 
                            ३० जून पूर्वी वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसविणे अनिवार्य
ठाणे: राज्यातील सर्व वाहनांवर ‘हाय सिक्युरिटी नंबर प्लेट’ (HSRP) लावणे शासनाने बंधनकारक केल्यानंतर ठाण्यात याचे पडसाद तीव्रतेने उमटू लागले आहेत. ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या संकेतस्थळावर तब्बल १ लाख २५ हजारांहून अधिक वाहनधारकांनी नवीन नंबर प्लेटसाठी ऑनलाईन अर्ज दाखल केला आहे.
बनावट नंबर प्लेट लावून होणारे गुन्हे... रस्त्यावर धावणारे वाहन नेमके कोणाचे.. अशा विविध कारणांमुळे वाहनाच्या नंबर प्लेटवरून वाहनाची खरी ओळख पटविण्यास मोठा अडसर ठरतो आहे, यावर उकल म्हणून राज्य सरकारने सर्व वाहनांना ‘हाय सिक्युरिटी नंबर प्लेट’ बसविणे अनिवार्य केलं आहे. यासाठी महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाने ४ डिसेंबर २०२४ रोजी आदर्श कार्यप्रणाली जारी केली आहे. त्यानुसार आता सर्वच वाहनांवरील नंबर प्लेट या हाय सिक्युरिटी नंबर प्लेट असणे सक्तीचे केले आहे. १ एप्रिल २०१९ नंतर असणाऱ्या वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवलेली आहे. मात्र त्या पूर्वीच्या वाहनांवर नव्या पद्धतीची नंबर प्लेट लावायची आहे.
ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने दिलेल्या www.transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भेट देऊन हाय सिक्युरिटी नंबर प्लेट ऑनलाईन बुकिंकवर क्लिक करून आपल्याला सर्व माहिती उपलब्ध होणार आहे. प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली १ जून २०२५ पर्यंत सुमारे एक लाख २५ हजार जुन्या वाहनांनी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट साठी ऑनलाईन अर्ज केले आहेत. यापैकी ९८ हजार वाहनांना अपॉइंटमेंट दिली असून ६० हजार वाहनांनी नवीन नंबर प्लेट बसवल्या असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांनी दिली. हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्याच्या कामासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने तीन अधिकृत कंपन्यांची नेमणूक केली आहे. अनधिकृत विक्रेत्याकडून अशी नंबर प्लेट बसवून घेतली तर वाहनाची नोंद केंद्र सरकारच्या डेटाबेस मध्ये होणार नाही. यामुळे ३० जून २०२५ नंतर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट नसणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई होऊ शकते, असे ठाणे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांनी म्हटले आहे.
www.transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर लॉगिन करा, वाहनाचा तपशील भरा, वेळ आणि केंद्र निवडा

 
     
    




