Saturday, October 25, 2025
Happy Diwali

ठाण्यात २२ बेरोजगारांची फसवणूक

ठाण्यात २२ बेरोजगारांची फसवणूक

विमानतळावर नोकरीचे प्रलोभन; भाजपाकडून उघडकीस 

ठाणे : ठाणे रेल्वे स्थानकाबाहेरील कृष्णा प्लाझा या इमारतीत असलेल्या एका संस्थेने एअर होस्टेस, केबिन क्रू किंवा विमानतळावर ग्राउंड स्टाफसाठी ४० ते ५० हजार रुपयांच्या नोकरीचे प्रलोभन दाखवून २२ बेरोजगार तरुण-तरुणींची फसवणूक केल्याची बाब भाजपाने उघडकीस आणली. या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. बेरोजगार उमेदवारांकडून प्रत्येकी एक ते दीड लाख रुपये प्रशिक्षण शुल्क आकारण्यात आले होते. या तरुणांना नोकरी म्हणून वेटर व लोडर पदासाठी ऑफर देण्यात आली.

ठाणे रेल्वे स्टेशनजवळील कृष्णा प्लाझा या इमारतीत चौथ्या मजल्यावर नॅशवील एव्हिएशन संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विमानतळावर नोकरीचे प्रलोभन दाखविले होते. प्रत्येक विद्यार्थ्याकडून किमान ८० हजार ते दीड लाखांपर्यंत शुल्क उकळण्यात आले. या विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर पीडीएफ फाईल पाठवून प्रशिक्षण घेण्यास सांगितले. त्यानंतर आठवड्यातील तीन दिवस वेगवेगळ्या प्रशिक्षकांच्या माध्यमातून माहिती देण्यात आली. या संस्थेत नवीन सेंटर हेड म्हणून आलेल्या प्रतिभा ढिवार यांनी विद्यार्थ्यांना विमानतळावर वेटर व लोडरच्या नोकरी असल्याचे सांगितले. त्यानंतर नॅशवील एव्हिएशनच्या माध्यमातून बेरोजगार तरुण-तरुणींना १० ते १२ हजार रुपयांच्या पगाराच्या ऑफर येत होत्या. त्यानंतर या तरुण-तरुणींनी संस्थेकडे पैसे परत देण्याची मागणी केली. त्या वेळी त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली.

तक्रारदारांनी भाजपाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांच्या कार्यालयात धाव घेतली. त्यानंतर संजय वाघुले यांनी संस्थेच्या कार्यालयात बेरोजगारांसह येऊन संस्थाचालकांकडे सर्व विद्यार्थ्यांचे पैसे परत देण्याची मागणी केली. याप्रकरणी बेरोजगार तरुणीच्या तक्रारीवरून नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी संजय वाघुले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांना पत्र पाठवून ठाणे रेल्वे स्टेशन परिसरातील बोगस प्रशिक्षण संस्था व प्लेसमेंट एजन्सींवर कारवाईची मागणी केली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा