Saturday, June 14, 2025

प्रलंबित प्रश्नांसाठी माथाडींचे कामगार मंत्र्यांना साकडे

प्रलंबित प्रश्नांसाठी माथाडींचे कामगार मंत्र्यांना साकडे

मुंबई : विविध माथाडी मंडळातील नोंदीत कामगारांच्या प्रलंबित असलेल्या प्रश्नांचे सविस्तर निवेदन महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांना सादर करून महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे नेते सरचिटणीस व माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी तातडीने संबंधित अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यासंबंधी विनंती केली.


महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी भारतीय जनता पार्टीच्या नरिमन पाॅईट येथील मुख्य कार्यालयात जनता दरबार आयोजित केला होता, त्यावेळी माथाडी कामगार नेते नरेंद्र अण्णा पाटील यांनी निवेदन सादर केले. यावेळी महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे अध्यक्ष एकनाथ जाधव, संयुक्त सरचिटणीस दिलीप खोंड, जनसंपर्क अधिकारी पोपटराव देशमुख, सेक्रेटरी कृष्णत पाटील, प्रशांत सणस उपस्थित होते.


विविध माथाडी मंडळाच्या पुनर्रचना करणे, माथाडी मंडळाच्या कार्यालयीन सेवेत माथाडी कामगारांच्या मुलांना संधी देणे, माथाडी अधिनियम सुधारणा विधेयक क्रमांक ३ संदर्भात नियमावलीचे शासन जीआर पारीत करणे, विविध माथाडी मंडळातील कामगारांच्या दैनंदिन प्रश्नांची सोडवणुक होत नसल्यामुळे तातडीने उपाययोजना करणे, प्रत्येक माथाडी मंडळातील नोंदीत कामगारांच्या प्रश्नांची माथाडी मंडळाच्या चेअरमन व सेक्रेटरी यांच्याकडून तातडीने सोडवणुक होणे, कामगार व मालकांच्या जबाबदाऱ्या, चेअरमन व सेक्रेटरी यांच्या जबाबदाऱ्या तत्परतेने पार पाडल्या जाव्यात, इत्यादी प्रश्नांचे निवेदन कामगार मंत्री आकाश फुंडकर यांचेकडे सादर करण्यात आले.

Comments
Add Comment