मार्कंडेय ॠषीला मायेचे दर्शन

  42

महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे


पद्म पुराणातील उत्तराखंडानुसार भृगू वंशातील मृकुंड ऋषी व पत्नी मरुदमती यांना अपत्य नव्हते, दोघांनी भगवान शंकराची आराधना केली. शंकराने प्रसन्न होऊन त्यांना कसा मुलगा हवा असे विचारणा केली, चिरंजीव पण गुणहीन की बुद्धिवान पण अल्पजीवी. मृकुंड ऋषींनी बुद्धिमान मुलाची इच्छा व्यक्त केली. भगवान शंकराने तथास्तु म्हणून तुला बुद्धिमान परंतु सोळा वर्षांचे आयुष्य असलेला मुलगा होईल अशा आशीर्वाद दिला. त्याप्रमाणे मार्कडेय यांचा जन्म झाला.


मार्कंडेय लहानपणापासून अतिशय धर्मशील व सात्त्विक वृत्तीचे होते. मृकुंड ऋषींनी त्यांच्यावर द्विज्याला आवश्यक ते सर्व संस्कार केले. ते सतत शिवाच्या आराधनेत व्यस्त असत. जसजसे मार्कंडेय सोळा वर्षांत पदार्पण करू लागले तसतशी मृकुंड ऋषी व त्यांच्या पत्नीच्या चेहऱ्यावर दुःखाची छाया दिसू लागली. तेव्हा मार्कंडे याने याचे कारण विचारले असता ऋषींनी त्याचे आयुष्य सोळा वर्षांचेच असल्याचे सांगितले व याचमुळे आपण निराश व दुःखी असल्यास सांगितले. तेव्हा मार्कंडेयने आपणास काहीही होणार नाही आपण काही काळजी करू नये असे सांगून मृकुंड ऋषींची सांत्वना केली.


मार्कंडेय सत्त्व कठोर शिव आराधना करू लागले, १६ वे वर्षे पूर्ण होण्याच्या दिवशी ते भगवान शंकराच्या पिंडीसमोर बसले. यमराज त्यांना नेण्यासाठी येताच त्यांनी शिवाचा धावा करीत पिंडीला मिठी मारली. यमराजाने आपला फास त्यांच्याभोवती टाकला, तो पिंडीभोवती ही बसला. त्याच क्षणी पिंडीतून साक्षात भगवान प्रकट होऊन त्यांनी यमाला माझ्या भक्ताला नेण्याचे धारिष्ट आपण कसे करता असे म्हणून लाथ मारून दूर ढकलले व मार्कंडेयाला अमर होण्याचा आशीर्वाद दिला.


श्रीमद्भगवत पुराणानुसार मार्कंडेय ऋषींनी ब्रह्मचर्य व्रत धारण करून तप केले.ते झाडांच्या साली वस्त्र म्हणून नेसत असत. मस्तकावर जटा तर हातात कमंडलू असे.दररोज सकाळ-संध्याकाळ भिक्षा मागून ती प्रथम गुरूला अर्पण करीत व गुरूच्या आज्ञेनेच भोजन करीत अन्यथा उपवास घडत असे. अशा प्रकारे कठोर तपश्चर्या करून ते महायोगाद्वारे आपले चित्त भगवंताशी एकरूप करीत राहिले.


अशी सहा मन्वंतरे झाली. त्यामुळे इंद्र भयभीत झाला. त्याने मार्कंडेयांच्या तपश्चर्येत विघ्न आणण्यासाठी अप्सरा, गंधर्व, लोभ, मद व कामदेव यांना पाठवले; परंतु अनेक प्रकारे प्रयत्न करूनही ते अपयशी ठरले. अखेर त्यांचे तप पाहून स्वतः हरी, नर-नारायण स्वरूपात त्यांच्यासमोर प्रकट झाले. मार्कण्डे याने त्यांचे स्वागत व आदर सत्कार करून स्तुती केली. श्रीहरींनी प्रसन्न होऊन त्यांना वर मागण्यास सांगितले. तेव्हा मार्कंडेय म्हणाले, आपल्या दर्शनानेच मी धन्य झालो. तरीही जिच्या मोहाने लोक ब्रम्हामध्ये अनेक भेद पाहतात त्या मायेला एकदा पाहण्याची इच्छा मार्कंन्डेयांनी नरनारायणाकडे प्रकट केली. नरनारायणांनी तथास्तु म्हटले.


