Saturday, June 14, 2025

चिनाब रेल्वे पूल आयफेल टॉवरपेक्षा उंच!

चिनाब रेल्वे पूल आयफेल टॉवरपेक्षा उंच!

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते चिनाब रेल्वे पुलाचे उद्घाटन


काश्मिर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी जम्मू आणि काश्मीरमधील चिनाब रेल्वे पुलाचे उद्घाटन केले. चिनाब रेल्वे पूल पॅरिसमधील आयफेल टॉवरपेक्षा उंच असून, हा जगातील सर्वात उंच रेल्वे पूल आहे. मोदींनी वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवून या पुलाचे उद्घाटन केले. उद्घाटनावेळी उपराज्यपाल मनोज सिन्हा, मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव देखील उपस्थित होते. हा रेल्वे पूल जम्मू-काश्मीरच्या विकासातील एक क्षण मानला जात आहे. या पुलामुळे प्रवाशांचा प्रवास सोपा होईल आणि वेळही वाचेल.





चिनाब नदीवर या पुलाचे बांधकाम करणे अवघड मानले जाते. मात्र, तरीही अभियंत्यांनी चिनाब पुलाचे काम यशस्वी पूर्ण केले. काही दिवसांपूर्वी चिनाब पुलावरून रेल्वेची पहिली यशस्वी चाचणी पार पडली. हा रेल्वे पूल ४० किलोग्रॅम टीएनटी स्फोटकांचा स्फोट किंवा ८ रिश्टर स्केलची तीव्रता असलेल्या भूकंपाचा धक्काही सहन करू शकतो. विशेष म्हणजे स्फोटानंतरही या पुलावरून ताशी ३० किलोमीटर वेगाने रेल्वे जाऊ शकते.





हा पूल १,३१५ किलोमीटर लांबीचा असून तो ताशी २६० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याचा आघात सहन करू शकतो. या पुलावर एक फुटपाथ आणि एक सायकल मार्गही बनवण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सकाळी ११ वाजता जम्मूमधील चिनाब नदीवर बांधलेल्या जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे उद्घाटन केले. पंतप्रधान मोदी इंजिनमध्ये बसून चिनाब आर्च पुलावरून केबल स्टे अंजी पुलावर पोहोचले. येथे त्यांनी रेल्वेच्या अंजी पुलाचेही उद्घाटन केले. त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांसह पूल बांधकाम कामगारांची भेट घेतली.


चिनाब पूल प्रकल्पाला २००३ मध्ये मंजुरी मिळाली. तब्बल २२ वर्षाच्या अथक परिश्रमानंतर या पुलाचे काम पूर्ण झाले. २७२ किमी लांबीचा उधमपूर-कटरा-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे मार्ग देशाला समर्पित केला जाईल. हा पूल चिनाब नदीच्या तळापासून ३५९ मीटर उंच आहे.


दरम्यान, उत्तर रेल्वे शनिवार, ७ जूनपासून कटरा-श्रीनगर मार्गावर वंदे भारत ट्रेन सेवा सुरू हेणार आहे. आयआरसीटीसी वेबसाइटवर तिकीट बुकिंग करता येईल. कटरा आणि श्रीनगर दरम्यान आठवड्यातून ६ दिवस दोन गाड्या धावतील.उत्तर रेल्वेने सांगितले की ट्रेनमध्ये दोन प्रवास वर्ग आहेत. चेअर कारचे भाडे ७१५ रुपये आणि एक्झिक्युटिव्ह क्लासचे भाडे १३२० रुपये आहे. सध्या गाड्या फक्त बनिहाल येथे थांबतील, इतर थांब्यांचा निर्णय नंतर घेतला जाईल.


स्वातंत्र्याच्या ७७ वर्षांनंतरही, हिमवर्षावाच्या काळात काश्मीरचा देशाच्या इतर भागांशी संपर्क तुटलेला असतो. राष्ट्रीय महामार्ग-४४ बंद असल्याने, खोऱ्यात जाण्याचा मार्ग बंद आहे. याशिवाय, जम्मू ते काश्मीर रस्त्याने जाण्यासाठी ८ ते १० तास लागत होते. ट्रेन सुरू झाल्यानंतर, हा प्रवास सुमारे तीन तासांत पूर्ण होईल.



पाकिस्तानला भारतात दंगली घडवायच्या होत्या; पंतप्रधान मोदी


“पाकिस्तानने पहलगाम येथे माणुसकी आणि ‘कश्मीरियत’, या दोघांवर वार केला. त्याचा हेतू भारतात दंगली घडवण्याचा होता. काश्मीरच्या कष्टाळू लोकांची कमाई रोखण्याचा होता, त्यामुळे पाकिस्तानने पर्यटकांवर हल्ला केला.” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी कटरा येथे जाहीर सभेत म्हणाले. जम्मू आणि काश्मीरच्या तरुणांचा उल्लेख करत पंतप्रधान मोदी म्हणाले की, आता तरूणांनी दहशतवादाला सडेतोड उत्तर देण्याचा निर्धार केला आहे. हा तोच दहशतवाद आहे ज्याने खोऱ्यात शाळा जाळून टाकल्या, रुग्णालये उद्ध्वस्त केली, ज्याने अनेक पिढ्या उद्ध्वस्त केल्या. पाकिस्तानाच्या या कटाच्या विरोधात जम्मू-काश्मीरचे लोक उभे राहिले आहेत. जम्मू-काश्मीरच्या जनतेने याविरोधात जी शक्ती दाखवली आहे त्याने फक्त पाकिस्तानच नाही तर जगभरातील दहशतवाद्यांना एक कठोर संदेश मिळाला.

Comments
Add Comment