Thursday, October 23, 2025
Happy Diwali

Pandharpur : वारकर्‍यांना सुलभ दर्शनासाठी तुळशीपूजा बंद! वारकरी संप्रदायाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Pandharpur : वारकर्‍यांना सुलभ दर्शनासाठी तुळशीपूजा बंद! वारकरी संप्रदायाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

सोलापूर : श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना दर्शन रांगेत ६ ते ७ तास ताटकळत उभे राहावे लागले होते. यामुळे भाविकांनी मंदिर समिती विरोधात नाराजी व्यक्त करत घोषणाबाजी केली होती. तसेच वारकरी संप्रदायाने भाविकांच्या दर्शनात अडथळा आणणारी तुळशीपूजा बंद करण्याची मागणी केली होती. याची दखल घेऊन श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने प्रक्षाळपुजेपर्यंत ८० तुळशी पूजा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे भाविकांना सुलभ व जलद दर्शन मिळणार आहे.

भाविकांची नाराजी

श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी राज्यभरातून येणार्‍या भाविकांना सुविधा चांगल्या देण्यात याव्यात. यासाठी शासनाने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीची स्थापना केली आहे. मात्र, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती भाविकांच्या सुविधांकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. व्हिआयपी दर्शन, तुळशीपूजेला दर्शन बंद, यामुळे भाविकांना दर्शन रांगेत तासनतास ताटकळत उभे राहावे लागत आहे. त्यामुळे भाविकांना श्री विठ्ठल रुक्मिणीचे जलद दर्शन मिळत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

केवळ १० तुळशीपूजा सुरु राहणार

मागील चार दिवसापुर्वी दर्शनासाठी आलेल्या भाविकांना ६ ते ७ तास दर्शन रांगेत ताटकळत उभे राहावे लागले. यामुळे भाविकातून तीव्र संताप व्यक्त घोषणाबाजी करण्यात आली. तुळशी पूजेमुळे भाविकांना दर्शन रांगेत जास्त वेळ उभे राहावे लागले. म्हणून मंदिर समितीने विठ्ठलाची तुळशीपूजा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. दररोज विठ्ठलाच्या ९० तुळशी पूजा होत होत्या. आता ८० पूजा रद्द करण्यात आल्या आहेत. केवळ १० तुळशीपूजा सुरु राहणार आहेत. वारकर्‍यांची गर्दी वाढली, गरज भासली तर त्या १० तुळशीपूजा देखील बंद करुन जास्तीत जास्त वारकर्‍यांना दर्शन देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे मंदिर समितीकडून सांगण्यात आले.

भाविकांच्या गर्दीत होणार वाढ

दरम्यान, पुढच्या महिन्यात आषाढी यात्रा आहे. या निमित्ताने लाखो भाविक दर्शनासाठी पंढरपुरात दाखल होत असतात. शिवाय पायी दिंड्या देखील पंढरपूरमध्ये येत असतात. यामुळे भाविकांच्या आता किमान पुढील २ महिने भाविकांची गर्दी अधिक राहणार आहे. या अनुषंगाने आलेल्या भाविकांना लवकर दर्शन घेता यावे; यासाठी नित्य तुळशी पूजा बंद करण्याची मागणी होत आहे. यावर आता मंदिर समिती काय निर्णय घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >