पंतप्रधानांचा इशारा अन् पाकिस्तानचा थरकाप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल लोकमाता अहिल्यादेवी होळकर महिला स्त्रीसशक्तीकरण महासंमेलनात भोपाळ येथे बोलताना पाकिस्तानला इशारा दिला की, ज्यामुळे पाकचा थरकाप व्हावा. कारण मोदी यांच्या धमक्यांमध्ये खरा अर्थ भरलेला असतो आणि त्यात केवळ फुकाच्या वल्गना नसतात. याची पाकसह प्रत्येक शत्रू राष्ट्राला खात्री पटलेली आहे. मोदी म्हणाले की, पाकच्या सैन्याने जर गोळ्या डागल्या तर त्यांना उत्तर हे तोफगोळ्यांनी दिले जाईल. तसेच ऑपरेशन सिंदूर ही भारताची सर्वात मोठी आणि सर्वात यशस्वी कारवाई होती हेही त्यांनी म्हटले.


मोदी यांच्या वक्तव्याचा खूप खोल अर्थ दडला आहे आणि तो पाकला बरोबर माहीत आहे. कारण तोफगोळ्यांनी उत्तर देणे म्हणजे पाकचे उरले-सुरले सैन्य खलास करणे आहे आणि जगात सगळीकडे नाचक्की झालेला पाक आता आणखी नाचक्की करून घेऊ इच्छित नाही. पण हे पाकच्या मनावर आहे. मोदी यांनी पाकला इशारा देण्याचा मुहूर्त निवडला तोही खास आहे. कारण लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचा दिन म्हणजे ज्यांनी आपल्या आयुष्यातील सर्व काही लोककल्याणासाठी झोकून दिले आणि त्यांनी अनेक लोकोपयोगी कामे केली. तसेच लोकांसाठी जीवनभर त्या झटल्या. त्यांच्या जयंतीचा मुहूर्त साधून मोदी यांनी पाकला हा सज्जड इशारा दिला आहे. त्याला दुसराही अर्थ आहे. तो आहे आताचा भारत हा पूर्वीसारखा पाकला किंवा कुणालाच घाबरून राहणारा नाही. तो अरे ला कारेने उत्तर देतो. तो आता जागृत आहे.


काँग्रेसच्या काळात भारतीय लष्कर आज आहे तसेच ताकदवान होते. पण फरक राज्यकर्त्यांच्या मानसिकतेत होता. राज्यकर्ते तेव्हा अल्पसंख्याकांना काय वाटेल याच चिंतेत असतं. त्यात पाकने अनेक भारतविरोधी कारवाया केल्या पण भारताने कधीही जवाबी कारवाई केली नाही. अगदी मुंबईवर दहशतवाही हल्ला झाला तेव्हाही मनमोहन सिंग यांची पाकवर हल्ला चढवण्याची हिंमत झाली नव्हती. पण आज मोदी यांचे सरकार असल्याने पाकला हे कळून चुकले आहे की, आता भारतात भाजपाचे सरकार आहे आणि ते आपल्या कुरापतींना जशास तसे उत्तर देण्यास समर्थ आहे आणि तसे ते दाखवतातही. कोणत्याही फिजिक्सला महत्त्व असते. नुसती तुमच्याकडे ताकद असून चालत नाही तर ती दाखवण्याची तयारीही असावी लागते.


भारताकडे आज ताकद आहे आणि ती दाखवण्याची तयारीही आहे. त्यामुळे पाक नामोहरम झाला आहे. कारण आता बोटचेप्या काँग्रेसचे राज्य नाही तर मोदी यांचे आहे. यातील गुणात्मक फरक पाकला कळून चुकला आहे. मोदी असेही म्हणाले की, ऑपरेशन सिंदूर ही भारताने केलेली पाक दहशतवाद्यांविरुद्धची सर्वात मोठी आणि सर्वात यशस्वी कारवाई होती. याचा अर्थ असा आहे की याआधी पाकने अशाच दुष्ट कारवाया केल्या. पण काँग्रेस सरकारमध्ये त्यांना जशास तसे उत्तर देण्याची हिंमत नव्हती आणि त्यांनी ती दाखवलीही नाही. अर्थात याच्या कारणांमागे जाण्याची काही गरज नाही, कारण ते सर्वांना माहीतच आहे. अल्पसंख्याकांच्या लांगूलचालनात काँग्रेस सरकार गुंतले होते आणि त्यामुळे दहशतवाद्यांनी कितीही नृशंस हल्ला केला तरीही कागदी निषेधांचे भेंडोळे नाचवण्यापलीकडे काँग्रेसची धाव कधीच गेली नाही. पण आता मोदी यांनी बुलेटला उत्तर तोफगोळ्यांनी देण्याची भाषा केली आहे आणि तसे करून दाखवले आहे. त्यामुळे पाकच्या पंतप्रधानांना बंकरमध्ये लपून आपला जीव वाचवण्याची वेळ आली होती. त्याशिवाय मोदी यांनी आणखी एक महत्त्वाचा संदेश पाकला दिला आहे तो म्हणजे, टेरोरिझम कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही आणि यापुढे पाकच्या अण्वस्त्रांच्या धमक्यांना भारत घाबरणार नाही. पाकने अण्वस्त्राच्या नसलेल्या, असलेल्या जोरावर भारताला दीर्घकाळ घाबरून ठेवले होते आणि त्याकाळी काँग्रेसला हिंसाचार न करण्याची नशा चढली होती. पण समोरचा जर धमकावत असेल तर त्याला उत्तर त्याला समजेल अशा भाषेत दिले पाहिजे हे सूत्र नव्या भारताने स्वीकारले आहे. ते मोदी यांनी भारताला दिले आहे.


मोदी यांना एका बाबीसाठी मानावे लागेल. ते म्हणजे, मोदी यांनी भारताला आपला मर्दपणा परत मिळवून दिला आहे. याच भाषणात मोदी यांनी महिलांच्या 'ऑपरेशन सिंदूर'मधील सहभागाबद्दल गौरव उद्गार काढले आहेत. त्यांनी म्हटले की, 'ऑपरेशन सिंदूर' हे नुसते ऑपरेशन सिंदूर नव्हते तर भारतीय महिलांच्या बळाचा म्हणजे नारीशक्तीचा आविष्कार होता. त्यांचे उद्गार शतप्रतिशत खरे आहेत. कारण याच युद्धात भारताच्या जिगरबाज महिलांनी आपल्यातील शुरत्वाचे प्रदर्शन जगाला घडवले. दुसऱ्या महायुद्धात अनेक महिलांनी त्यांच्या अंगातील शौर्याचे प्रदर्शन घडवले होते. त्याच प्रकारचा महिलांच्या कर्तृत्वाचे हे प्रदर्शन होते. मोदी म्हणतात, भारतीय नारी जम्मूपासून पंजाबपर्यंत आघाडीवर राहिल्या आणि त्यांनी असामान्य शौर्य गाजवले. त्यामुळे मोदी यांचे रास्त उद्गार कुणालाही पटण्यासारखे आहेत. पंतप्रधान मोदी यांनी भारतीय महिलांच्या धैर्याबद्दल देशवासीयांना वाटणारा वाढता विश्वास व्यक्त केला आहे.


लष्कराच्या तिन्ही दलात भारतीय महिला आघाडीवर राहून भारताची सेवा करत आहेत. याचा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे. या महिलांनी असामान्य शौर्य दाखवले आहे. अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मजयंतीनिमित्त मोदी यांच्यासारख्या देशभक्ताने त्यांना यापेक्षा जास्त चांगली श्रद्धांजली वाहणे शक्य नाही. मोदी यांच्या भाषणाने पाकचा थरकाप उडाला असेल तर त्याला भारताचा नाईलाज आहे. कारण पाकच्या करतुती तशाच आहेत, त्यामुळे पाकला कधी ना कधी हे भोगावेच लागणार होते. पण काँग्रेसच्या काळात तो निवांत होता. कारण काँग्रेसचे सरकारला केवळ मतांची लाचारी करण्यापासून फुरसत नव्हती. पण आज भाजपा सत्तेत आहे आणि ती सत्ताही भारतीयांच्या सुखासाठी राबवली जात आहे. त्यामुळे पाकचा जळफळाट होत आहे.

Comments
Add Comment

सरन्यायाधीशांचा फटाका!

राजधानी दिल्लीतील प्रदूषणाची चर्चा नेहमीच होत असते. वाहनांच्या माध्यमातून होत असलेले प्रदूषण, पीकं

कसरतीची चौथी फेरी

उरलेसुरले वस्त्रहरण रोखण्यासाठी उबाठा गटाच्या चाललेल्या कसरतींमधला आणखी एक अंक गुरुवारी पार पडला. दोन्ही

विरोधकांचा भ्रमनिरास...

देशाच्या घटनात्मक संरचनेतील राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती ही दोन सर्वोच्चपदे एक विशेष धाग्याने जोडलेली आहेत.

आणखी एका शेजाऱ्याच्या घरात...

शेजारच्या घरात आग लागते, त्याची धग आपल्यापर्यंत येते; त्यामुळे नेहमी काळजी घ्यावी, असं म्हटलं जातं. देशाच्या

मणिपूरमध्ये मोदी

देशातील विरोधी पक्षांना एक खोड जडली आहे, ती म्हणजे कुठेही काहीही चांगले पाहायचे नाही. त्यानुसार देशभर बऱ्यापैकी

अमेरिकन टेनिसची नवी तारका

आर्यना सियारहिजेउना सबालेंका ही अमेरिकन ओपन टेनिसची यंदाची नवी तारका ठरली आहे. तिने नुकत्याच झालेल्या अंतिम