Sunday, September 21, 2025

इलो मिरग

इलो मिरग

वैष्णवी भोगले

खरंच कोकणातल्या मिरगाच्या पावसाची एक वेगळीच मज्जा असते. कोकण तसं वर्षभर सुंदर दिसलं तरी अधिक खुलून दिसतं ते फक्त पावसाळ्यातच...

मे महिन्याचा शेवट आला की, कोकणातल्या प्रत्येक घराघरांत मिरगाच्या कामांची जोरदार तयारी सुरू होते. शेतकरी घरावरची कौलं, पत्रे साफ करणे, तडे गेलेली कौलं, पत्रे बदलणे, ‘भात लावणी’ करताना पावसात भिजू नये म्हणून वापरली जाणारी इरली, ख्वाळ माळ्यावरून काढून साफ करणं, शेतीची कामं करून आल्यावर रिकाम्या पोटाला पटकन खायला लागणारे वाळवणीचे पदार्थ म्हणजेच कोकमं, आंब्याची साटं, मिठातल्या कैऱ्या, सांडगी मिरच्या, नाचणी, पापड इत्यादी गोष्टी उन्हात वाळवून त्यांचा साठा करून ठेवणं. तसेच सुकलेली सडसडीत मासळी (म्हावरा) पॅकबंद डब्ब्यात भरून ठेवणे, मातीच्या घरांभोवती नारळाच्या झावळ्यांनी किंवा गवताने काठ्या लावून आवरण करतात. यामुळे मातीच्या भिंती पावसात भिजत नाहीत. तसेच मृगाच्या पावसाच्या आधी कोकणात शेतीच्या कामांना सुरुवात होते. शेतात आजूबाजूच्या परिसरातील पालापाचोळा गोळा करून मळे म्हणजेच कोपऱ्यांची भाजावळ केली जाते. तसेच शेतकरी पावसाच्या आधी शेतात लागणारे नांगर, अवजारांची दुरुस्ती करून घेतो. मृगाचा पाऊस कधी सुरू होतो आणि शेतीच्या कामांना कधी एकदाची सुरुवात करतो याची त्याला उत्सुकता लागलेली असते.

मृगाचा पाऊस सुरू होताच …उन्हाच्या झळांनी घामेजलेलं अंग आणि झाडांची साथ सोडून गळून पडणारी पाने टवटवीत होतात. उन्हाच्या कायलीत पाण्याच्या शोधात जिव्हा बाहेर काढून पाण्यासाठी भटकणारे पशुपक्षी, तसेच भेगाळलेली जमीन आणि शेतात कसणारे शेतकरी हवालदिल होऊन वाट पाहत असतात ती म्हणजे मृगाच्या बरसणाऱ्या धारांची …हो, तोच पहिला पाऊस जो धरणीवर बरसताच मातीचा सुगंध पसरतो अन् …मन उल्हासित करतो... पहिल्या पावसाच्या भेटीसाठी आसुसलेल्या सृष्टीला ओघळणाऱ्या थेंबांनी आपल्या कवेत सामावून घेतो. पावसाचे मोत्यासारखे थेंब जेव्हा धरणीवर बरसतात आणि तप्त जमिनीतून सुखाच्या वाफा हवेत विरू लागतात…. तोच मोसमातील पहिला-वहिला पाऊस जो येताच सर्वांनाच बेधुंद करून सोडतो... सर्वत्र हिरवळ दिसू लागते…. धरणी नवा साज लेवून जणू नववधूसारखी सजते.

कोकणातील लोकं पिढ्यानपिढ्या पावसाचं स्वागत पारंपरिक पद्धतीने करतात. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मृग नक्षत्राच्या पावसाला सुरुवात होते. जमिनीतून बाहेर येणारे लाल रंगाचे छोटे किडे दिसायला लागले की, निसर्गात बदल व्हायला सुरुवात होते. कारण हे किडे पावसाच्या सुरुवातीच्या दिवसातच दिसतात. म्हणून या किड्याला ‘मिरग किडा’ असे म्हणतात. कोकणातील लाल मातीत हा मिरग किडा दिसू लागला की, पाऊस तोंडावर आल्याचं शेतकरी समजतो आणि मग शेतकरी राजा पेरणीच्या तयारीला लागतो. तसेच या दिवसांत झाडांवर लुकलुकणारे काजवे देखील दिसतात. मिरगाचा पहिला पाऊस सुरू झाला की, कोकणातील लोक चढणीचे मासे, खेकडे पकडायला जातात. मिरगात कोकणातील प्रत्येक घरात रात्री चुलीवर तिखट-मीठ लावून भाजलेले मासे किंवा माशांचं कालवण, खेकड्यांचा रस्सा हमखास असतोच.

मृग नक्षत्रात शेतकरी पहिल्या पावसाचं आणि शेतजमिनीची उत्साहाने पूजा करतो. यालाच कोकणात ‘मिरगाची राखण’ असे म्हणतात. मृग नक्षत्रापासून पुढील १५ दिवसांतील कोणत्याही एका दिवशी हा ‘मिरग दिवस’ साजरा केला जातो. यावेळी काही लोक तिखटाची राखण देतात तर काही लोकं गोडी राखण देतात.

राखण देताना आधी राखणदेवाला गाऱ्हाण घातलं जातं. त्यानंतर रखवालीच्या कोंबड्याचे जेवण शिजवून खाण्याची प्रथा आहे. त्यामुळे पुरुष मंडळीच कोंबड्याच जेवण चुलीवर शिजवतात आणि घरातील सर्वजण शेतात एकत्र मिळून चवीने खातात. ही तिखटाची राखण वाराच्या दिवशी म्हणजेच बुधवार, शुक्रवार किंवा रविवारी दिली जाते. गोड्या राखणेत भाजी, भाकरी, भात, वरण आणि एखादा गोड पदार्थ बनवून तो देवाला दाखवून राखण साजरी करतात. मिरगाची राखण देऊन झाल्यानंतर शेतकरी जोमाने शेतीच्या कामाला सुरुवात करतो. भाताची पेरणी भरभरून यावी म्हणून मृगाचा खरा मान हा कोकणात खास असतो.

Comments
Add Comment