कोकण रेल्वे स्थानकांवरील छताचे काम पूर्ण करा

  63

रवींद्र तांबे


कोकणातील रेल्वे सेवा सध्या जनतेची जीवनवाहिनी झाली आहे. कोकणात रेल्वे सुरू होऊन या वर्षी २७ वर्षे पूर्ण झाली. देशातील मुंबई व मंगळूरु या बंदरांना जोडणारा कोकण रेल्वे हा महत्त्वाचा मार्ग आहे. हल्लीकडे कोकणातील रेल्वे स्थानकांच्या दर्शनी भागांचे आणि प्रवेशद्वारांचे सुशोभीकरण करण्यात येत आहे. ही कोकण रेल्वेच्या दृष्टीने समाधानाची बाब असली तरी रेल्वे प्लॅटफॉर्मवर प्रवाशांना आसरा मिळण्यासाठी अजूनही छत अपुरे आहेत. या मार्गावरून जवळजवळ ३० प्रमुख रेल्वेगाड्या धावत आहेत. तेव्हा रेल्वे प्रवाशांच्या दृष्टीने रेल्वे स्थानकांवरील प्लॅटफॉर्मवर पूर्ण छत बांधण्यासाठी रेल्वे प्रशासनाला जागृत करण्यासाठी थोडक्यात घेतलेला वेध.


कोकण रेल्वेमार्गावरील मंगळूरु ते उडुपी दरम्यान पहिली रेल्वे २० मार्च १९९३ रोजी धावली होती. त्याआधी १५ सप्टेंबर १९९० रोजी रोहा येथे कोकण रेल्वेचा पायाभरणी समारंभ करण्यात आला. त्यानंतर अवघड असा वाटणारा कोकण रेल्वे मार्गाचे २६ जानेवारी १९९८ रोजी उद्घाटन होऊन रेल्वेसेवा सुरु करण्यात आली. याचे खरे श्रेय कोकणातील राजापूर लोकसभा मतदारसंघातून (आताचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघ) सलग पाच वेळा लोकसभा सदस्य म्हणून निवडून आलेले मधू दंडवते यांना जाते. त्यामुळे त्यांना कोकण रेल्वेचे शिल्पकार असे अभिमानाने लोक म्हणतात. यासाठी जवळ जवळ सत्तेचाळीस हजार कोकणातील कुटुंबीयांना विस्थापित व्हावे लागले होते. आता या मार्गावरून रेल्वे सुरु होऊन २७ वर्षे पूर्ण झाली असून रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्मवरील अपुऱ्या छतामुळे प्रवाशांचे खूप हाल होत आहेत. त्यात बसण्याची सुद्धा सोय नाही. मग सांगा वृद्ध व्यक्ती, अपंग व्यक्ती किंवा लहान मुले यांचे होणार कसे? त्यात यावर्षी मे महिन्यापासून पावसाला सुरुवात झाला आहे.


मी जेव्हा २३ मे रोजी मुंबईला येत होतो त्या दिवशी पाऊस होता. त्यामुळे छत्री असून सुद्धा माझ्याजवळ सामान असल्याने भिजत रेल्वे डब्यापर्यंत जावे लागले. बऱ्याच वेळा या मार्गावरील रेल्वे गाड्या उशिराने धावत असतात. अशावेळी छत असेल तर प्रवाशांचे हाल होणार नाहीत. प्रवासी थोडी विश्रांती घेऊ शकतात. लोक आपापल्या डब्याकडे जाऊन गाडीची वाट पाहू शकतात. त्यामुळे प्लॅटफॉर्मवर गर्दी सुद्धा होणार नाही.


अपुरे छत असल्यामुळे रेल्वे प्रवाशांचे खूप हाल होतात. तसेच गाडी आल्यावर प्रवाशांची धावाधाव होते. काही वेळा एकमेकांना आपटतात सुद्धा. बऱ्याच वेळा गाडी सुटेल म्हणून समोर असलेल्या डब्यात लोक चडतात. नंतर शोधत शोधत आपल्या डब्याकडे जातात. त्यावेळी त्या आसनावर वेगळीच व्यक्ती झोपलेली असते. त्याला उठवायला अर्धा तास जातो. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. इतकेच नव्हे तर १८ मे रोजी मुंबईला जाणारी दुपारी ३.०० ची रेल्वे गाडी रात्री १०.०० वाजता येण्याचे संकेत रेल्वेन प्रशासनाने दिले असताना सुद्धा ती रेल्वे गाडी रात्री १२.०० वाजता आली. तेव्हा जवळच्या प्रवाशांचे सोडा लांबच्या प्रवाशांचे काय हाल झाले असतील त्याची कल्पना न केलेली बरी. त्यात मुसळधार पाऊस. काही प्रवासी एका बाजूला आपले सामान ठेवून रेल्वे प्रशासनास मालवणीत समाचार घेत होते. अशावेळी प्लॅटफॉर्मवर छत असते तर प्रवाशांची हालत झाली नसती. अजूनही एकच रेल्वे मार्ग असल्याने क्रॉसिंग करताना सुद्धा वेळ जातो. याचा परिणाम लांब पल्ल्याच्या गाड्या उशिराने धावतात.