एके दिवशी मार्कंडेय ऋषी पुष्पभद्रा नदीकाठी उपासने व्यस्त असताना जोरदार वादळ आले. आकाशामध्ये मेघ दाटून आले व मुसळधार पाऊस पडू लागला. विजा कडकडू लागल्या व रथाच्या धुऱ्या एवढ्या जलधारा पडू लागल्या. सर्व बाजूंनी समुद्र पृथ्वीला गिळंकृत करू लागल्याने सर्व वातावरण जलमय झाले. या पाण्यात कधी मासे तर मगरी मार्कंडे याला धडकू लागल्या. सर्वत्र अंधार पसरला व त्या अंधारात अथांग सागरात मार्कंडेय वाहत होते. अशावेळी त्यांना एके ठिकाणी एक वडाचे झाड दिसले. झाडाच्या ईशान्येला एका डहाळीवर द्रोणाच्या आकाराच्या पानावर एक बालक पहुडलेले दिसले. त्या तेजःपुंज बालकाच्या तेजाने आजूबाजूचा परिसर उजळून निघाला होता. हा सुंदर बालक त्या पानावर आपली बोटे चोखीत पडला होता. मार्कंडे यांना अतिशय आश्चर्य वाटले. उत्सुकतेने ते त्या बालकांकडे पुढे सरकताच त्या बालकाच्या श्वासासोबत ते त्याच्या शरीरात गेले. त्या बालकाच्या शरीरात त्यांनी बाहेर प्रलया अगोदर जशी सृष्टी पाहिली तशी सृष्टी दिसली. पूर्ण जग त्यांनी आत पाहिले. आश्चर्यचकित होऊन ते पाहत असतानाच त्या बालकाच्या उच्छावासावाटे ते बाहेर पडले. बाहेर पडताच त्यांना पुन्हा तोच प्रलय, तेच झाड व तेच बालक त्यांच्याकडे हास्य वदनाने पाहत असलेले दिसले. त्यांना त्या बालकात भगवंताचे रूप दिसले. त्याला अलिंगन देण्यासाठी ते पुढे सरसावताच ते सर्व दृश्य नाहीसे होऊन मार्कंडेय यांना आपण आश्रमात असल्याचे दिसले.


अशाप्रकारे नर नारायणांनी आपल्याला मायेचा परिचय दिला हे मार्कंडेय यांनी जाणले व मनोमन भगवंतांना वंदन केले. अशा प्रकारे प्रलयाचा अनुभव घेऊन शांत बसलेल्या मुनींना आकाश मार्गे जाणाऱ्या भगवान शंकर पार्वतींनी पाहिले. शंकर-पार्वती स्वतःमुनींच्या भेटीसाठी आले. मार्कंडे यांनी शंकर-पार्वतीचा आदर सत्कार व पूजा-अर्चा करून, स्तुती करून त्यांना वंदन केले. शंकराने त्यांना वर मागण्यास सांगितले असता आपल्या ठिकाणी व आपल्या शरणागत भक्ताच्या ठिकाणी माझी अचल श्रद्धा असावी, असा वर मार्कंडेंनी मागितला. शंकर-पार्वतीने तथास्तु म्हटले. शंकर-पार्वतीनी त्यांना कल्पांतापर्यंत अजर‌ आणि अमर होण्याचा तसेच पुराणांचा आचार्य होण्याचाही आशीर्वाद दिला.


भागवत पूराणानुसार अश्वत्थामा, बली, व्यास, हनुमान, बिभीषण, कृपाचार्य व परशुराम हे सप्त चिरंजीव आहेत. ते प्रलयापर्यंत चिरंजीव आहेत. मात्र मार्कंडेय ऋषी हे कल्पाच्या अंतापर्यंत चिरंजीव आहेत. या कथेत नरनारायणाचा महिमा व्यक्त केलेला असल्यामुळे या कथेच्या पठणाने व्यक्तीत कलियुगात उत्पन्न होणाऱ्या सर्व दोषांचा नाश होतो, असेही भागवतात सांगितलेले आहे.

Comments
Add Comment

काय साधणार वारसा मानांंकनाने?

आनंद खर्डे महाराष्ट्रासाठी जुलैचा महिना तसा खासच! या महिन्यात बांदल देशमुख आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्या

चित्रकारांची पिढी घडविणारा अवलिया

कोकण आयकॉन : सतीश पाटणकर थोर परंपरा लाभलेल्या कोकणच्या लाल मातीत राहून इथल्या नाजूक आणि ओल्या मातीला आकार

लंडनच्या मार्केटवर मराठी झेंडा

शरद कदम मिळून मिसळून राहणारी साधी भोळी माणसं, मनिऑर्डरवर अवलंबून असणारी, कितीही गरीब असला तरी घरात आलेल्या

जतन करावा असा कबड्डीचा ठेवा...

अशोक बोभाटे  ज्येष्ठ क्रीडा पत्रकार विनायक दळवी लिखित कबड्डीतील किमयागार या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच

शिक्षकाचे व्यवहार तंत्र

नक्षत्रांचे देणे : डॉ. विजया वाड जवळ जवळ चाळीस वर्षे मी शाळेत नोकरी केली, पण आईचा गुरुमंत्र ध्यानी ठेवून. “जशा

सहनशीलता

जीवनगंध : पूनम राणे गुरुपौर्णिमेचा दिवस होता. फुलबाजार तेजीत चालला होता. नेहमी १० रुपयांला मिळणारा गुलाबाचा भाव