
NCP नेते बाबा सिद्दीकी हत्याकांडातील (Baba Siddiqui murder Case) मास्टरमाइंड जीशान अख्तर ऊर्फ जस्सी पुरेवालला कॅनडाच्या सरे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मुंबई पोलीस दलातील सूत्रांनी याची पुष्टी केली. जीशान पंजाबच्या जालंधरचा राहणारा आहे. तो लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित आहे. तो बाबा सिद्धिकी यांच्या हत्येच्या कटात सहभागी होता.
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमागील कथित सूत्रधार झीशान अख्तरला मंगळवारी कॅनडामध्ये ताब्यात घेण्यात आले. जीशान हत्येनंतर फरार झाला होता. कथित पाकिस्तानी डॉन शहजाद भट्टीच्या मदतीने तो कॅनडात पोहोचला. मुंबई पोलीस आता त्याचं प्रत्यर्पण करुन त्याला भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू करण्याची शक्यता आहे. दरम्यान कॅनडा पोलिसांनी जीशान अख्तरला कुठल्या आरोपांखाली अटक केली आहे, त्याची अद्याप पुष्टी झालेली नाही.
गेल्या वर्षी बाबा सिद्दीकी यांची केली होती हत्या
१२ ऑक्टोबर २०२४ च्या रात्री मुंबईतील वांद्रे (पूर्व) येथील त्यांचा मुलगा, माजी आमदार झिशान सिद्दीकीच्या कार्यालयाबाहेर तीन हल्लेखोरांनी ६६ वर्षीय सिद्दीकी यांची गोळ्या घालून हत्या केली. गेल्या वर्षी बाबा सिद्दीकी यांच्या हत्येत सहभागी आणि हल्ल्यासाठी आवश्यक शस्त्र हाताळण्याचा आरोप अख्तरवर आहे. गुन्ह्याचे नियोजन आणि अंमलबजावणी करण्यात अख्तरची महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे मानले जाते.