Friday, October 31, 2025
Happy Diwali

दुबईत भारतीय अभियंत्याचा मृत्यू

दुबईत भारतीय अभियंत्याचा मृत्यू
दुबई : बकरी ईद निमित्त असलेल्या सुटीत स्कुबा डायव्हिंग करण्यासाठी गेलेल्या भारतीय सिव्हिल इंजिनिअरचा दुबईत जुमेराह बीचवर मृत्यू झाला. जुमेराह येथे समुद्रात स्कुबा डायव्हिंग करताना पाण्याखाली श्वास घेतेवेळी त्रास झाला आणि गुदमरून भारतीय सिव्हिल इंजिनिअर ओलाक्केंगील यांचा मृत्यू झाला. ओलाक्केंगील हे पत्नी रेशम आणि धाकटा भाऊ इविन यांच्यासोबत सुटीचा आनंद घेण्यासाठी जुमेराह येथे समुद्र किनाऱ्यावर गेले होते. स्कुबा डायव्हिंग करतेवेळी पाण्याखाली श्वास घेताना त्रास झाला आणि हृदयविकाराचा झटका आला. यामुळेच ओलाक्केंगील यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी प्राथमिक तपासणीअंती सांगितले. आयुष्यात पहिल्यांदाच ओलाक्केंगील आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य स्कुबा डायव्हिंग करत होते. पाण्याखाली गेल्यावर ओलाक्केंगील, रेशम, इविन या तिघांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. ओलाक्केंगील यांना थोड्याच वेळात हृदयविकाराचा झटका आला. तब्येत ढासळत असल्याचे बघून ओलाक्केंगील यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. थोड्याच वेळात ओलाक्केंगील यांचा मृत्यू झाला. रेशम आणि इविन यांना वाचवण्यात आले. पण इविन यांची तब्येत अद्याप नाजूक आहे. ते रुग्णालयात उपचार घेत आहेत. पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली आहे. पोलीस तपास करत आहेत. स्कुबा डायव्हिंगच्या सर्व साहित्याची कसून तपासणी सुरू आहे. ओलाक्केंगील हे मूळचे केरळचे आहेत. यामुळे त्यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी मूळगावी नेण्याचे नियोजन सुरू आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >