कोशकार गंगाधर खानोलकर

कोकण आयकॉन:सतीश पाटणकर


शोधक, संतुलित मनाचा पत्रकार, साक्षेपी संपादक, व्यासंगी कोशकार, संशोधक, चरित्र लेखक अशा चढत्या श्रेणीने ज्या गंगाधर खानोलकरांनी साहित्यक्षेत्रात अत्युच्च स्थान मिळवले आहे. एक प्रकारे खानोलकरांनी आयुष्यभर मांडलेल्या ज्ञानयज्ञाचे पौरोहित्यच केले आहे. त्या ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाची उषा टाकळकर सहाय्यक संपादक म्हणून काम करीत राहिली होती. गंगाधर देवराव खानोलकर आणि उषा प्रभाकर टाकळकर या दोघांनी अविश्रांत खपून मराठी वाङ्मयसेवक चरित्र कोशाचे २ खंड तयार केले आहेत.


वडिलांच्या व्यावसायिक बदल्यांमुळे गंगाधररावांचे बालपण भ्रमंतीत गेले. प्राथमिक शिक्षण घरीच झाले. मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण सावंतवाडी व मालवण येथे टोपीवाला हायस्कूलमध्ये झाले. असहकार चळवळीत सहभागी झाल्याने ते मॅट्रिक परीक्षेस बसले नाहीत. पिता ज्ञानपिपासू, ग्रंथप्रेमी व माणुसकी हा एकच धर्म मानणारा आणि आई स्वाभिमानी, स्वावलंबी व त्यागी. या उभयतांचे दृढ संस्कार होऊन १९२० ते १९२३ या काळात गंगाधररावांनी रवींद्रनाथांच्या शांतिनिकेतनमधील विश्वभारती विद्यापीठात, निसर्गाच्या मोकळ्या वातावरणात वाङ्मयाचा विद्यार्थी म्हणून प्रविष्ट होऊन अनेक थोर विद्वानांचे व गुरू या नात्याने रवींद्रनाथांचे मार्गदर्शन प्राप्त केले. खूप वाचन, चिंतन-मननाची सवय लावून घेतली. येथील निखळ ज्ञानसाधकी शैक्षणिक संस्कारांची शिदोरी त्यांनी आयुष्यभर केलेल्या साहित्य सेवेत त्यांना सतत प्रेरणा देत राहिली.


त्यानंतर अमळनेर तत्त्वज्ञान मंदिरात शिष्यवृत्ती घेऊन दोन वर्षे तत्त्वज्ञानाचा सखोल अभ्यास करून त्यांनी काही काळ तळेगावच्या राष्ट्रीय विचाराच्या समर्थ विद्यालयात शिक्षक या नात्याने काम केले. त्यानंतर ते मुंबईच्या वृत्तपत्राच्या दुनियेत लोकहित, विविधवृत्त, प्रगती, रणगर्जना साप्ताहिक इत्यादी वृत्तपत्रांचे संपादक झाले. १९२६ च्या सुमारास मुंबईत स्थिर झाल्यावर ते वाङ्मयीन चळवळीशी बद्ध झाले. त्यांनी स्वतः अनुभवलेली साहित्याची अडचण व उणीव दूर करण्यासाठी संशोधन क्षेत्रातील साधन साहित्याचा संग्रह सुरू केला आणि कोशकार, विश्लेषक, चरित्रलेखक, ग्रंथसंपादक म्हणून मराठी वाङ्मयाच्या इतिहासात अविस्मरणीय अशी कामगिरी करून आपल्या व्यक्तिमत्त्वाचा व कर्तृत्वाचा ठसा उमटवला व पुढील पिढ्यांसाठी एक आदर्श निर्माण केला.


