भाईंदर : ठाणे जिल्ह्यातील भाईंदर येथे धक्कादायक घटना घडली. मंगळसूत्र चोरण्यासाठी ३५ वर्षांच्या महिलेवर रासायनिक हल्ला करण्यात आला. अज्ञात चोराने हा हल्ला केला. ही घटना रात्री ८.४५ वाजता श्री बालाजी मंडप डेकोरेटर्स जवळच असलेल्या एका मॉलजवळ घडली. महिलेवर रासायनिक हल्ला केल्यानंतर चोर घटनास्थळावरुन फरार झाला.
रासायनिक हल्ल्यात जखमी झालेली महिला भाईंदर पश्चिमेच्या नेहरू नगरमध्ये राहते. घटना घडली त्यावेळी ती नातलगांसोबत पाणीपुरी खात होती. महिलेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, साधारण सहा फूट उंचीच्या बारीक बांधा असलेल्या व्यक्तीने डोळ्यांवर रसायन फेकले. यामुळे डोळ्यांची आग होऊ लागली. थोडा वेळ काहीच दिसत नव्हते. याच काळात चोराने वेगाने मंगळसूत्र खेचले आणि घटनास्थळावरुन पलायन केले. चोरट्याने केलेल्या रासायनिक हल्ल्यामुळे महिलेसोबत असलेल्या तिच्या नातलगांनाही थोडा वेळा डोळ्यांची आग होणे आणि तात्पुरते अंधत्व येणे हा त्रास झाला.
चोरण्यात आलेले मंगळसूत्र १४ वर्ष जुने होते. त्याची सध्याची बाजारातील किंमत ६४ हजार रुपये आहे.
पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फूटेज तपासून चोर पकडण्याची मोहीम हाती घेतली आहे.