अंध बालकांचा डोळस प्रवास

डॉ. राणी खेडीकर : अध्यक्ष, बाल कल्याण समिती पुणे


सोनू, हातातली पांढरी काठी टक टक वाजवत शाळेचा गणवेश घातलेली दहा-बारा वर्षांची बालिका माझ्या जवळ चालत येऊ लागली. तिच्या चेहऱ्यावर वेगळीच प्रसन्नता आणि निरागसता होती. मी उगाच खुर्चीतून उठायला गेले आणि ती म्हणाली, "कशाला उठताय तुम्ही बसा ना". तिचा अगदी गोड आवाज कानावर पडला. गोड आवाज, गोड चेहरा, डोळे तेवढे भाव शून्य होते. डोळ्यांत काळोख असला तरी वागणं किती डोळस होतं तिचं. आज मुलींच्या अंध विद्यालयात आले होते. अगदी सहज मुलींना भेटायला. आपल्या आसपास छोट्या छोट्या मुली ज्यांना काहीही दिसत नाही, पांढऱ्या काठीच्या टक टक आवाजात त्या आपलं विश्व शोधतात. आपला प्रवास निश्चित करतात आणि आपलं ध्येय पण गाठतात. किती डोळस आहे हा काळोख.


जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दृष्टिदोषाची व्याख्या अंशतः दृष्टीपासून अंधत्वापर्यंतची स्थिती म्हणून केली आहे. आपल्याला अंध व्यक्तींची दोन प्रकारात वर्गवारी करून घेऊन समजून घेता येईल.
१. पूर्णतः अंध व्यक्ती - हे अंधार व प्रकाश यातला फरक ओळखू शकत नाही. यांना एका प्रकाश असणाऱ्या खोलीत बसवले आणि तेथील दिवा बंद केला तरी त्यांना अंधाराची थोडीसुद्धा जाणीव होत नाही.
२. अंशतः अंध व्यक्ती - डोळ्याला एखादी इजा झाल्यामुळे किंवा एखाद्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे काही प्रमाणात अंध झालेल्या व्यक्ती असतात. यांना दिसण्याची टक्केवारी प्रत्येक व्यक्तीनुसार कमीजास्त असू शकते.


आकडेवारी सांगते की संपूर्ण जगात असलेल्या ३.७ कोटी अंधांपैकी १.५ कोटी अंध एकट्या भारतातच आहेत आणि योग्य उपचार मिळाले असते तर त्यापैकी ७५ टक्के रुग्ण अंध होण्यापासून टाळता आले असते. भारताला दरवर्षी २.५ लाख नेत्रदान केलेल्या डोळ्यांची आवश्यकता भासते. पण भारतात असलेल्या १०९ नेत्रपेढींमधून दरवर्षी फक्त २५ हजारच नेत्र जमा केले जातात आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे त्यांपैकी ३० टक्के नेत्र हे विविध कारणांमुळे वापरता येत नाहीत.


अनेक अंध बालक बालिका, कोणीतरी व्यक्ती आपले नेत्रदान करतील आणि आपण हे जग बघू शकू या प्रतीक्षेत ओळीत थांबली आहेत. पण त्यांना देखील याची निश्चितच जाणीव असते की, नेत्र मिळणं इतकं सहज शक्य नाहीय. आणि मग सुरू होतो त्यांचा डोळस प्रवास. ब्रेल लिपीच्या माध्यमातून शिक्षण सुरू होतं. निसर्ग एखादी शक्ती हिरावून घेते तेव्हा एखादी शक्ती देऊन पण जाते, असा समज आहे. कितीतरी अंध बालक बालिका सुरेल गळ्याचे धनी असतात. संगीत विषयात त्यांना खूप आवड असते. भाषा ज्ञान, स्पर्श ओळख, वास ओळखण्याची शक्ती यात ते पारंगत असतात. स्पर्शाने, एखाद्या विशिष्ट वासाने अंध व्यक्ती कोणालाही ओळखू शकतात. समाज एकतर दयेचा दृष्टिकोन ठेवतो किंवा अंध म्हणून त्यांचे शोषण करण्याची वृत्ती दिसून येते.


अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला, रेल्वेत, सार्वजनिक स्थळी अंध व्यक्तीचा गट गाणी गाताना दिसून येतो. त्यांच्याकडे उपलब्ध वाद्ये पण ते उत्तम प्रकारे वाजवताना दिसून येतात. पण आजच्या परिस्थितीत अंध बालक, बालिका शिक्षण घेऊ लागले आहे. म्हणून भविष्यात त्यांचे पुनर्वसन कसं होईल याची ठोस आखणी करण्याची गरज आहे. शाळा, कॉलेज आणि सार्वजनिक वाचनालयांमध्ये ब्रेललिपीतील पुस्तके पुरेशा प्रमाणात उपलब्ध असायला हवी आहे. शाळा- कॉलेजातील अभ्यासक्रम बनवताना अंधही सहजरीत्या शिकू शकतील याकडे गंभीरतेने लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे. शिकवताना पुरेसे प्रशिक्षित शिक्षक उपलब्ध होतात का? आणि त्यामुळे अंधांचे मूलभूत अधिकार त्यांना प्राप्त होण्यास अडचण निर्माण होत आहे का.


याचा पण विचार व्हायला हवा. अंधांमधील असणाऱ्या शारीरिक कमतरतेमुळे बेरोजगारीचे प्रमाणही त्यांच्यात जास्त आहे, असे दिसून येते.शिक्षण घेण्यास त्यांना प्रवृत्त करायला हवं. यासाठी अंध बालकांसाठी निवासी शाळांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यांच्या वाट्याला आलेला हा अंधकार आणि या अंधकारात चाचपडत आपला प्रकाश दिवा शोधणारी ही बालके आपल्याला मायेचा विश्वासाचा स्पर्श मागत आहेत. आपण हात पुढे करू या आणि फक्त त्यांचे मनोबल आणि आत्मविश्वास कमी होणार नाही याची काळजी घेऊ या. ते सक्षम आहेतच आपलं ध्येय गाठण्यात आपण फक्त त्यांच्या मार्गातील अडथळे दूर करण्यासाठी खारीचा वाटा घेऊ या. आपल्या दररोजच्या आयुष्यात थोडी सवय करू यांच्याशी कनेक्ट होण्याची. प्रवासात भेटले तर चार दोन रुपये भिक्षा देऊन निघून जाण्यापेक्षा बालक बालिकाना अंध शाळेत पाठवण्यात यावं याची माहिती त्यांच्या पालकांना देता येईल का? तिथे ते सुरक्षित राहून शिक्षण घेतील आणि सन्मानाने जीवन जगू शकतील. रेल्वेतला त्यांच्या सोबतचा आपला प्रवास संपेपर्यंत ही माहिती निश्चितच आपण त्यांना देऊ शकतो.


सध्या अंधांकरिता आशावादी चित्र दिसते आहे. असे सकारात्मक प्रयत्न शासनाकडून होत असताना दिसत आहेत. अंधांकरिता सरकारी नोकऱ्यांमध्ये, सार्वजनिक प्रवासांच्या वाहनांमध्ये आरक्षण ठेवले जाते. प्रवासभांड्यामध्ये त्यांना सवलत दिली जाते. आज काही अंध upsc, mpsc पास होऊन सरकारी अधिकारीही झालेले दिसताहेत. बँकाच्या परीक्षा देऊन बँकेत त्यांची अधिकारी पदावर नेमणूक होत आहे. अंधशाळांची संख्याही वाढते आहे. फक्त अंधांसाठी असलेल्या काही निवासी सेवाभावी संस्थांमध्ये त्यांच्या राहण्या-खाण्यासहित शिशुवर्ग ते आठवीपर्यंत शिक्षणाची मोफत सोय होत आहे.


तेथे त्यांना गायन, वादन, मल्लखांब, शारीरिक कसरत करण्याकरिता प्रोत्साहित केले जाते. तेथे फक्त अंधांकरिता खेळांच्या स्पर्धांही घेण्यात येतात. त्यांना काही स्वयंरोजगाराचे प्रशिक्षणसुद्धा देण्यात येते. अंधांचे जीवन सुखकर होण्याकरिता आज माहिती तंत्रज्ञानाचा मोठ्या खुबीने वापर केला जातोय. कॉम्प्युटरच्या वेगवेगळ्या अ‍ॅप्लिकेशनच्या मदतीने अंधव्यक्ती आता लिहू, वाचू आणि शिकूही शकत आहेत. कॉम्प्युटर प्रोग्रामर बनून नोकऱ्याही पटकावताहेत. टायपिंग करून विंडोजचे वर्ड आणि एक्सेल वापरतायत. खास ब्रेल लिपीचे प्रिंटर वापरून पुस्तकेही लिहीत आहेत.


लेखक कवी म्हणून नावरूपाला येत आहेत. रीनाताई पाटील यांनीच मला या शाळेची माहिती दिली होती. त्यापण याच अंध शाळेच्या विद्यार्थिनी आहेत. त्यांच्या यशस्वी प्रवासाची कथा सांगणारा एक लेख मी लिहिला होता. त्या आज बँकेत अधिकारी आहेत आणि माझ्या मैत्रीण पण आहेत. त्यांच्या अनेक उपक्रमात मी सहभागी असते. आम्ही सगळे बाईपण भारी देवा हा सिनेमा बघायला गेलेलो. तेव्हा अगदी जवळून अनुभवलं होतं काहीही दिसत नसताना इतका आनंद त्या सगळ्या अंध महिला घेत होत्या.त्यांचा तो आत्मविश्वास भारी होता. स्वतः रोहिणी हतंगडी ताईंनी सगळ्यांना फोनवर शुभेच्छा दिल्या, तेव्हा त्यांचा उत्साह गगनात मावेनासा झाला होता. आपले दोन शब्द, थोडीशी साथ हा अंधार प्रकाशमय करू शकते.


सोनू माझ्या जवळ येऊन बसली आणि तिने माझा हात हातात घेतला. माझा स्पर्श साठवून घेत असावी कदाचित. मग म्हणाली, "तुम्ही सोनचाफा लावला आहे ना केसात". मी हो म्हणाले तेव्हा तिच्या चेहऱ्यावर पण एक सोनचाफा फुलला होता. आपला रंग सुगंध घेऊन आता सोनू पण सज्ज होती बहरण्यासाठी.

Comments
Add Comment

अलविदा १९४२

निरोप नव्हे... हा तर नवीन लढा स्वमालकीचा, अस्तित्वाचा. बेस्टच्या स्वमालकीचा बसगाड्यांचा ताफा पुढील काही दिवसांतच

सौदी-पाक कराराचा भारतावर परिणाम किती?

सौदी अरेबिया आणि पाकिस्तानमध्ये अलीकडेच काही संरक्षणात्मक करार झाले आणि त्याचबरोबर

‘बुडता’ पंजाब

निसर्गाशी प्रतारणा केल्यास काय होते, हे मराठवाडा, विदर्भापासून थेट-काश्मीरपर्यंत पाहायला मिळाले. हिमालयाजवळील

सायबर क्राईम: अदृश्य शत्रूची ओळख

या लेखात आपण सायबर क्राईम म्हणजे काय, त्याचे प्रकार, अशा गुन्हेगारांची मानसिकता आणि त्यापासून बचाव

निसर्गाच्या सान्निध्यात तणावमुक्तीसाठी चला!

आपल्याला मानसिकदृष्ट्या तणावमुक्त होण्यासाठी निसर्गाच्या सान्निध्यात भटकंती करायला हवी. त्यासाठी निसर्गरम्य

दुरवस्था उड्डाणपुलांची, कोंडी मुंबईकरांची

गेल्याच आठवड्यात मुंबईतील एक महत्त्वाचा उड्डाणपूल बंद झाला. हा पूल बंद झाल्यामुळे मुंबईकरांच्या त्रासात आणखी