ञ दोघांनाही आश्चर्यचकित केले ही मात्र शंभर नंबरी खरी गोष्ट आहे.
अल्काराझचे वैशिष्ट्य हे होते की, त्याने दोन सेटमध्ये पिछाडी भरून काढून सिनरवर सरळ सेट्सनमध्ये मात केली. कार्लोस अल्काराझ हा त्याच्या अष्टपैलू टेनिस खेळासाठी, त्याचा कोर्टवरील अपवादात्मक उत्कृष्ट परफॉर्मन्स आणि अत्यंत जोरदार कामाच्या प्रतिनिष्ठा असलेला टेनिसपटू म्हणून ओळखला जातो ही त्याची वैशिष्ट्ये आहेत. तो सर्व प्रकारच्या टेनिस मैदानावर खेळण्यासाठी प्रसिद्ध आहे आणि त्यात क्ले, हार्ड कोर्ट आणि ग्रास यांवरही उत्कृष्ट खेळतो. नदाल आणि फेडरर यांच्यानंतर कोण या प्रश्नाचे उत्तर आता मिळाले आहे हे निश्चित.
कारण अल्काराझ नदाल किंवा फेडरर यांच्याप्रमाणेच कुटुंबात रमणारा आहे. जोरदार सर्व्हिस आणि उत्कृष्ट बॅकहॅँडचे फटके हे त्याचे खेळाचे ठळक वैशिष्ट्य म्हणावे लागतील. आपल्याकडे फक्त क्रिकेटशिवाय अन्य कोणत्या खेळाकडे पाहायचे नाही असे धोरण राज्यकर्त्यांपासून आपल्या सर्वांचे असल्याने इतर खेळांना आपण सायडिंगला टाकतो. त्या खेळातील गुणांचा उपयोग केवळ ग्रेस मार्क म्हणून करतो. इतर देशांत तसे नाही, त्यामुळे त्यांच्याकडे अगदी रॉड लेवरपासून बिजॉन बोर्ग आणि ख्रिस एव्हर्ट लॉईडपासून जॉन मॅकेन्रोपर्यंत श्रेष्ठ टेनिसपटू होऊन गेले.
आपल्याकडे विजय अमृतराज हे शेवटचे नाव घेण्यासारखा टेनिसपटू. पण आपल्याकडे क्रिकेटचे अगणित स्टार्स होऊन गेले. पण आपल्याकडे क्रिकेटने टेनिससह इतर साऱ्या खेळांना खाल्ले आणि क्रिकेटची लोकप्रियता प्राप्त होऊ शकली नाही हे वास्तव आहे. दुसरीकडे अन्यही बाबी आहेत त्या म्हणजे टेनिसच्या रॅकेट्स प्रचंड किमती आहेत आणि सामान्य जाऊ द्या पण श्रीमंत लोकांनाही त्या परवडत नाहीत. त्यामुळे टेनिस हे आपल्याकडे श्रीमंतांचे खेळ समजले जातात. कार्लोस अल्काराझ हा तीन वेगवेगळ्या पृष्ठभागांवर ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकणारा सर्वात लहान वयातील खेळाडू आहे.
त्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अल्काराझचा फोर हँड खूप शक्तिशाली आहे. त्यामुळे अगदी शेवटच्या क्षणी मनगटाची दिशा बदलू शकतो. अल्काराझ हा आता नदाल आणि फेडरर यांची जागा घेत आहे. अल्काराझ याने वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी रॅकेट हातात धरली आणि त्याने आज ही उंची गाठली आहे. पण हा त्याचा प्रवास इथेच थांबणार नाही. त्याला अजून बराच लांबचा पल्ला गाठायचा आहे. त्या दृष्टीने ही एक केवळ मोठी उपलब्धी आहे इतकेच म्हणता येईल.
अल्काराझचे वडीलही टेनिस अकादमी चालवतात आणि त्याचाच तो पहिला विद्यार्थी आहे. त्याचे संपूर्ण कुटुंबच टेनिसला वाहून घेतलेले आहे. कारण त्याचे वडील टेनिस कोच आहेत, तर आजोबा हे क्लब मेंबर होते. त्यामुळे त्याला टेनिसचे धडे घरूनच मिळाले हे सत्य आहेच. त्यामुळे घरीच त्याची जडणघडण झाली. अल्काराझकडे लहानपणापासून स्पष्ट दृष्टिकोन होता की, त्याला उच्च दर्जाचे टेनिस खेळायचे आहे आणि त्याने ते साध्य केले. जसे की आपल्याकडे सुनील गावसकर किंवा आताचा वैभव सूर्यवंशी यांच्याकडे लहानपणापासूनच तसा दृष्टिकोन आहे तसेच.
अर्थात या सर्वांना आयत्या ताटात सारे काही वाढून मिळालेले नाही. त्याना त्यांचा संघर्ष करावाच लागला आहे. सुनील गावसकर तर कापडाचे चेंडू करून बिल्डिंगच्या गॅलरीत प्रॅक्टिस करायचा असे त्याच्या आत्मचरित्रात लिहून ठेवले आहे. अर्थातच भारतीयांची आणि पाश्चात्यांच्या जीवनशैलीत प्रचंड फरक असल्याने गरीब-श्रीमंतीतील अंतर आणि इतर बाबतीतील फरक जाणवतोच. पण ज्याला खेळाप्रती पॅशन म्हणतात ते तर सारखेच असते.
अल्काराझ हा क्ले कोर्टवरील नवा उगवता तारा असला आणि त्याने मोठ्या बक्षिसाची स्पर्धा जिंकली असली तरीही त्याने आपल्या डोक्यात हवा जाऊ दिली नाही हे विशेष. जसे आपल्याकडे गावसकर यांच्यापासून प्रेरणा घेऊन अनेक क्रिकेटपटू घडले तसेच अल्काराझ याच्यापासून प्रेरणा घेऊन स्पेनमधील लहान मुले दुसरा अल्काराझ होण्याची स्वप्ने उराशी बाळगून लढत आहेत.
ही कोणत्याही स्पोर्टसची कौतुकास्पद बाब असते. त्याने तीन वेगवेगळ्या प्रकारच्या पृष्ठभागांवर टेनिस स्पर्धा जिंकली आहे हे त्याचे वैशिष्ट्य. टेनिसपटू हे जनमानसात लवकर आपला ठसा उमटवतात. सचिन तेंडुलकर त्याच्या बालपणात क्रिकेट खेळत असे तरी बिजॉन बोर्गचा फॅन होता आणि त्याचे सुरुवातीची छायाचित्रे तशाच हेअर स्टाइलची आहेत. अल्काराझ हा आज तरुणांचा ताईत बनला आहे आणि स्पॅनिश बालकाचा हिरो आहे अर्थात त्याच्या काही त्रुटीही आहेत.
त्यातील एक म्हणजे ग्रासकोर्टवरील त्याला बादशहा असा किताब मिळवायला अनेक सामने खेळावे लागतील, पण क्ले कोर्टचा तो बादशहा आहे आणि आज त्याला टेनिस विश्व मानते यातच सारी त्याची रोमांचकता आहे. त्याने अनेक आठवडे जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे आणि आता तर त्याने फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकून आपली बादशाही सिद्ध केली आहे. आजच्या काळातील सर्वोत्तम टेनिसपटूंपैकी तो निःसंशय एक आहे यात शंका नाही, क्ले कोर्टच्या बादशहाला मानाचा मुजरा.