
ग्रामपंचायतींकडे मागविल्या ना-हरकती
अलिबाग : रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबाग नगरपालिकेची हद्द खूपच लहान असून, चेंढरे, वरसोली, वेश्वी आणि कुरूळ या ग्रामपंचायतींचा समावेश करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आमदार महेंद्र दळवी यांच्या तोंडी आदेशानुसार अलिबाग नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासन अधिकारी सचिन बच्छाव यांनी हद्दवाढीबाबत ग्रामपंचायतींकडून हरकती मागवल्या आहेत. दरम्यान, बच्छाव यांच्या भूमिकेबाबत शेतकरी कामगार पक्षाकडून नाराजीचे सूर उमटत आहेत.
कोणत्याही प्रकारची बैठक न घेता, लेखी सुचना न घेता मुख्याधिकाऱ्यांनी आमदारांच्या तोंडी आदेशावर काढलेले पत्र नियमबाह्य असल्याने हद्दवाढीची प्रक्रिया बेकायदा असल्याचे शेकापच्या नेत्यांचे म्हणणे आहे.
सध्या अलिबाग नगर परिषदेचा कारभार मुख्याधिकारी तथा प्रशासक म्हणून सचिव बच्छाव यांच्या देखरेखीखाली सुरू आहे, तर वेश्वी ग्रामपंचायत वगळता सर्वच ग्रामपंचायतींचा कारभार प्रशासकाच्या माध्यमातून सुरू असल्याने विरोध कमी होईल, या संधीचा फायदा घेत हद्द वाढीसाठी हरकती मागविल्या आहेत.
अलिबाग नगरपालिकेसह लगतच्या चेंढरे, वरसोली, वेश्वी आणि कुरूळ या ग्रामपंचायती एकेकाळी शेतकरी कामगार पक्षाच्या अधिपत्याखाली होत्या. या ग्रामपंचायती आता अलिबाग नगरपालिकेमध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न सुरु आहे. अलिबाग नगरपालिकेची सध्याची हद्द जेमतेम सहा चौरस किलोमीटर इतकीच आहे.
लगतच्या ग्रामपंचायतींना सहभागी करून घेतल्यानंतर ही हद्द २५ चौरस किलोमीटरपर्यंत वाढणार आहे. शहरातील सध्या पाणीप्रश्नासह वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या अपूर्ण रस्त्यांच्या कामाचा फटका अलिबागकरांना बसत आहे.
अगदी छोट्याशा जागेत अलिबाग शहर वसल्याने त्यास बकालपणा येत आहे. शहरात ठिकठिकाणी कचऱ्याच्या ढिगाऱ्यांबाबत अलिबागकर त्रस्त झाले आहेत. हे प्रश्न सोडविण्यास मुख्याधिकारी उदासीन ठरत आहेत. चेंढरे ग्रामपंचायतीलाही पत्र देऊन ना हरकत दाखला मागितला आहे.
विविध कार्यालयांना वाव
आमदार महेंद्र दळवी यांनी दिलेल्या तोंडी आदेशानंतर ही प्रक्रिया सुरू झाली आहे. हद्दवाढीने अलिबाग शहराचा सुनियोजित विकास करता येईल. त्याचबरोबर वरसोली, चेंढरे, वेश्वी, कुरूळया ग्रामपंचायतींचा योग्य विकास होईल. २५ चौरस किलोमीटर हद्दीत जिल्ह्याची विविध कार्यालये सुरू करता येतील, अशी माहिती अलिबाग नगरपालिकेचे मुख्याधिकारी सचिन बच्छाव यांनी दिली.