वैष्णवीचा मृत्यू : छळाची परिसीमा

वैजयंती कुलकर्णी आपटे : (ज्येष्ठ पत्रकार)


प्रेम विवाह असूनही हुंड्यासाठी, पैशांसाठी बायकोचा, सुनेचा छळ करून तिला आत्महत्येला प्रवृत्त करणारी पुण्यातील राजेंद्र हगवणे आणि कुटुंबीय म्हणजे, सत्तेचा, पैशाचा माज दाखवणारी क्रूर प्रवृत्ती आहे. नुसते सोने-नाणे, दागिने, चांदीची भांडी, हुंडा घेऊन त्यांचे समाधान झाले नाही, तर गाड्यांची मागणी, कपडेलत्ते, मागण्यांवर मागण्या चालूच होत्या. त्या पूर्ण होत नव्हत्या म्हणून तिला हाल करून मारत होते. वैष्णवीचा नवरा शशांक याचे आश्चर्य वाटते. लग्नाआधी प्रेमाच्या आणाभाका घ्यायच्या आणि लग्न झाल्यावर, एक मूल झाल्यावर देखील आई-वडिलांच्या सांगण्यानुसार तिच्या वडिलांकडे भरमसाट मागण्या करायच्या.

हा कुठला प्रेम विवाह? प्रेम तर सोडाच, या कुटुंबाकडे साधी माणुसकीही नाही. वैष्णवीला किती मारहाण सहन करावी लागली याला तर सीमाच नाही. नवरा, दीर, नणंद आणि सासू-सासरे सगळे तिला मारहाण करायचे. तिच्या अंगावर ३० जखमा होत्या, यावरूनच ते सिद्ध होते. भरीस भर म्हणून तो नणदेचा मित्र नीलेश चव्हाण, जो तिचे ९ महिन्यांचे बाळ घेऊन पळाला. म्हणजे छळाची परिसीमा या हगवणे कुटुंबीयांनी गाठली. आता त्यांना शिक्षा होईल, पण निष्पाप वैष्णवीचा हकनाक जीव गेला, त्याचे काय? अशा प्रवृत्ती पहिल्या की हा कसला पुरोगामी महाराष्ट्र असे म्हणण्याची वेळ येते.

खरे तर महाराष्ट्रात हुंडा घेणे आणि देणे याला कायद्याने बंदी आहे. पण तरीही उजळ माथ्याने हुंडा, अशा विविध भेट वस्तूंची देवाण-घेवाण दोन्ही पक्षांकडून होते. लग्न किती थाटामाटात झाले याच्या चर्चा रंगतात. पण यामध्ये त्या वधू पित्याचे कंबरडे मोडले जाते, तो कर्जबाजारी होतो. उरलेले आयुष्य ते कर्ज फेडत राहतो. हुंडाबंदीचा कायदा नुसता नावाला आहे, प्रत्यक्षात ही देवाण-घेवाण वर्षानुवर्षे चालू आहे. अलीकडच्या काळात अनेक सुशिक्षित तरुण-तरुणी, अशी देवाण-घेवाण करत नाहीत. मुलीला तुम्हाला जे द्यायचे ते द्या असे सांगतात. कित्येकदा लग्नाचा खर्चही अर्धा-अर्धा वाटून घेतला जातो. अनेकदा खर्च टाळण्यासाठी नोंदणी पद्धतीने विवाह केला जातो. पण हे प्रमाण खूपच नगण्य आहे. वैष्णवीच्या आत्महत्येनंनर सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढतंय. अशा अनेक घटना आता पुढे येत आहेत.

या घटनेनंतर अशाच प्रकारच्या महाराष्ट्रातल्या चार विवाहितांच्या आत्महत्येच्या घटना पुढे आल्या आहेत. त्यामुळे या महिलांचा छळ कधी थांबणार असा प्रश्न पडतो. त्यामुळे हा पुरोगामी महाराष्ट्र हादरून गेला आहे. खरे तर लग्न म्हणजे नव्या आयुष्याची सुरुवात असते, त्यातून प्रेम विवाह म्हणजे तर आयुष्य अधिकच सुंदर वाटू लागते. मात्र विवाहितांच्या अशा आत्महत्येच्या घटना समोर येतात आणि मन सुन्न होते. पनवेल येथील सोनम केणी ही महिला सासरच्या जाचाची बळी ठरली आहे. सासरच्या जाचाला कंटाळून सोनम हिने स्वत:च्या मुलीची हत्या करून गळफास लावून घेतला. घरच्या कामाला माहेरून पैसे आण आणि वंशाला दिवा हवा, म्हणून मुलगा झालाच पाहिजे... यावरून तिचा अमानुष छळ केला गेला, तिच्या आत्महत्येला एक महिना उलटून गेला आहे, मात्र अजूनही तिचे कुटुंबीय न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. हुंडाबंदी असूनही आणि कौटुंबिक हिंसाचार हा कायद्याने गुन्हा असूनही, ही सासरची मंडळी याला भीक घालत नाहीत असेच वाटते. अमरावतीच्या वरुडमध्ये, लग्नात हुंडा कमी दिला म्हणून मुलीचा अनन्वित छळ करण्यात आला. हा छळ सहन न होऊन त्या मुलीने आत्महत्या केली. आता घरच्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिकमध्ये एका २१ वर्षीय विवाहितेने विषारी औषध घेऊन आत्महत्या केली आहे. सासरच्या लोकांचा जाच आणि नवऱ्याची साथ न मिळणे, या सगळ्याला कंटाळून तिने २७ मे रोजी आत्महत्या केली. विवाहानंतर सासर हेच तुझे घर असे मुलीला सांगितले जाते. मात्र ज्याला आपले घर समजते, तिथेच जर तिचा असा अनन्वित छळ होत असेल तर तिने काय करावे? परभणीमध्ये २५ वर्षीय विवाहित हफिजा हिने सततच्या शारीरिक आणि मानसिक जाचाला कंटाळून रेल्वे खाली उडी मारून आत्महत्या केली. एक वर्षभर तिने नवऱ्याचा जाच सहन केला. त्याने तर दुसरे लग्न केले. शेवटी तिने हे टोकाचे पाऊल उचलले. नुकतेच संभाजीनगर मध्येही सासरच्या छळाची कहाणी समोर आली आहे. तिच्याही अंगावर नवऱ्याने मारहाण केल्याच्या जखमा आहेत. अखेर तिने पोलिसात तक्रार केली आहे. तिला तर घरात बांधून ठेवून पट्ट्याने मारत होते.

विवाहितांच्या या आत्महत्यांच्या घटना पाहिल्या की, मन हेलावून जाते, पण विवाहितांनी असा जाच सहन न करता वेळीच याबाबत ठोस पाऊल उचलले पाहिजे. माहेरच्यांनी सुद्धा आता तिचे लग्न झाले, म्हणजे झाले, असे न करता सासरी गेली तरीही तिला आपला पाठिंबा द्यायला पाहिजे, अशा परिस्थतीत तिची मदत करायला पाहिजे, तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची गरज आहे.

अहिल्यानगर येथे नुकतीच मराठा समाजाची बैठक होऊन लग्नात हुंडा द्यायचा नाही आणि घ्याचाही नाही हे ठरवण्यात आले. लग्न सध्या पद्धतीने केवळ २०० लोकांच्या उपस्थितीत करावे, असेही ठरवण्यात आले. हा विचार कितीही स्वागतार्ह असला, तरीही तो अमलात कसा येतो, हे पाहावे लागेल.
Comments
Add Comment

नितीन गडकरींनीच केली डॉ. जिचकारांची कदर

नागपूरच्या अमरावती महामार्गावरील बोले पेट्रोल पंप चौक ते विद्यापीठ कॅम्पस चौकपर्यंतच्या उड्डाणपुलाचे

जातीपातीच्या लढ्यात मराठवाडा भरकटतोय!

जातीपातीचे राजकारण हे महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील जुने सत्य आहे. गेल्या अनेक दशकांपासून राजकीय पक्षांनी

मोहन भागवत : राष्ट्रनिर्माणाचा मार्गदर्शक

माझे मोहनजींच्या कुटुंबाशी अगदी जवळचे संबंध आहेत. मोहनजींचे वडील कैलासवासी मधुकरराव भागवत यांच्यासोबत मला

नवीन प्रभाग रचना ठरणार भाजपसाठी ‘गेमचेंजर’

महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना भाजपने आपल्या सोयीचीच ठेवल्याचा आरोप झाला. त्यातच

सातारा गॅझेट : दक्षिण महाराष्ट्राच्या अपेक्षा उंचावल्या

पृथ्वीराज चव्हाण सरकारमध्ये ज्येष्ठ नेते नारायण राणे समितीच्या अहवालाने मिळालेल्या मराठा आरक्षणाचा फायदा

‘घराकडे लवकर येवा रे’

कोकणातील माणसे सुंदर कोकण सोडून शहरात आली ती नोकरीसाठी. मुलांना खाऊ घालण्यासाठी त्यांच्या शिक्षणासाठी.