Friday, August 22, 2025

धक्कादायक! अमेरिकेत ऑस्ट्रेलियन पत्रकारावर पोलिसांनी झाडली गोळी; लॉस एंजेलिसमधील आंदोलने हिंसक वळणावर!

धक्कादायक! अमेरिकेत ऑस्ट्रेलियन पत्रकारावर पोलिसांनी झाडली गोळी; लॉस एंजेलिसमधील आंदोलने हिंसक वळणावर!

लॉस एंजेलिस : अमेरिकेतील लॉस एंजेलिस शहरात सध्या सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान, 9News या ऑस्ट्रेलियन न्यूज चॅनेलच्या प्रतिनिधी लॉरेन टोमासी यांना पोलिसांनी रबरची गोळी झाडल्याची गंभीर घटना घडली आहे. या निदर्शनांचा तिसरा दिवस असताना, टोमासी शहराच्या डाऊनटाऊन भागातील मेट्रोपॉलिटन डिटेन्शन सेंटरजवळ थेट रिपोर्टिंग करत होत्या.

थेट प्रक्षेपण संपवून काही सेकंद झाले होते, इतक्यात एका पोलिस अधिकाऱ्याने त्यांच्या दिशेने रबर बुलेट फायर केलं. टोमासी यांच्या पायाला ही गोळी लागली आणि त्या वेदनेने किंचाळल्या. सुदैवाने त्यांना गंभीर इजा झाली नाही, मात्र त्या वेदनेत होत्या. कॅमेरा लगेचच बाजूला वळवण्यात आला आणि थेट प्रक्षेपण थांबवण्यात आलं.

ही घटना त्या वेळी घडली, जेव्हा टोमासी आंदोलनकर्त्यांच्या गर्दीत अडकल्या होत्या. त्या आवाजाच्या पार्श्वभूमीवर रिपोर्टिंग करत असताना, अचानक एका आंदोलकाने त्यांच्या कॅमेऱ्यावर हात घातला होता. त्या म्हणाल्या, “पोलीस सतत लोकांना हा परिसर सोडण्यास सांगत आहेत, पण आंदोलक ऐकण्याच्या मन:स्थितीत नाहीत. येथे सतत रबर बुलेट्स आणि फ्लॅशबँग्सचा वापर सुरू आहे.”

9News च्या वतीने एका अधिकृत निवेदनात सांगण्यात आलं की, लॉरेन टोमासी यांना रबर बुलेटचा फटका बसला आहे. त्या आणि त्यांचा कॅमेरामन सुरक्षित आहेत आणि त्यांचं काम सुरूच राहील. ही घटना पत्रकारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मोठा इशारा आहे. त्यांनी समाजाला सत्य माहिती पोहोचवण्यासाठी घेतलेला धोका खूप मोठा आहे.

या घटनेवर ग्रीन्स पक्षाच्या सिनेटर सारा हॅनसन यंग यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. त्यांनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज यांना विनंती केली की, त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे याबाबत तातडीची चौकशी आणि उत्तर मागावं.

त्यांनी स्पष्टपणे सांगितलं, ऑस्ट्रेलियन पत्रकारावर गोळी झाडणे ही अतिशय धक्कादायक गोष्ट आहे. पत्रकारस्वातंत्र्य हे कोणत्याही लोकशाहीतील अत्यावश्यक स्तंभ आहे. यावर कठोर भूमिका घेणं गरजेचं आहे

ही घटना पुन्हा एकदा पत्रकारांच्या सुरक्षेवर आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे.

Comments
Add Comment