मुंबई : युद्धात आधुनिक लढाऊ विमानं ही कोणत्याही देशाच्या सैन्याचं प्रतीक मानलं जातं. अमेरिकेचे F-47, रशियाचे Su-57 आणि चीनचं J-35A हे पाचव्या आणि सहाव्या पिढीची लढाऊ विमानं आकाशात वर्चस्व मिळवण्यासाठी सज्ज आहेत, मात्र खरोखरच कोणतं विमान सर्वोत्तम आहे? आणि भारताच्या स्वदेशी AMCA प्रकल्पासमोर काय आव्हानं आहेत? हेही पाहणं महत्त्वाचं आहे.
अमेरिकेचं F-47 हे सहाव्या पिढीचं स्टेल्थ लढाऊ विमान आहे, जे बोईंगने ‘नेक्स्ट जनरेशन एअर डोमिनन्स’अंतर्गत विकसित केलंय. 2020 पासून विकसित केलेलं हे विमान 2029 पर्यंत युद्धासाठी सज्ज होईल. याचा वेग मॅक 2पेक्षा जास्त आहे आणि 1 हजार नॉटिकल मैलांहून अधिक रेंज आहे. त्याचबरोबर 'स्टेल्थ++' तंत्रज्ञान हे विमान रडार आणि इन्फ्रारेड सेन्सर्सना चकवा देतं.
रशियाचे Su-57 फेलॉन हेही पाचव्या पिढीचं स्टेल्थ विमान. या लढावू विमानानं 2010 मध्ये पहिल्यांदा उड्डाण केलं.ते 2020 मध्ये रशियन हवाई दलात दाखल झालंय. हे विमान मॅक 2 वेग आणि 3,500 किमी रेंजसह सुपरक्रूझ क्षमतेचं आहे. मात्र त्याची स्टेल्थ क्षमता मर्यादित आहे, कारण त्याची रडार क्रॉस-सेक्शन 0.1 ते 0.5 चौरस मीटर इतकी आहे.
चीनचं J-35A हे शेनयांग FC-31चं विकसित व्हर्जन आहे. हे लढाऊ विमान नौदल ऑपरेशन्ससाठी खास विकसित केलंय. 2024 च्या झुहाई एअरशोमध्ये या विमानाचा समावेश करण्यात आला होता. हे विमान मॅक 1.8 वेग आणि 2,000 किमी रेंजसह येतं. या विमानाच्या स्टेल्थ क्षमतेची तुलना ही F-35 शी केली जाते.
अमेरिकेच्या F-47 या लढावू विमानात ‘स्टेल्थ++’ तंत्रज्ञान, अत्याधुनिक सेन्सर फ्युजन, AI-आधारित डेटा नेटवर्किंग आणि YFQ-42, YFQ-44 यांसारख्या ड्रोन्स या अत्याधुनिक सुविधा आहेत. या विमानाची क्षमता ही F-22 पेक्षा 70 टक्के अधिक आहे. एका विमानाची किंमत 160 ते 300 दशलक्ष डॉलर्स इतकी आहे.
नवी दिल्ली : राफेल उत्पादक दसॉल्ट एव्हिएशनने भारत आणि इतर जागतिक बाजारपेठांसाठी लढाऊ विमानांचे सुटे भाग तयार करण्यासाठी टाटा समुहासोबत भागिदारी ...
रशियाच्या Su-57 या लढावू विमानाचाही आकाशात मोठा दबदबा आहे. हे विमान वेगवान आहे. या विमानातून शस्त्रांचा प्रभावी मारा करता येतो. सध्या रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू असल्याने Su-57 विमानाच्या उत्पादनावर परिणाम झालाय. आतापर्यंत 40 पेक्षा कमी विमानं तयार करण्यात आली आहेत.
अमेरिका आणि रशियाच्या लढावू विमानांच्या तोडीस तोड म्हणून चीननंही J-35A या लढावू विमानाची निर्मिती केलीय. मात्र याचा वापर हा नौदल ऑपरेशनसाठी उपयुक्त आहे. या विमानाची किंमत ही 70 ते 90 दशलक्ष डॉलर्स आहे. चीन पाकिस्तानला J-35A हे विमान 2026 पर्यंत देणं अपेक्षित मानलं जातंय. मात्र याचं इंजिनशक्ती कमकुवत असल्याची चर्चा आहे. त्यातच चीनने हे विमान तयार करताना F-35, F-22ची नक्कल केल्याचा आरोपही होतोय.
या तिन्ही लढावू विमानांचा विचार करता अमेरिकेचं F-47 चं सहाव्या पिढीचं तंत्रज्ञान, सर्वोत्तम स्टेल्थ आणि ड्रोन्सचा वापर असल्यामुळं ते सर्वात पुढे आहे. ते चीनच्या HQ-9 आणि रशियाचे S-400 मिसाईल सिस्टिम्सना चकवा देतं. तर रशियाचे Su-57 हे लढावू विमान वेग आणि चपळ हालचालींसाठी प्रसिद्ध आहे. चीनचं J-35A हे नौदल ऑपरेशन्ससाठी उपयुक्त आहे. त्यामुळे सध्या तरी आकाशातही अमेरिकेचं वर्चस्व आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
एकूणच या तिन्ही देशांचा विचार करता भारत कोणत्या स्थानी आहे हेही पाहणं महत्त्वाचं आहे. भारतासाठी ही शर्यत अतिशय महत्त्वाची आहे. चीनकडे 300 हून अधिक J-20 आणि J-35 विमाने आहेत, तर पाकिस्तान 2026 पर्यंत चीनकडून J-35A घेईल. भारताकडे सध्या 36 राफेल आणि Su-30MKI आहेत, मात्र पाचव्या किंवा सहाव्या पिढीचं कोणतंही लढावू विमान नाही. अमेरिकेनं F-35 आणि F-47, तर रशियानं Su-57 ची ऑफर भारताला दिलीय.
भारताचा स्वदेशी अॅडव्हान्स्ड मीडियम कॉम्बॅट एअरक्राफ्ट म्हणजेच AMCA... 2035 पर्यंत पाचव्या पिढीच्या विमानाची निर्मिती करेल, मात्र त्यासाठी अमेरिका, रशिया आणि चीनच्या लढावू विमान निर्मितीच्या वेगाचाही विचार करावा लागेल. एकूणच आकाशातील वर्चस्वाची लढाई भारत, चीन नव्हे तर अमेरिका आणि रशियाचीच आहे, असं म्हणावं लागेल.