Saturday, June 7, 2025

भारतातील पहिली महिला बाऊन्सर

भारतातील पहिली महिला बाऊन्सर

दी लेडी बॉस : अर्चना सोंडे


२९ मे रोजी खडकवासल्याच्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमधून १७ मुलींची पहिली तुकडी खडतर लष्करी प्रशिक्षण घेऊन बाहेर पडली. आज असं कोणतंही क्षेत्र नाही जिथे महिलांचा वावर नाही. प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने महिला यशाचं शिखर काबिज करत आहेत. महत्त्वाचे नेते, अभिनेते, सेलेब्रिटी यांच्या भोवती आपण एक सुरक्षा ‘कडे’ पाहतो. यांमध्ये बहुतांश पुरुषांचा समावेश असतो. सुरक्षा करणे ही महिलांच्या आवाक्याबाहेरची गोष्ट आहे असा एक समज होता. या समजेला तिने छेद दिला. ती भारतातील पहिली महिला बाऊन्सर बनली, ती महिला ‘रक्षक’ म्हणजे मेहरुन्निसा शौकत अली.


मेहरुन्निसाचा जन्म उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथील एका मुस्लीम रूढीवादी पारंपरिक कुटुंबात झाला. ती अशा कुटुंबात वाढली जिथे मुलींना घराबाहेर पडण्याची पथक रवानगी नव्हती. तिच्या अब्बान्ना असा विश्वास होता की शिक्षणामुळे मुली बिघडतात. मेहरुन्निसाला मात्र शिक्षण घ्यायचे होते. सैन्यात भरती होण्याचे किंवा पोलीस अधिकारी होण्याचे स्वप्न लहानपणापासून तिने पाहिले होते. बालपणात, तिच्या शिक्षणाची आणि शिकण्याची इच्छा कळल्यानंतर तिच्या वडिलांनी वीज बंद केली आणि पुस्तके जाळण्याचा प्रयत्नही केला. मेहरून्निसाला तिच्या आईचा एकमेव आधार होता.


मेहरुन्निसाला तीन बहिणी होत्या. या साऱ्या बहिणी शिक्षण घेत असतानाच त्यांच्या वडिलांनी त्यांच्या मोठ्या बहिणीचे लग्न केले. आता मेहरुन्निसाची पाळी होती. वयाच्या १२ व्या वर्षी मेहरुन्निसाच्या वडिलांनी तिच्यासाठी मुलगा शोधण्यास सुरुवात केली. मेहरुन्निसाचे लग्न होणार होते, परंतु नियतीच्या मनात काही वेगळेच होते. तिला टायफॉइड झाला आणि काही काळ तिने अंथरुणावर झोपून घालवला. आजारपणानंतर तिला स्वतःचे जीवन चांगले बनवण्याची प्रेरणा मिळाली. दरम्यान मेहरुन्निसाच्या आईने, मेहरुन्निसाच्या वडिलांना आपल्या मुलींच्या शिक्षणासाठी राजी केले.


मेहरुन्निसाने एनसीसी कॅडेट म्हणून प्रवेश केला कारण तिला नेहमीच पोलीस अधिकारी म्हणून काम करायचे होते. तिने पोलिसात नोकरी मिळविण्यासाठी फिटनेस आणि कराटेचे प्रशिक्षण घेतले. जेव्हा तिला कळले की दिल्लीला महिला बाऊन्सरची आवश्यकता आहे, तेव्हा तिने अर्ज केला. तिची महिला बाऊन्सर म्हणून निवड झाली.


जेव्हा मेहरुन्निसाला कामात अडचणी आल्या तेव्हा तिचा संघर्ष पुन्हा सुरू झाला. तिने नमूद केले की, त्यावेळी बाऊन्सरऐवजी महिला सुरक्षा रक्षक हा शब्द वापरला जात होता. पुरुष बाऊन्सरना मान मिळत असे, तर महिला बाऊन्सरना भेदभाव सहन करावा लागला. मेहरुन्निसावर वाईट टीका आणि शेरेबाजी केली जायची; परंतु तिने हळूहळू तिच्या कामाने, ताकदीने आणि शिक्षणाने या क्षेत्रात तिच्या विरोधात असलेल्या प्रत्येकाला चांगले उत्तर दिले.


२००४ मध्ये ‘इंडियन आयडॉल’ टीमच्या सुरक्षेची जबाबदारी स्वीकारल्यानंतर, मेहरुन्निसाचे आयुष्य पूर्णपणे बदलले. एक महिला बाऊन्सर म्हणून तिला लोक ओळखू लागले. समाजात तिला मान मिळू लागला. मेहरुन्निसा आता मर्दानी बाऊन्सर्स आणि डॉल्फिन सिक्युरिटी सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी चालवत आहे. तिने अमिताभ बच्चन, प्रियांका चोप्रा, राणी मुखर्जी, रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींना सुरक्षा प्रदान केली आहे.


मेहरुन्निसा शौकत अली ही देशातील पहिली महिला बाऊन्सर आहे. मेहरुन्निसा दिल्लीतील हौज खास गावातील सोशल नावाच्या लोकप्रिय कॅफेमध्ये काम करते. खासगी कार्यक्रमांसाठी आणि प्रसिद्ध लोकांसाठी, ज्यात बॉलिवूडमधील आघाडीच्या सेलिब्रिटींचा समावेश आहे, त्यांना ती संरक्षण देते. ती पबमधील भांडणे सोडवण्यात, बेकायदेशीर ड्रग्ज ओळखण्यात आणि महिला ग्राहकांच्या सुरक्षेवर लक्ष ठेवण्यात तज्ज्ञ आहे.


नेहमीच असे मानले गेले की, महिला स्वतःचे संरक्षण करू शकत नाहीत. त्यांना पुरुषाची गरज आहे. तथापि, या सर्व रूढीवादी विचारसरणीला मोडून काढत मेहरुन्निसाने हे सिद्ध केले आहे की, महिला स्वतःचे संरक्षण करू शकतात आणि इतरांनाही सुरक्षा प्रदान करू शकतात. मेहरुन्निसाच्या कुटुंबाची विचारसरणीही बदलली आहे आणि समाजही त्यांच्याकडे आदराने पाहतो. मेहरुन्निसाने बाऊन्सर म्हणून काम करणे ही देखील आदराची बाब आहे. इतर महिलांनीही या क्षेत्रात नोकरी करावी अशी तिची इच्छा आहे. कोणत्याही नवीन क्षेत्रात काम करताना अडचणी येणार. प्रस्थापित व्यवस्था सहज स्वीकार करत नाही. अशा वेळी न डगमगता पाय घट्टपणे रोवून उभं राहणे महत्त्वाचे. मेहरुन्निसा खंबीरपणे उभी राहिली. देशातील पहिली महिला बाऊन्सर म्हणून उदयास आली. तिच्यामुळे हे क्षेत्र महिलांसाठी खुले झाले. खऱ्या अर्थाने मेहरुन्निसा लेडी बॉस आहे.

Comments
Add Comment