नवी दिल्ली : भारताला नक्षलवादमुक्त करण्यासाठी केंद्र सरकारच्या नेतृत्वात देशव्यापी मोहीम सुरू आहे. सर्व नक्षलवाद प्रभावी राज्यांमध्ये सुरक्षा पथकांनी कठोर कारवाई सुरू केली आहे. या कारवाईला यश मिळू लागले आहे. अनेक नक्षलवादी ठार झाले आहेत. कित्येकांना अटक झाली आहे. काही नक्षलवादी शरण आले आहेत. सुरक्षा पथकांनी चार प्रमुख नक्षलवाद्यांना ठार केले आहे. नक्षलवाद्यांच्या कारवाया थंडावल्या आहेत. यामुळे अनेकजण आनंदात आहेत. पण काँग्रेसला नक्षलवाद्यांची काळजी सतावू लागली आहे. काँग्रेस नेत्यांनी भाजपाकडे शस्त्रसंधीची मागणी केली आहे.
सुरक्षा पथकांनी सीपीआय माओवादी नक्षलवाद्यांचा सरचिटणीस नंबला केशव राव उर्फ बसवराजू याला ठार केले. तसेच सुरक्षा पथकांनी सुधाकर उर्फ गौतम उर्फ नर्सिम्हा चालम,चलपती, प्रयाग मांझी यांनाही ठार केले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ३१ मार्च २०२६ पर्यंत देशातून नक्षलवादाचे उच्चाटन केले जाईल असा पुनरुच्चार केला आहे. या पार्श्वभूमीवर तेलंगणा प्रदेश काँग्रेस समिती अध्यक्ष बी. महेश कुमार गौड यांनी केंद्र सरकारकडे माओवाद्यांशी शांतता चर्चा सुरू करण्याची मागणी केली आहे. माओवादी हे भारताचे नागरिक आहेत, त्यांच्या विरोधात टोकाच्या संघर्षाची भूमिका घेण्यापेक्षा चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा; असे महेश कुमार गौड म्हणाले.
जीवन जगण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. सरकारने ही बाब समजून घ्यावी. माओवाद्यांचा विनाश करण्याच्या हेतूने कारवाई करू नये; असे महेश कुमार गौड म्हणाले. काँग्रेस दहशतवाद, नक्षलवाद यांचे समर्थन करत नाही. पण सर्व प्रकारच्या हिंसेला विरोध करते. काँग्रेस पक्षाचे मूलभूत तत्व अहिंसा आहे. आता, केंद्र सरकारला माझी विनंती आहे की शांतता चर्चा पुढे नेली पाहिजे, कारण जो कोणी आत्मसमर्पण करण्यास, शस्त्रे टाकण्यास आणि मुख्य प्रवाहात सामील होण्यास तयार आहे त्याला तसे करण्याची संधी दिली पाहिजे; असेही महेश कुमार गौड म्हणाले.