खानोलकर यांनी काही नोकऱ्या केल्या, त्याही मुद्रण-प्रकाशन संस्थेतच. १९३१ मध्ये त्यांनी ‘अर्वाचीन मराठी वाङ्मय सेवक’ चरित्रकोशाच्या लेखनाचा शुभारंभ केला. जानेवारी १९३३ मध्ये सुरू केलेल्या प्रतिभा पाक्षिकाचा उद्देश होता महाराष्ट्रातील व महाराष्ट्राबाहेरील वाङ्मयविषयक चळवळींची माहिती प्रसिद्ध करणे, प्रसिद्ध होणाऱ्या वाङ्मयाची चर्चा, ग्रंथलेखन, ग्रंथप्रकाशन, ग्रंथमुद्रण याविषयींचे विचार प्रसिद्ध करणे व मराठी वाङ्मयाच्या एकंदर प्रगतीस साहाय्यक होईल असा मतप्रचार करणे. पुढे ८ एप्रिल १९४० पासून समीक्षक पाक्षिक व ३१ ऑक्टोबर १९४८ पासून रविकिरण साप्ताहिक चालू केले. मराठीतील पूर्णत: वाङ्मयीन स्वरूप असलेल्या पहिल्या-वहिल्या (प्रतिभा) नियतकालिकाच्या संपादनात के. ना. काळे व वि. ह. कुलकर्णी यांचा सहभाग होता. यासोबत ‘प्रतिभा प्रकाशन मंडळ’ निघून त्या उत्साही वातावरणात माधवराव पटवर्धन, गिरीश, यशवंत, श्री. बा. रानडे. खं. सा. दौंडकर, माडखोलकर, खांडेकर, श्री. के. क्षीरसागर अशांशी सहवास व विचारांची देवाणघेवाण होऊन साहित्याची जाण परिपक्व झाली व परिणामी उपकारक ठरली.


यानंतरच्या रविवार साप्ताहिकात सर्वसामान्यांसाठी आकर्षक अशा विविध विषयांचा समावेश असे. प्रत्येक नियतकालिक भिन्न प्रकृत्तीचे पण दर्जेदार असे व अभिरुची संपन्न असेे. आर्थिक समस्येमुळे पहिली दोन नियतकालिके अन्य चालकांकडे द्यावी लागली. तिसरे सव्वा वर्ष चालले. वयाच्या १८ व्या वर्षी त्यांनी लेखनाला सुरुवात केली. नामांकित नियतकालिकांतून कथा, वाङ्मयविषयक लेख प्रकाशित केले. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर हे त्यांचे लेखन-क्षेत्रातले गुरू. रम्य भावाविष्काराच्या त्यांच्या कथा, प्रेम आणि विद्वत्ता व इतर कथा या संग्रहात समाविष्ट आहेत. त्यांचे दैवत असणाऱ्या श्री. कृ. कोल्हटकर, वि. गो. विजापूरकर व वि. का. राजवाडे लिहिलेल्या छोटेखानी चरित्रांत चरित्रनायकांची समर्पक ओळख पटविणारी कामगिरी ही विश्वसनीय असल्याची छाप पडते, कारण त्यांचे लेखन निष्ठेने व अस्सल कागदपत्रांच्या आधारे केलेले असे.


एक वालचंद चरित्र सोडले तर मी लिहिलेल्या सर्व चरित्रांचे संकल्पन, संयोजन, पूर्वनियोजन प्रत्यक्ष लेखनाआधी कितीतरी काळ झालेले असते. हे त्यांचे म्हणणे वाचकाला प्रचिती आणून देते यात शंका नाही. माधव जूलिअन जीवनकथा हा चरित्रलेखनाच्या दृष्टीने चरित्रवाङ्मयात आदर्शवत असा मराठीतील पहिलाच चरित्रग्रंथ होय. रवींद्रनाथ जीवनकथा वालचंद हिराचंद : व्यक्ती, काल व कर्तृत्व साहित्यसिंह (श्री. कृ. कोल्हटकर) ‘जीवनगाथा (१९७२); यांपैकी वालचंद हिराचंद हे औद्योगिक क्षेत्रातले खंदे शिल्पकार. प्रत्येक चरित्रनायकाच्या जीवनानुसार वळणे व कार्यकर्तृत्व दाखवीत वेगळा व स्वतंत्र घाट प्राप्त करून देण्याचे कसब खानोलकरांच्या साक्षेपी, कुशल लेखनाने साधले आहे, असे चरित्र वाचताना वाटते.


खानोलकरांच्या जडणघडणीच्या काळातील महाराष्ट्र रसवंती पद्य : भाग १ ते ३ व ‘मराठी गद्य वैभव : भाग १ ते ३ ही १९३५ ची संपादने उत्कृष्ट पाठ्यपुस्तकांच्या कसोटीला उतरली. खानोलकरांच्या गुणसमुच्चयामुळे यशस्वी चरित्रलेखक म्हणून त्यांची कीर्ती उत्तरोत्तर उज्ज्वल होत गेली. ४५ वर्षांपूर्वी लिहिलेल्या श्री. कृ. कोल्हटकरांच्या छोट्या चरित्राला साडेसहाशे ‘डेमी’ पृष्ठांचे स्वरूप प्राप्त करून दिले. खानोलकरांनी सतत २० वर्षे परिश्रमाने संग्रहित केलेल्या साधनसामग्रीच्या आधाराने दोन-तीन वर्षे लेखन करून हे साध्य झाले. चरित्र लेखनात त्यांचे स्वतंत्र होते.


वाङ्मयातील ऐतिहासिक चरित्र लेखकाला वास्तव सत्याच्या अलीकडे किंवा पलीकडे केव्हाही जाता येत नाही. आटोकाट परिश्रमाने जी साधनसामग्री उपलब्ध झाली असेल, तिच्यावर त्याला निर्वाह करावा लागतो; या मर्यादा असल्या, तरी ललित चरित्राची स्वतःची बलस्थाने आहेत. उत्कृष्ट चरित्र निर्माण करणे हे मुख्यतः कलेचे काम आहे. या कामात खानोलकर निश्चितच यशस्वी झाले आहेत. त्यांनी वयाच्या सत्तरीच्या सुमारास मराठी वाङ्मय कोशाची चार खंडांत विभागलेली एक विस्तृत योजना तयार करून तिच्या संपादनाची धुरा स्वीकारली (१९६९-१९८२). अशी योजना कोणत्याही भारतीय भाषेत संकल्पिली गेली नव्हती हे तिचे वेगळेपण समग्र वाङ्मय व्यापार चरित्रांच्या अानुषंगाने ललित-अललित समाविष्ट व्हावा ही अपेक्षा होती.कोशनिर्मितीच्या प्रचंड व किचकट; परंतु अत्यंत उपयोगी कामासाठी संपादकापाशी चिवट कार्यशक्ती, पूर्वग्रहविमुक्त दृष्टी, चौफेर व्यासंग, रसास्वाद वृत्ती, इतिहासाची सूक्ष्म जाण आणि कामातील शिस्त, पद्धतशीरपणा, योजकता इत्यादी विविध गुण असावे लागतात. ते गुण दृढव्रती खानोलकरांपाशी असल्यामुळे, त्यांनी अपार परिश्रमाने साधनसामग्री जमवणे कोशनिर्मिती करणे अशी दुहेरी जबाबदारी अभ्यासक व वाङ्मयसेवक या भूमिकांतून उत्तम तऱ्हने पार पाडली. त्यांनी लिहिलेली चरित्रे वाचकांच्या पसंतीस उतरली व त्यांनी कल्पनेचे मिश्रण न करता चरित्रातील साम्य-विरोध, मर्मस्थाने, नाट्य, गूढता वगैरेंवर सूचक भाष्य केले. अभिव्यक्तीचे नवे तंत्र मराठी चरित्र-वाङ्मयात आणून घटना, प्रसंग, लेख, व्यक्तिविशेष, जीवनविशेष यांचे वर्णन स्वतः न करता, कोणाचा तरी नेमका उतारा देऊन ते त्याचा ताजेपणा वाचकांपर्यंत पोहोचवत. जीवनभर मराठी वाङ्मयाची सेवा करून त्यांनी अभ्यासक, संशोधक, संपादक, संग्राहकांसाठी एक आदर्श निर्माण केला, ही वस्तुस्थिती पुसली जाणार नाही.


(लेखक मुख्यमंत्र्यांचे माजी
माहिती अधिकारी आहेत.)

Comments
Add Comment

क्रिकेटमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

तंत्रवेध : डॉ. दीपक शिकारपूर आज क्रिकेट सामन्याप्रसंगी तसेच नंतर ॲक्शन रिप्ले आणि हायलाईट्सच्या माध्यमातून

साहित्यातला दीपस्तंभ - वि. स. खांडेकर

कोकण आयकॉन : सतीश पाटणकर विष्णू सखाराम खांडेकर हे मराठी साहित्यातील एक अग्रगण्य कादंबरीकार, एक लोकप्रिय

ए मेरे दिल कहीं और चल...

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे प्रत्येकाच्या जीवनात असा एखादा क्षण येऊन गेलेलाच असतो की जेव्हा त्यावेळी

वंदे मातरम्’ मातृभूमीचे सन्मान स्तोत्र

विशेष : लता गुठे भारतीय संस्कृतीचा विचार जेव्हा मनात येतो, तेव्हा अनेक गोष्टी मनात फेर धरू लागतात. अतिशय प्राचीन

पारिजातक वृक्ष पृथ्वीवर येण्याची कथा

महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे पारिजातकाला स्वर्गातील वृक्ष असेही म्हटले जाते. पारिजात हा एक सुगंधी

घर जावई

क्राइम : अॅड. रिया करंजकर लग्न या संस्काररूपी संस्थेवरून तरुणांचा विश्वास उडत चाललेला आहे. शादी का लड्डू नही खावे