तेव्हा उन्हाळा, पावसाळा व हिवाळा असो रेल्वे स्टेशनवर गाडीच्या लांबीचे पूर्ण छत असले पाहिजे. शेवटी प्रवाशांचे सुख हेच रेल्वे प्रशासनाचे सुख असते. आपल्या भारतीय रेल्वेचे ब्रीदवाक्य “देशाची जीवनवाहिनी” असे आहे. जर आपण सर्वांनी भारतीय रेल्वेच्या ब्रीदवाक्याचा विचार केल्यास जी देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी आणि प्रवाशांच्या सेवेसाठी खूप महत्त्वाची आहे. महत्त्वाची बाब म्हणजे कोकण रेल्वे देशाच्या उत्पनाचे एक प्रभावी साधन मानले जाते. मागील दिवाळीला रेल्वेने ७७ दिवसांचा बोनस आपल्या सेवकांना जाहीर केला होता. यावरून तिचा कारभार किती जोरात चालला आहे याची कल्पना येते. कोकण विभागातील सुमारे ३६ रेल्वे स्थानकांच्या दर्शनी भागांचे आणि प्रवेशद्वारांचे सुशोभीकरण करण्यात येत आहे. याची सर्व जबाबदारी राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतली आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसामुळे नवीन बसवलेल्या छताला आणि क्लॅडिंगचे नुकसान झाले आहे. तसेच अनेक स्थानकांचे काम अपुरे आहे. पावसाचे पाणी आतमध्ये ठिबकत आहे. असे जरी असले तरी प्रथम प्रवाशांच्या सेवेसाठी रेल्वे आहे हे ओळखून सुशोभीकरणाबरोबर प्लॅटफॉर्मवरील छताचे काम पूर्ण झाले पाहिजे.


आतापर्यंत २७ वर्षे कोकण रेल्वेला पूर्ण झाली. त्यात एक वर्ष गेले तर काय फरक पडणार आहे. तेव्हा कोकण रेल्वे मार्गावरील सर्व रेल्वे स्थानकावर पूर्ण छत होणे प्रवाशांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे. जर आपण कोकणातील रेल्वे स्थानकांच्या गरजांचा विचार करता प्रथम रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्मवर छत झाले पाहिजे. म्हणजे रेल्वे प्रवाशांचा मानसिक ताण कमी होईल. त्यामुळे रेल्वे प्लॅटफॉर्मवर रेल्वे गाडी आल्या आल्यास प्रवाशांना पळापळ करण्याची वेळ येणार नाही. तेव्हा रेल्वे प्रवाशांच्या हिताच्या दृष्टीने कोकण रेल्वे प्रशासनाने रेल्वे सुशोभीकरणाबरोबर रेल्वे प्लॅटफॉर्मवरील छत तातडीने बांधणे प्रवासी तसेच रेल्वे प्रशासनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे.

Comments
Add Comment

बेस्टची वैभवशाली सेवा आणि भवितव्य

येत्या गुरुवारी ७ ऑगस्ट रोजी बेस्ट उपक्रमाचा ७८वा वर्धापन दिन आहे. बेस्ट (बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन

खड्ड्यांच्या शापातून रस्त्यांना मुक्ती कधी?

कोणत्याही कामाचे योग्य प्रकारे नियोजन केले तर त्याची दुरवस्था होत नाही. विशेषत: राज्यातील रस्त्यांच्या

धार्मिक, ऐतिहासिक वारसा लाभलेले पालघर

कोकणच्या उत्तर भागात पूर्वेकडे सह्याद्री पर्वतरांगा, पश्चिमेकडे अरबी समुद्रा दरम्यान पसरलेला आहे. पालघर

ओझोनमुळे कोंडला महानगरांचा श्वास

उन्हाळ्यात प्रमुख महानगरांमध्ये जमिनीजवळील ओझोन प्रदूषण लक्षणीयरीत्या वाढले. गेल्या वर्षीच्या उन्हाळ्याच्या

दुसरं लग्न करताय? सावध राहा!!

मीनाक्षी जगदाळे आपल्या समाजरचनेत दिवसेंदिवस जे चुकीचे बदल घडत आहेत, विवाहबाह्य संबंध, त्यातून गुन्हेगारीचा उदय

मग बॉम्बस्फोट केले कोणी?

शंतनु चिंचाळकर दहशतवाद्यांनी मुंबईची लाईफलाईन असलेल्या सात लोकल ट्रेनमध्ये प्रेशर कुकरच्या साह्याने