संवाद एकाकी फुलाशी

सहजच : शुभांगी मांडे खारकर


त्या फुलाला कुणीतरी विचारलं, एकटा एकटा राहतोस कंटाळा नाही येत? भीती नाही वाटत? त्यावर ते चिमुकले फूल म्हणाले, अरे एकटा कुठे आहे मी? सकाळ झाली की गुंजन करत भवरा येतो की आणि आजूबाजूच्या झाडांची खबरबात मला देतो. दोन घटका त्याचंही मन मोकळं होतं आणि माझंही.


वारा तर सतत माझ्याभोवती रुंजी घालत असतो. कधी झुळूक बनून तर कधी सुसाट. पावसाला तर माझी इतकी काळजी की कितीही जोरात आला तरी माझ्या अंगावर मात्र हळुवार तुषार टाकतो बघ. पुरतात मला तेव्हढे आणि सकाळची कोवळी उन्हाची तिरीप माझी ख्यालीखुशाली विचारून भरकन बाजूला होते. आता सांग कुठे मी एकटा आहे?


आज सकाळी मात्र शाळेत जाताना एका मुलाने पायाने एक दगड इतक्या जोरात उडवला, की माझा तर जीवच घाबरला. लागला नाही मला तो दगड. पण नीट निरखून पाहिलं मी त्या लेकराकडे तेव्हा रडवेला चेहरा झाला होता रे त्याचा. आई रागावली होती की काय कुणास ठाऊक.


परवा तर मजाच झाली बघ. पांढऱ्या पांढऱ्या केसांची एक आजी डुलत डुलत माझ्याजवळ येऊन थांबली आणि खुदकन हसली! मी पण हसलो... काय आठवलं असेल रे तिला? अशी सोबत होते बघ मला, मग मी एकटा कसा?


ते बघ, ते आजोबा येत आहेत ना... अरे समोर बघ ना, वेंधळाच आहेस अगदी. अरे हे जवळ येऊन थांबले आहेत ना, ते आजोबा... रोजच माझ्या जवळ येऊन थांबतात, मग डोळे पुसत पुसत पुढे निघून जातात. मला पण वाईट वाटतं बघ. पण विचारणार कसं? कुणाच्या आठवणीने असे उदास होत असतील रे? पाहिलंस, किsssती वेळ झाला तुझ्याशी गप्पा मारत बसले आहे मी. तू तुझ्या बाटलीमधलं पाणी दिलंस मला आणि फोटो तर सतत काढतच आहेस. कसे आले आहेत ते फोटो?


आता नाही ना मी एकटा वाटत? अरे एकटं कुणी नसतच या जगात. माणसं, झाडं, प्राणी, पक्षी, सूर्य, चंद्र, चांदण्यांनी भरलेलं आभाळ कळलं...!


आणि एक सांगू एकटं असलं तरी चालतं रे पण कुणी एकाकी होऊ नये इतकच...!

Comments
Add Comment

क्रिकेटमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

तंत्रवेध : डॉ. दीपक शिकारपूर आज क्रिकेट सामन्याप्रसंगी तसेच नंतर ॲक्शन रिप्ले आणि हायलाईट्सच्या माध्यमातून

साहित्यातला दीपस्तंभ - वि. स. खांडेकर

कोकण आयकॉन : सतीश पाटणकर विष्णू सखाराम खांडेकर हे मराठी साहित्यातील एक अग्रगण्य कादंबरीकार, एक लोकप्रिय

ए मेरे दिल कहीं और चल...

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे प्रत्येकाच्या जीवनात असा एखादा क्षण येऊन गेलेलाच असतो की जेव्हा त्यावेळी

वंदे मातरम्’ मातृभूमीचे सन्मान स्तोत्र

विशेष : लता गुठे भारतीय संस्कृतीचा विचार जेव्हा मनात येतो, तेव्हा अनेक गोष्टी मनात फेर धरू लागतात. अतिशय प्राचीन

पारिजातक वृक्ष पृथ्वीवर येण्याची कथा

महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे पारिजातकाला स्वर्गातील वृक्ष असेही म्हटले जाते. पारिजात हा एक सुगंधी

घर जावई

क्राइम : अॅड. रिया करंजकर लग्न या संस्काररूपी संस्थेवरून तरुणांचा विश्वास उडत चाललेला आहे. शादी का लड्डू नही खावे