Saturday, October 25, 2025
Happy Diwali

शासनाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करा

शासनाच्या योजनांची  प्रभावीपणे अंमलबजावणी करा

रायगड जिल्ह्याचे पालक सचिव गोविंदराज यांचे निर्देश

अलिबाग : रायगड जिल्हा विविध योजनाच्या अंमलबजावणीमध्ये अग्रेसर जिल्हा आहॆ. विविध विभागांतील अधिकाऱ्यांनी परस्पर समन्वय आणि सहकार्याने काम केल्यास सर्वसामान्याचे जीवन सुकर होण्यास मदत होणार आहॆ. तरी शासनाच्या सर्व योजनाची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश नगरविकास विभागाचे प्रधान सचिव तथा रायगड जिल्ह्याचे पालक सचिव डॉ. के. गोविंदराज यांनी दिले.
पनवेल येथील तहसीलदार कार्यालयात पालक सचिव डॉ. गोविंदराज यांच्या अध्यक्षतेखाली रायगड जिल्ह्यातील विविध विभागांच्या योजनाचा आढावा बैठक नुकतीच घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. अग्रीस्टॅक योजना, जलजीवन मिशन, जलसंधारण योजना, प्रधानमंत्री आवास योजना, लाडकी बहीण योजना या प्रमुख योजनांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. अग्रीस्टॅक योजनेच्या जिल्ह्यातील कामगिरी बाबत असमाधान व्यक्त करून या कामाला विशेष गती देण्याचे निर्देश त्यांनी दिले. कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा जलदगतीने व परिणामकारकरित्या लाभ शेतकऱ्यांना देणे सुलभ व्हावे याकरिता केंद्र शासनाची ॲग्रिस्टॅक योजना आहॆ. यासाठी १०० टक्के नोंदणी करावी. महसूल आणि कृषी विभागाने परस्पर समन्वय साधून काम करावे असेही त्यांनी यावेळी सांगितले. रायगड जिल्ह्यातील जलसंधारणच्या कामांचा यावेळी आढावा घेण्यात आला. विविध जलाशयातील गाळ काढण्याचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहॆ; परंतु अपेक्षित काम झालेले नसल्याचे आढळून येत आहॆ. जलजीवन मिशनच्या कामाचा आढावा यावेळी घेण्यात आला. पाण्याचे प्रश्न सोडविण्यासाठी पाणी बचत, योग्य प्रमाणात वापर, पुनर्प्रकिया करुन वापर याबाबत आराखडे तयार करावेत. नदी, नाले आदी पाणी साठे स्वच्छ कशा होतील यासाठीचे नियोजन करुन अंमलबजावणी करावी असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. कोणतीही योजना राबविताना त्या माध्यमातून होणारा फायदा किंवा लाभावर लक्ष केंद्रीत करुन निधी खर्च केल्यास त्या योजनेचा सामान्य जनतेला नक्कीच फायदा होण्यास मदत होते. त्यानुसार प्रत्येक योजनेचे नियोजन करुन ती राबविण्यात यावी असेही डॉ.गोविंदराज यांनी सांगितले. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जिल्ह्यातील विविध योजनांच्या अंमलबजावणीची सद्यस्थिती, प्रशासनाचे नियोजन आणि कार्यवाही याबाबत माहिती दिली. या बैठकीला पनवेल मनपा आयुक्त मंगेश चितळे, अपर मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बढे, प्रकल्प संचालक प्रियदर्शिनी मोरे, उपविभागीय अधिकारी पनवेल पवन चांडक यांसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
Comments
Add Comment