
कथा : रमेश तांबे
एक होता उंदीर. तो एका घरात राहायचा. घरभर फिरायचा. मिळेल ते खायचा. कधी भाकरी-चपाती तर कधी डाळ-भात. कधी पिझ्झा कुरकुरे तर कधी उरलेले वडे. कधी कधी चक्क उपवास! अशा वेळी उंदीर पुस्तकं खायचा. कधी लाकडी दारं खायचा. पुस्तकं, वह्यांचे नुकसान झालं की माणसं उंदराच्या मागे लागायची. दिसला उंदीर की फटका द्यायची. दोन-चार वेळा उंदराला मार मिळाला, तेव्हा या घरात राहायचं नाही असे त्याने ठरवले काही! एके दिवशी तो सकाळीच बाहेर पडला आणि थेट मंदिरात शिरला. मंदिर होते खूप मोठे पण दरवाजे होते छोटे उंदराने आत पाहिले ते होते गणपती बाप्पाचे मंदिर. उंदीर गेला जवळ त्याला दिसली बाप्पाची मूर्ती अन् त्याच्या पुढे बसलेला उंदीर! आता मात्र उंदीर चक्रावला हे काय आहे एकदम देवाच्या जवळ कसा बसलाय? त्याने एक दोन वेळा ची ची केलं पण उंदीर जागचा हलेना, काय करावे उंंदराला कळेना. तेवढ्यात देवळात एक भक्त आला. देवाच्या पाया पडला अन् जाताना उंदराच्या कानात काही सांगून गेला. उंदराला कळेना लोक त्याच्याशी काय बोलतात. त्याला नमस्कार का करतात? त्याने त्याच्या अंगावरच उडी मारली पण तो जागचा हलला नाही आता उंदराने ठरवले आपणही बाप्पाच्या बाजूला बसू या. लोकांचे नमस्कार घेऊ या. भक्त आपल्या पाया पडतील. आपल्या कानात बोलतील. उंदीर स्वप्न पाहू लागला. आता आरामात जगूया मग काय उंदीर बसला बाप्पाच्या जवळ. फुलांच्या गादीवर अन् खाऊ लागला समोरचा मोदक तेवढ्यात एक मुलगी आली. आपल्या आईसोबत उंंदराला बघताच ओरडली आई गं उंदीर बघ! तोच पुजारी काका धावले मोदक खाणाऱ्या उंदराकडे रागाने पाहू लागले. मग त्यांनी अंगावरचे उपरणे मारले फेकून अंगावर कापड पडताच कसाबसा गेला पळून. अन् बघू लागला भिंतीवर उभा राहून दुसऱ्या उंंदराला ते काय करतात पण हाय रे दैवा! त्यांनी त्याला काढले पुसून गेले दोन मोदक ठेऊन!
बिचारा उंदीर विचार करून दमला अशी कशी वागतात ही माणसं? एकाची पूजा करतात अन् दुसऱ्याला खुशाल मारतात! भुकेलेली माणसं देवळाच्या बाहेर अन् देवाला मात्र पक्वान्नाचे ताट! दिवसभर त्याने माणसे पाहिली. बाप्पाच्या जवळ मुलांना पाहिले. तिथल्या उंदराला कुणीच नाही घाबरले! मग त्याला कळले तो नाही खरा ती फक्त मूर्ती आहे दगडाची!
आता उंदीर अनुभवातून शिकला. कोणी भक्त नसताना तिथे जातो अन् मोदक पेढ्यावर ताव मारतो उंदीर रोज असेच करतो आपले काम फत्ते करतो. लोकांना मोठा आनंद वाटतो आपला प्रसाद देवाकडे पोहोचतो!