
जिल्हाधिकारी किशन जावळे यांचे निर्देश
जिल्हाधिकारी किशन जावळेंच्या हस्ते जिल्हा पतपुरवठा पुस्तिकेचे अनावरण
अलिबाग : रायगड जिल्ह्यातील बँकांनी मार्च २५ मध्ये संपलेल्या आर्थिक वर्षात प्राथमिकता क्षेत्रासाठी ८ हजार ८०० कोटींच्या वार्षिक पतपुरवठा आराखड्याचे उद्दिष्ट असताना, बँकानी ९ हजार ३४२ कोटींचे (१०६ टक्के) कर्ज वाटप झाल्याची माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली. जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय सल्लागार व आढावा समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात पार पडली, त्यावेळी ते बोलत होते.
सर्व बँकांचा आणि सरकारी विभागांचा योग्य समन्वय असल्याने मोठे उदिष्टही साध्य करता येते. असाच समन्वय आणि परस्पर सहकार्य या आर्थिक वर्षात सुद्धा पुढे चालू ठेवावे असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले.
किसान क्रेडिट कार्डसाठी असणारे ६२५ कोटींचे उद्दिष्ट प्रत्येक सरकारी, खासगी आणि जिल्हा मध्यवर्ती बँकांनी १०० टक्के पूर्ण करा, तसेच मत्स्यव्यवसाय आणि दुग्धव्यवसाय अंतर्गत किसान क्रेडिट कार्ड देण्याला प्राधान्य द्या, असे सांगून बँकांनी व शासकीय अधिकाऱ्यांनी परस्पर समन्वय ठेवून नागरिकांना नियमित आणि चांगल्या पद्धतीने सेवा द्या. तसेच शासकीय योजनांतर्गत प्राप्त कर्ज प्रकरणे वेळेत मार्गी लावा, अशा सुचनाही त्यांनी दिल्या. बँकांनी वार्षिक पतपुरवठा आराखड्याबरोबरच शासकीय व महामंडळांच्या योजनांची उद्दिष्टपूर्ती होण्यासाठी परस्पर समन्वय ठेवून नियोजन करावे, तसेच कृषी व तत्सम क्षेत्र, लघु उद्योग क्षेत्र, प्राथमिक अप्राथमिक क्षेत्राची उद्दिष्टपूर्ती करावी.
प्रधानमंत्री अन्न प्रक्रिया योजनांमध्ये लाभार्थ्यांना भरघोस लाभ देण्यात येतो. त्या अंतर्गत जास्तीत जास्त प्रकरणे होण्यासाठी कृषी विभागाने पुढाकार घ्यावा. बँकानी ग्राहकांना बँकिग सुविधा पुरविण्याबरोबरच त्यांना आर्थिक दृष्ट्या साक्षर कण्यासाठी पुढाकर घ्यावा. यासाठी कर्ज मेळाव्याबरोबरच आर्थिक साक्षरतेचे नियोजन करावे. जास्त व्याज घेणाऱ्या संस्थांमधून कर्ज न घेता, सरकारी बँकामधून घ्यावे, तसेच बनावट नोटा ओळखणे व नाण्यांच्या वापरासंबंधी जिल्ह्यात जनजागृती मिळावे आयोजित करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन यावेळी जावळे यांनी दिले.