Tuesday, October 28, 2025
Happy Diwali

राज्याभिषेक दिनी मुंबई-गोवा हायवेवर २ दिवस अवजड वाहनांना बंदी

राज्याभिषेक दिनी मुंबई-गोवा हायवेवर २ दिवस अवजड वाहनांना बंदी

महाड : मुंबई-गोवा महामार्गावर ५ जून रोजी सायंकाळी ४ ते ६ जून रोजी रात्री १० पर्यंत जड आणि अवजड वाहनांना बंदी असणार आहे. रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा २०२५च्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी हा निर्णय घेतला आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि शिवभक्तांचा प्रवास सुखकर होण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

किल्ले रायगडावर ५ आणि ६ जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळा होणार आहे. या सोहळ्यासाठी रायगड, पुणे, सातारा, कोल्हापूर, मुंबई यासह राज्यभरातून अनेक ठिकाणांहून लाखो शिवभक्त येणार आहेत. रायगडावर जाण्यासाठी माणगांव-निजामपूर मार्गे पाचाड ते रायगड किल्ला, माणगांव ढालघरफाटा मार्गे पाचाड ते रायगड किल्ला आणि महाड नातेखिंड मार्गे पाचाड ते रायगड किल्ला हे तीन मार्ग आहेत. या मार्गांवरून शिवभक्त मोठ्या संख्येने प्रवास करतात. शासकीय वाहनांचीही मोठी गर्दी असते.

मुंबई-गोवा महामार्गावरून कशेडी घाट ते महाड आणि वाकणफाटा-नागोठणे-कोलाड-माणगांव-महाड मार्गे ही वाहने येणार आहेत. याच मार्गावरून जड आणि अवजड वाहनांचीही खूप वाहतूक असते. या कार्यक्रमात वाहतूक कोंडी होऊ नये आणि शिवभक्तांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी जावळे यांनी जड व अवजड वाहतूक बंदीचा निर्णय घेतला आहे.

जिल्हाधिकारी किशन जावळे म्हणाले, श्री शिवराज्याभिषेक सोहळा सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आला आहे. काही अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांना ही बंदी लागू नाही. दूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस, औषधे, ऑक्सिजन, भाजीपाला आणि रुग्णवाहिका यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या गाड्या नेहमीप्रमाणे सुरू राहतील. जिल्हाधिकारी जावळे यांनी या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.

या संदर्भात जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी एक अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार, वाकणफाटा नागोठणे ते कशेडीपर्यंत आणि माणगांव-निजामपूर मार्गे पाचाड ते रायगड किल्ला, माणगांव ढालघरफाटा मार्गे पाचाड ते रायगड किल्ला, महाड नातेखिंड मार्गे पाचाड ते रायगड किल्ला या मार्गांवर जड आणि अवजड वाहनांना प्रवेश बंद असेल. त्यामुळे, जर तुम्ही या काळात मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करत असाल, तर जड आणि अवजड वाहनांनी या वेळेत प्रवास करणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केलं आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >