प्रहार    

मी लिहून देतो की...

  35

मी लिहून देतो की...

संवाद : गुरुनाथ तेंडुलकर


ऑक्टोबर २००७ या दिवशी क्रिकेटच्या इतिहासात एक अभूतपूर्व घटना घडली. हैदराबादच्या स्टेडियमवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाचा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना सुरू होता. या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या ब्रेड हॉग नावाच्या गोलंदाजाने भारताच्या सचिन तेंडुलकरची विकेट घेतली. ब्रेड हॉगने टाकलेल्या बॉलचा अंदाज न आल्यामुळे सचिन तेंडुलकरची दांडी उडाली. ऑस्ट्रेलियन संघाच्या उत्साहाला अचानक भरतं आलं होतं. ब्रेड हॉग तर आनंदाने बेभान झाला होता. क्रिकेटचा सम्राट असा लौकिक असलेल्या सचिन तेंडुलकरची विकेट मिळाली. अहो भाग्यम्... त्याच्या संघातील सहकार्यांनी त्याचं कौतुक केलं. त्याने स्वतःदेखील स्वतःची पाठ थोपटून घेतली. सामना संपल्यानंतर त्या सुवर्णक्षणाचा फोटो घेऊन ब्रेड हॉग सचिनकडे गेला आणि म्हणाला, ‘सर, आज माझ्या आयुष्यातला अत्यंत आनंदाचा दिवस आहे. त्या दिवसाची आठवण म्हणून मला या फोटोवर मला आपली स्वाक्षरी हवी आहे.’


सचिनने एकदा ब्रेड हॉगकडे आणि एकदा त्याच्या हातातल्या फोटोकडे पाहिलं आणि त्या फोटोच्या मागे लिहिलं. ‘ब्रेड हॉग, हा दिवस तुझ्या आयुष्यात पुन्हा कधीही येणार नाही.’ हे वाक्य लिहून सचिनने त्याखाली सही केली. ब्रेड हॉगने मस्तीत खांदे उडवले आणि विजयोन्मादात तो फोटो घेऊन निघून गेला.


त्यानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान अनेक सामन्यांमध्ये ब्रेड हॉग आणि सचिन तेंडुलकर आमने-सामने आले. एक दोन नव्हे तर तब्बल पंचेचाळीस सामन्यांमध्ये ब्रेड हॉगने सचिन तेंडुलकरची विकेट मिळवण्यासाठी जीवाचा आटापिटा केला पण... पण तो एकदाही यशस्वी होऊ शकला नाही. सचिन तेंडुलकरने ब्रेड हॉगची बॉलिंग प्रत्येक वेळी झोडपून काढली.


५ ऑक्टोबरची पुनरावृत्ती कधीच होऊ दिली नाही. ‘हा दिवस तुझ्या आयुष्यात पुन्हा कधीही येणार नाही.’ असं जे लिहून दिलं होतं ते शब्द सचिन तेंडुलकरने खरे ठरवले. पण... पण ते शब्द खरे ठरवण्यासाठी सचिनने काय काय केलं असेल याची जरा कल्पना करा.


सचिनने ब्रेड हॉगच्या प्रत्येक बॉलिंगचा व्हीडिओ अनेकदा पाहिला. त्याच्या बॉलिंगचा नव्याने अभ्यास केला. त्याचबरोबर आपण आजवर कुठे कुठे चुकलो? आणि का चुकलो? याचाही अभ्यास केला. दररोज करत असलेली नेट प्रॅक्टिस अधिक जोमाने करायला सुरुवात केली. नवीन तंत्र आत्मसात केली. फिटनेस वाढवला. सामन्याच्या वेळी स्टेडियममध्ये उपस्थित हजारो प्रेक्षक आरडा-ओरडा करत असताना थंड डोक्यानं प्रत्येक बॉल कसा खेळायचा यासाठी खास प्रशिक्षण घेतलं आणि... आणि ब्रेड हॉगला दिलेला शब्द खरा केला.


आपणही आपल्या आयुष्यात अनेकदा चुका करतो. अनेकदा अपयशी होतो, पण आपण त्या चुका कधीच मान्य करत नाही. किंबहुना आपण आपल्या अपयशाचं खापर इतर कुणावर तरी फोडतो. जर चुकीला जबाबदार दुसरं कुणी सापडलं नाही तर नशिबाला दोष देतो.


‘बॅड लक...’ म्हणतो. हजारो कारणं सांगतो. पण स्वतःकडे मात्र दोष घेत नाही. आपले प्रयत्न कमी पडले किंवा आपल्या कामाची दिशा चुकली हे मान्य न करता भलतीच कारणं सांगतो. आपली चूक नव्हतीच असं स्वतःच स्वतःला समजावतो. परिणामी त्याच त्याच चुका पुन्हा पुन्हा घडतात आणि पुन्हा पुन्हा अपयश येतं.


एकदा आलेल्या अपयशानंतर त्याची पुनरावृत्ती न करता यशस्वीच व्हायचं असेल तर त्यासाठी सर्वात प्रथम म्हणजे आपली चूक मान्य करायला हवी. अपयश का आलं हे शोधून त्याची स्वतःच स्वतःशी कारणमीमांसा करायला हवी. ज्या चुकीमुळे अपयश आलं त्या चुकांचं पृथक्करण करून त्या चुका पुन्हा होणार नाहीत यासाठी काळजी घ्यायला हवी. नवीन तंत्र शिकायला हवी. पुन्हा नव्या जोमाने प्रयत्न करायला हवेत. आणि हे साध्य होण्यासाठी सर्वांत आधी स्वतःच स्वतःला एक वचन द्यायला हवं. ‘असं पुन्हा कधीही होणार नाही.’ अनेक मानसशास्त्रज्ञ आणि प्रेरणा प्रशिक्षक मंडळी नेहमी सांगतात की,


‘तुम्ही एखादी गोष्ट मिळवण्यासाठी तुमचं उद्दिष्ट कागदावर नीट लिहून काढा. जी गोष्ट तुम्हाला साध्य करायची आहे ती स्वतःच्या हातांनी कागदावर लिहून काढा. त्या कागदावर सही करून तो कागद दररोज तुमच्या नजरेसमोर राहील अशा प्रकारे ठेवा. त्यानंतर उद्दिष्टांपर्यंत पोहोचण्यासाठी काय काय परिश्रम करावे लागतील त्याची यादी करून प्लान बनवा, योजना आखा आणि त्यानुसार कामाला लागा...’ संस्कृतमध्ये एक वचन आहे अक्रमेणा अनुपायेन कार्यारंभो न सिध्यति।


भावार्थ : कोणतंही मोठं काम करण्यासाठी त्या कामाचा अनुक्रम आणि त्यासाठी करावे लागणारे उपाय याचं व्यवस्थित नियोजन केल्याशिवाय कार्य सिद्धीस जात नाही. म्हणूनच कार्य सिद्धीस जाण्यासाठी केवळ नशिबावर हवाला न ठेवता योग्य ती आखणी आणि त्यानुसार परिश्रम करणं महत्त्वाचं ठरतं. अपयशापासून यशापर्यंतच्या प्रवासातली पहिली आणि महत्त्वाची पायरी म्हणजे स्वतःच्या यशाची स्वतःलाच हमी देणं. मी यशस्वी होणारच हे स्वतःच्या अंतर्मनात रुजवणं. वर उल्लेख केलेल्या क्रिकेटच्या किस्स्याचा नीट विचार केला तर सचिन तेंडुलकरने शब्द ब्रेड हॉगला दिला नव्हता तर त्याने स्वतःच स्वतःला शब्द दिला होता. आपल्यालाही दैनंदिन आयुष्यात कोणत्याही क्षेत्रात यश मिळवायचं असेल तर स्वतःच स्वतःला वचन द्यायचं. अगदी लेखी स्वरूपात वचन द्यायचं. आज रोजी मी लिहून देतो की...

Comments
Add Comment

शहाणपण

जीवनगंध : पूनम राणे दिनेश शाळेतून घरी आल्यापासूनच खूपच नाराज दिसत होता. आई त्याला खोदून खोदून विचारण्याचा

पसायदान

काळोखाच्या गावी, प्रकाशाच्या वाटा : श्रद्धा बेलसरे खारकर आळंदीच्या ‘पसायदान गुरुकुला’तून बाहेर पडताना खूप

सृष्टीची निर्मिती

महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे ह्मदेवाने आपल्या विविध अंगापासून ऋषींची (मानसपुत्रांची) उत्पत्ती केली.

प्रथा...

संवाद : गुरुनाथ तेंडुलकर लंडनमध्ये घडलेली एक घटना... मार्गारेट थेंचरबाई पंतप्रधान असताना त्यांनी देशाच्या

‘वो भारत देश है मेरा...’

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे ए न. सी. फिल्म्सचा केदार कपूर दिग्दर्शित ‘सिकंदर-ए-आझम’ हा सिनेमा १९६५ साली आला.

पालकत्व आणि वैवाहिक आयुष्यातील समतोल

आनंदी पालकत्व : डाॅ. स्वाती गानू नवीन पालक होणे हा आनंद, प्रेम आणि नवीन अनुभवांनी भरलेला एक रोमांचक प्रवास असतो. हा