Tuesday, July 1, 2025

दिल्लीत घराला आग, जगण्यासाठी सातव्या मजल्यावरुन उडी मारणाऱ्या ३ जणांचा मृत्यू

दिल्लीत घराला आग, जगण्यासाठी सातव्या मजल्यावरुन उडी मारणाऱ्या ३ जणांचा मृत्यू
नवी दिल्ली : द्वारका सेक्टर तेरा मधील सबद अपार्टमेंट या निवासी इमारतीतील सातव्या मजल्यावर असलेल्या एका घराला आग लागली. आगीची झळ जाणवू लागताच घरात अडकलेल्या तीन जणांनी जीव वाचण्यासाठी थेट सातव्या मजल्यावरुन खाली उड्या मारल्या. हा निर्णय प्राणघातक ठरला. उड्या मारणाऱ्या तिघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एका पुरुष आणि त्याची दोन मुले अशा तीन जणांचा समावेश आहे.



आग लागल्याची माहिती सकाळी दहा वाजून एक मिनिटांनी अग्निशमन दलाला मिळाली. माहिती मिळताच तातडीने अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळासाठी रवाना झाले. अग्निशमन दलाच्या एकूण आठ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. वाऱ्यामुळे आग झपाट्याने पसरली आणि पूर्ण सदनिकेने पेट घेतला. अग्निशमन दलाने तातडीने कारवाई करुन आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले आहे. इमारतीमधील काही रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार आग लागली त्यावेळी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना तातडीने माहिती देण्यात आली. पण पदाधिकाऱ्यांनी त्वरेने कोणताही निर्णय घेतला. यामुळे वेळ वाया गेला. अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार आग प्रकरणी नियमानुसार चौकशी होईल आणि दोषींवर कारवाईची शिफारस केली जाईल.
Comments
Add Comment