भाजपाचे ऑपरेशन बंगाल!

अभय गोखले


पंतप्रधान नरेंद्र मोदीं पाठोपाठ, गृहमंत्री अमित शहा यांनी पश्चिम बंगालचा दौरा करून २०२६ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजवले आहे. पश्चिम बंगालमधील भाजपा नेत्यांनी त्याला ऑपरेशन बंगाल असे नाव दिले आहे.


गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या पश्चिम बंगाल दौऱ्यात ज्याप्रकारे आक्रमक भाषण केले आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना टार्गेट केले, ते पाहता, या खेपेच्या विधानसभा निवडणुकीत, भाजपा, सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला हरविण्यासाठी आपली संपूर्ण ताकद पणाला लावणार हे निश्चित आहे. पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथील दंगलीत तेथील हिंदूंना ज्या प्रकारे टार्गेट करण्यात आले, ते लक्षात घेता, भाजपाच्या निवडणूक प्रचारात, मुर्शिदाबाद दंगलीच्या मुद्द्यावर जोर देण्यात येईल, याबाबत शंका बाळगण्याचे कारण नाही.


अपेक्षेप्रमाणे अमित शहा यांनी आपल्या भाषणात, मुर्शिदाबाद येथील दंगलीचा उल्लेख करून, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर सडकून टीका केली. शहा यांनी आरोप केला की, बांगलादेशमधून भारतात होणाऱ्या घुसखोरीला ममता बॅनर्जी या प्रोत्साहन देत असून, त्यांनी या घुसखोरांना आपली व्होट बँक बनवली आहे. बांगलादेशमधून होणारी घुसखोरी थांबवण्यासाठी केंद्र सरकारने सीमेवर कुंपण घालण्यासाठी ममता बॅनर्जी यांच्याकडे जमीन मागितली असता त्यांनी ती दिली नाही, असा गंभीर आरोप शहा यांनी ममतांवर केला.


वक्फ कायद्याच्या विरोधात पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथे जे आंदोलन करण्यात आले, त्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आणि खासगी व सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आले. या दंगलीत तृणमूल काँग्रेसच्या काही नेत्यांचा सहभाग होता, असा आरोप भाजपाकडून करण्यात आला आहे. दंगलीमध्ये एका हिंदू कुटुंबातील दोघांची हत्या करण्यात आली. यावेळी पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली, असा आरोप भाजपाकडून करण्यात आला आहे.


हल्लेखोरांनी इतकी दहशत निर्माण केली की बऱ्याच हिंदूंना आपले घरदार सोडून, दुसरीकडे आश्रय घ्यावा लागला. पोलीस निष्क्रिय झाल्याने दंगल आटोक्यात आणण्यासाठी केंद्र सरकारकडून सीमा सुरक्षा दल तैनात करण्याबाबत पश्चिम बंगाल सरकारकडे विचारणा करण्यात आली, परंतु पश्चिम बंगाल सरकारने त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला नाही.


अखेर हिंदूंचे संरक्षण करण्यासाठी काही भाजपा नेत्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली. नंतर न्यायालयाने आदेश दिल्यामुळे, पश्चिम बंगाल सरकारने सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना मुर्शिदाबाद येथे तैनात करण्यास परवानगी दिली. सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना तेथे तैनात केल्यानंतर, त्यांनी लगेचच दंगल आटोक्यात आणली.


मुर्शिदाबाद येथील दंगलीत बांगलादेशी घुसखोरांचा सहभाग होता ही गोष्ट पुरेशी सिद्ध झाली आहे. या घुसखोरांना ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सरकारची फूस असल्याने ते असे धाडस करू शकतात. या घुसखोरांची व्होट बँक ममता बॅनर्जी यांच्या मदतीला असल्यानेच २०११ पासून आजतागायत त्या पश्चिम बंगालमधील विधानसभेच्या निवडणुका मोठ्या मताधिक्याने जिंकत आहेत.


पश्चिम बंगालमध्ये मुस्लीम मतदारांची संख्या साधारणपणे ३० टक्क्यांच्या आसपास आहे. बांगलादेशातून सतत होणाऱ्या घुसखोरीमुळे मुस्लीम मतदारांची संख्या कमालीची वाढली आहे. १९७७ ते २०११ पर्यंत प्रदीर्घ काळ पश्चिम बंगालमध्ये सत्तेवर असलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची वाताहत झाल्यानंतर, मुस्लीम समाजाने आपली सर्व ताकद ममता बॅनर्जी यांच्या पाठीशी लावली आहे. काँग्रेसची ताकद एक-दोन जिल्ह्यांपुरती मर्यादित आहे.


पश्चिम बंगालमध्ये भाजपाला सत्तेपासून दूर ठेवायचे असेल तर ममता बॅनर्जी यांच्या पक्षाला मत देण्याशिवाय दुसरा पर्याय नाही ही गोष्ट तेथील मुस्लीम समाजाने बरोबर ओळखली आहे.त्यामुळेच तेथील मुस्लीम समाज ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला एकगठ्ठा मतदान करतो.


भाजपाने आजवर ममतांना पराभूत करण्यासाठी भरपूर जोर लावला; परंतु जोपर्यंत राज्यातील मुस्लीम समाज ममतांच्या पाठीमागे ठामपणे उभा आहे तोपर्यंत ममतांना पराभूत करणे अतिशय अवघड आहे, याची जाणीव भाजपाला असणारच.


ममता बॅनर्जी या खूप हुशार आहेत. आपली मुस्लीम व्होट बँक सांभाळण्यासाठी त्या कोणत्याही थराला जातील. त्यामुळे मुर्शिदाबाद येथील दंगल आटोक्यात आणण्याच्या बाबतीत ममता बॅनर्जी यांनी बोटचेपी भूमिका घेतली असेल तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. ममतांना पराभूत करावयाचे असेल तर भाजपाला आपले डावपेच बदलावे लागतील.

Comments
Add Comment

कामगारांच्या जीवावर उठलेले स्फोटक कारखाने

वार्तापत्र : विदर्भ कळमेश्वर तालुक्यात राउळगाव येथील एसबीएल स्फोटक कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटाने संपूर्ण

राष्ट्र, संस्कार आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी श्री गुरू तेग बहादुर यांची अमर शहादत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘‘जिन्हूं न निंदा दुखी करदी है, न उसतत खुश करदी हैः जो मान-अपमान नूं बराबर समझदा

राष्ट्रपतींच्या भेटीने शेगाव संत नगरीत चैतन्याचे वातावरण

वार्तापत्र : विदर्भ देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नुकतीच बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव या संतनगरीला

गडचिरोलीत नक्षलवाद्यांची स्मारके उद्ध्वस्त...

वार्तापत्र : विदर्भ गडचिरोली जिल्ह्यात केंद्रीय राखीव पोलीस दल आणि गडचिरोली जिल्हा पोलीस यांच्या संयुक्त

मिनी विधानसभेनिमित्ताने मोठी घुसळण

वार्तापत्र : दक्षिण महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्रातील (कोल्हापूर-सांगली) स्थानिक राजकारणात, विशेषतः सहकारी

परभणीत महापौर इक्बाल, तर उपमहापौर देशमुख

वार्तापत्र : मराठवाडा मराठवाड्यातील परभणी महानगरपालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेने मुस्लीम महापौर खुर्चीवर बसविला.