Tuesday, June 17, 2025

Los Angeles Protests : लॉस एंजेलिसमधील आंदोलन तीव्र, लॉस एंजेलिस का पेटतंय?

Los Angeles Protests : लॉस एंजेलिसमधील आंदोलन तीव्र, लॉस एंजेलिस का पेटतंय?

लॉस एंजेलिस : स्थलांतराच्या प्रश्नावरून लॉस एंजेलिस पेटतंय...आंदोलनांमुळे धगधगतंय. कस्टम्स एन्फोर्समेंटने स्थलांतरांविरोधात कारवाया सुरू केल्या. अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत. त्यामुळे हजारो लोक रस्त्यावर उतरले. त्यातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नॅशनल गार्डचे जवान तैनात करून आगीत तेल ओतलंय. अमेरिकेच्या कृतीचा कॅलिफॉर्नियाच्या महापौरांनी निषेध केलाय. नेमकं लॉस एंजेलिसमध्ये काय घडतंय, आंदोलनामागची काय आहेत कारणं, चला जाणून घेऊयात या लेखातून...


?si=qzYT0oFvX8OFfPPc

लॉस एंजेलिस शुक्रवारपासून धगधगतंय. कस्टम्स एन्फोर्समेंटने स्थलांतरां विरोधात अनेक ठिकाणी धडक कारवाई सुरू केलीय. होम डेपो, डोनट शॉप आणि फॅशन डिस्ट्रिक्टमधील एका वेअर हाऊसवरही छापे टाकले. या ठिकाणी स्थलांतरितांना लक्ष्य करण्यात आलंय. मात्र या कारवाईला तीव्र विरोध झाला. हजारो लोक रस्त्यावर उतरेल. त्यांनी कस्टम्स एन्फोर्समेंटच्या गाड्या अडवल्या. रास्तारोको केला, गाड्या पेटवल्या. त्यामुळे आंदोलनावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा आणि रबरी गोळ्यांचा वापर केला. तरीही आंदोलनाची झळ पॅरामाऊंट आणि कॉम्प्टन यांसारख्या जवळच्या शहरांना बसली. कस्टम्स एन्फोर्समेंटने पॅरामाऊंटमधून बाहेर पडा, तुमचं इथे कुणीही स्वागत करणार नाही अशा घोषणाही आंदोलकांनी दिल्या. मात्र तरीही छापेमारी सुरूच राहिली. परिणामी आंदोलन चिघळलं. पोलिसांनी आंदोलन बेकायदा ठरवत अनेकांना अटक केली. तर अशा प्रकारची कारवाई सुरू राहिली तर मोठा गोंधळ उडेल, असं पॅरामाऊंटच्या महापौर पेगी लेमन्स यांनी म्हटलंय.



डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटीने दिलेल्या माहितीनुसार, या आठवड्यात कस्टम्स एन्फोर्समेंटने ११८ स्थलांतरितांना अटक केली. त्यापैकी ४४ जण शुक्रवारीच्या कारवाईत पकडले गेले. यात काही अमेरिकन नागरिकांचाही समावेश होता. विशेष म्हणजे यात ५ जण हे गुन्हेगारी संघटनांशी संबंधित होते. त्यातच सर्व्हिस एम्प्लॉईज इंटरनॅशनल युनियनचे प्रादेशिक अध्यक्ष डेव्हिड ह्युएर्टा यांनाही आंदोलनादरम्यान अटक करण्यात आलीय तर ही छापेमारी पुढील ३० दिवस चालेल असा इशारा कॅलिफोर्नियाच्या नॅनेट बॅरागन यांनी दिलाय. त्यामुळे आंदोलक अधिक भडकले आहेत. तसंच शहरांमध्ये भीतीचं वातावरणही निर्माण झालंय.


लॉस एंजेलिसमध्ये आंदोलन सुरू असतानाच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आगीत तेल ओतलंय. आंदोलनं आणि हिंसाचार रोखण्यासाठी त्यांनी नॅशनल गार्डचे २,००० जवान लॉस एंजेलिसमध्ये तैनात केले. कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गॅविन न्यूसॉम यांच्या परवानगीशिवाय हा निर्णय घेण्यात आला.'जर गव्हर्नर गॅविन न्यूसॉम आणि महापौर करेन बास यांना कायदा आणि सुव्यवस्था राखता येत नसेल तर फेडरल सरकार हस्तक्षेप करेल, असा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावरून दिलाय. तर दुसरीकडे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी हिंसाचार थांबला नाही तर नौदलही तैनात केलं जाऊ शकतं, असा इशारा दिलाय. कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गॅविन न्यूसॉम यांनी ट्रम्प यांनी तैनात केलेल्या जवानांविरोधात नाराजी व्यक्त केलीय.


ट्रम्प यांनी ही जाणीवपूर्वक कृती केलीय आणि त्यांचा हा निर्णय परिस्थिती आणखी गंभीर करेल आणि लोकांचा विश्वास संपवेल, असं त्यांनी म्हटलं. लॉस एंजेलिसच्या महापौर करेन बास यांनीही ट्रम्प प्रशासनावर टीका केलीय. होम डेपो आणि अन्य ठिकाणांवर छापे टाकून भीती आणि गोंधळ पसरवला जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय. तर जवान तैनात करण्यामागे अमेरिकेचा राजकीय हेतू आहे, ते मार्शल लॉ लादण्याचा प्रयत्न करत आहेत, असा गंभीर आरोप मॅक्सिन वॉटर्स यांनी ट्रम्प यांच्यावर केलाय. लॉस एंजेलिसमधील स्थलांतरितांवरी छापे, तीव्र आंदोलनं आणि नॅशनल गार्डचा हस्तक्षेप यामुळे तणाव शिगेला पोहोचलाय. कॅलिफोर्नियाचे नेते आणि नागरिक या फेडरल कारवाईविरोधात एकजुटीने लढत आहेत. मात्र आंदोलन शांत होणार, हिंसाचार थांबणार की आणखी चिघळेल? कायदा, सुव्यवस्था आणि मानवतेच्या या लढाईत पुढे काय होईल? हे पाहणं महत्त्वाचं आहे.

Comments
Add Comment