पुणे : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) ताफ्यात नऊ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर नवीन लालपरी दाखल होत आहे. त्यामुळे यंदाच्या आषाढी वारीत पुण्यासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाडक्या पांडुरंगाच्या भेटीला जाणाऱ्या भाविकांना नवीन लालपरीचा सुखद प्रवास अनुभवता येणार आहे.
दरवर्षी आषाढी वारी आणि दिवाळीपूर्वी एसटीच्या ताफ्यात नवीन बस दाखल होत होत्या. त्यामुळे आषाढी वारीत वारकऱ्यांना आणि दिवाळीला गावी जाणाऱ्या प्रवाशांना नवीन लालपरीचा प्रवास अनुभवता येत होता. मात्र, २०१६ नंतर एसटी महामंडळाकडून नवीन बसची खरेदी झालीच नाही. त्यामुळे मागील नऊ वर्षांपासून जुन्या बसनेच आषाढी वारी, दिवाळी यांचा प्रवास सुरू होता.
गतवर्षी पुणे विभागातून आषाढी वारीला पुण्यातून पंढरपूरसाठी ३८० बस सोडण्यात आल्या. मात्र, या सर्व बस जुन्या होत्या, त्यामुळे भाविकांचा प्रवास थोडा कसरतीचाच होता. मात्र, यंदा राज्यातील सर्व आगारांत एसटीच्या ताफ्यात नव्या लालपरी दाखल होत आहेत.
पुणे विभागात ६५ लालपरी नव्याने दाखल झाल्या असून, पुढील महिन्याभरात तेवढ्याच बस दाखल होणार आहेत. त्यामुळे पुण्यातून वारीसाठी जाणाऱ्या भाविकांना आता या नवीन लालपरी बसमधून प्रवास करता येणार आहे. एवढच नव्हे, तर अन्य जिल्ह्यांतील आगारामधूनही नवीन लालपरी सोडण्यात येणार असल्याने यंदा वारीचा प्रवास विना कसरतीचा आणि आनंदीमय होणार आहे.‘






