Saturday, October 25, 2025
Happy Diwali

वाकण महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य

वाकण महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य

पाली-खोपोलीतील वाहनचालक, नागरिक त्रस्त

सुधागड-पाली : वाकण-पाली-खोपोली महामार्गावरील पाली येथे खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून, वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. महामार्गावरील दयनीय स्थितीमुळे प्रवास करताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. विशेषतः बिकानेर मिठाईच्या दुकानासमोरील खड्डे आणि विक्रम स्टँडच्या समोरील खड्डे हे मोठ्या प्रमाणावर वाढले असून, यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.

पाली शहरातील हा महामार्ग वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असून, दररोज हजारो वाहने या मार्गावरून प्रवास करतात. मात्र, बिकानेर मिठाईच्या दुकानासमोरील मोठा खड्डा आणि विक्रम स्टँडच्या समोरील खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या खड्ड्यांमुळे दुचाकीस्वार आणि चारचाकी वाहनचालकांना वेग कमी करून सावधगिरीने मार्गक्रमण करावे लागत आहे. अनेकदा अचानक ब्रेक लावल्याने मागील वाहनांची धडक लागण्याचा धोका निर्माण होतो.

सध्या पावसाळा तोंडावर आला असताना, महामार्गावरील खड्डे बुजवणे अत्यंत आवश्यक आहे. पावसाच्या पाण्यामुळे हे खड्डे अधिक खोल होऊन मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता आहे. मात्र, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) या समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र दिसत आहे.

नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी केल्या असल्या तरी अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांनी एमएसआरडीसीने त्वरित दखल घेऊन महामार्गावरील खड्डे बुजवावेत, अशी मागणी केली आहे. पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती न झाल्यास वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होईल आणि अपघातांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. प्रशासनाने तक्रारींची वाट न पाहता तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Comments
Add Comment