Monday, September 15, 2025

राज्यात शिक्षकेतर भरतीला तूर्तास स्थगिती – आधी समायोजन, नंतर निर्णय

राज्यात शिक्षकेतर भरतीला तूर्तास स्थगिती – आधी समायोजन, नंतर निर्णय

अमरावती : राज्यातील शालेय शिक्षण विभागाने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करण्यासाठी ४ एप्रिल २०२५ रोजी आदेश काढला होता. त्यामुळे अनेक शाळांमध्ये रिक्त असलेल्या जागांवर भरती होईल अशी अपेक्षा होती. पण आता ही भरती प्रक्रिया तात्पुरती थांबवण्यात आली आहे.

माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी २८ मे रोजी स्पष्ट निर्देश दिले की, सध्या कोणतीही नवीन शिक्षकेतर भरती केली जाणार नाही. आधी राज्यभरातील अतिरिक्त पदांचे समायोजन पूर्ण केले जाईल, त्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल.

राज्यातील अनेक मान्यता प्राप्त, अनुदानित माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये लिपिक, ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक यांसारख्या शिक्षकेतर पदांच्या भरतीची मागणी गेल्या काही काळापासून सुरू होती. ४ एप्रिल रोजी शासनाने यासाठी मंजुरी देत सुधारित आकृतीबंध लागू केला होता. यामुळे शिक्षण संस्था भरतीबाबत उत्सुक होत्या.

पण आता शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली २७ मे रोजी झालेल्या बैठकीनंतर स्पष्ट करण्यात आलं की, २०२३-२४ च्या संच मान्यता दिल्या गेल्या असून २०२४-२५ च्या मान्यता प्रक्रियेसाठी NIC वर काम सुरू आहे. यानंतरच मंजूर, रिक्त व अतिरिक्त पदांची स्थिती लक्षात घेऊन समायोजन केलं जाईल.

सरकारकडून स्पष्ट आदेश येईपर्यंत कोणतीही भरती किंवा लाभ देऊ नयेत, असंही डॉ. पालकर यांनी सांगितलं आहे. तसेच, जर भरती केली गेली तर संबंधित अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई होईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

Comments
Add Comment