Thursday, September 18, 2025

'शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये'

'शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये'

पालघर :भारतीय हवामान विभागाने प्रसारित केलेल्या विस्तारित श्रेणी हवामान अंदाजानुसार पालघर जिल्ह्यात पुढील एक आठवडा सरासरी पेक्षा कमी पाऊस पडणार असल्याचा अंदाज देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने प्रसारित केलेल्या विस्तारित श्रेणी हवामान अंदाजानुसार दिनांक ०५ ते १२ जून दरम्यान संपूर्ण जिल्ह्यात हलका पावसाचे संकेत असताना पावसाची आकडेवारी सरासरीपेक्षा कमी असेल, त्यानंतर आणि १३ ते १९ जून नंतर सरासरी पेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याबरोबरच पुढील दोन आठवडे किमान तापमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहील व कमाल तापमान ०५ ते १२ जून दरम्यान सरासरी पेक्षा कमी व १३ ते १९ जून दरम्यान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. अशी माहिती कृषी विज्ञान केंद्र, जिल्हा कृषी हवामान केंद्र, कोसबाड हिल येथील कृषी हवामान शास्त्रज्ञ रिझवाना सय्यद यांनी दिली.

त्याचप्रमाणे पालघर जिल्ह्यात मॉन्सूनने प्रवेश केला नाही व १३ ते १२ जूननंतर पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता असल्याने त्यागोदर फळपिके भाजीपाला व इतर खरीप पिकांच्या शेतातील मशागतीची कामे पूर्ण करून घ्यावीत व खरीप हंगामासाठी बियाणे, सेंद्रिय खते आणि रासायनिक खते उपलब्ध करून ठेवावी. कोरडवाहू जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांनी अद्याप भात पेरणीची घाई करू नये. असा सल्ला कृषी विज्ञान केंद्र कोसबाडचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विलास जाधव यांच्याकडून देण्यात आला आहे.

Comments
Add Comment